लाखोचे उत्पन्न देणार्‍या यात्रेत सुविधेचा अभाव

बहिरम यात्रा 20 डिसेंबरपासून

    दिनांक :28-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चांदूर बाजार, 
Bahiram Yatra : संपूर्ण जिल्ह्यात भूषण ठरणारी सर्वात जास्त दीड महिना चालणारी बहिरम यात्रा 20 डिसेंबरपासून सुरू होणार असून या यात्रेत सुख-सुविधा पुरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असते. मात्र जिल्हा परिषदेला लाखो रुपये उत्पन्न देणारी ही यात्रा असली तरी या यात्रेमध्ये येणार्‍या भाविक व व्यावसायिकांसाठी पाहिजे त्या सुविधा दिल्या जात नसल्याचे येथे येणार्‍या भाविकांच्या व व्यावसायिकांच्या चर्चेमधून स्पष्ट होत आहे.
 
Bahiram Yatra
 
दिवाळीनंतर खरीप हंगाम संपला असून हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. Bahiram Yatra गुलाबी थंडीमध्ये मटणाची हंडी, त्यात बहिरम बाबाचे नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी विदर्भातून लाखो भाविक या यात्रेमध्ये येत असतात. ही यात्रा 20 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत चालत असते. मागील वर्षी या यात्रेमध्ये 673 दुकानांच्या लिलावापासून जिल्हा परिषदेला 23 लाखाचे उत्पन्न झाले. हे उत्पन्न आतापर्यंत सर्वाधिक मानले गेले आहे. मागील वर्षी यात्रेतील सुविधांसाठी जिल्हा परिषदेने 2 लाख 35 हजार रुपये खर्च केला आहे. या परिसरातीलच नव्हे तर विदर्भातील अनेक भाविकांचे हे कुलदैवत मानले जाते. या यात्रेत आदिवासी बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यात्रेत येणार्‍यांची भाविकांची गर्दी पाहता कित्येक सुविधा पुरविण्यास जिल्हा परिषद अपयशी ठरवू लागली आहे. एकेकाळी शेतकर्‍यांची मानला गेलेली ही यात्रा आता हौशा-गौशांची झाली आहे. पण यात्रेत येणार्‍या भाविकांची गर्दी पाहता सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.
 
 
बहिरम यात्रेमध्ये स्वच्छतागृह असले तरी ते खूप जुने असल्यामुळे ते मोडकळीस आले आहे. त्यामुळे अद्यावत सुविधेसह कायमस्वरूपी शौचालयाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे या यात्रेमध्ये असणे आवश्यक आहे. यात्रा काळात महिलांकरिता मोबाईल टॉयलेट, Bahiram Yatra पोलिस चौकी इमारत, मानवी दवाखाना, यात्रा अधीक्षक कार्यालयाची इमारत होणे आवश्यक असून त्यासाठी कायमस्वरूपी देखभालीकरिता कर्मचारी सुद्धा या बहिरम यात्रेमध्ये असणे आवश्यक असले तरी याकडे जिल्हा परिषद मात्र लक्ष देत नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.