गडचिरोली,
Sandeep Koret : अहेरी उपविभागासह पूर्ण जिल्ह्याचे संजय गांधी निराधार योजनासह श्रवण बाळ योजनेचे अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांची सणासुदीच्या दिवसांत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रकार असाच राहिला तर सर्वाची दिवाळी अंधारात जाणार. तरी शासनाने दिवाळीपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करून त्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत Sandeep Koret यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
शासन मोठमोठ्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. ही अभिमानाची बाब आहे. मात्र निराधार जनतेकडे शासनाने पाठ फिरविल्याने उपासमारीची पाळी आली आहे. या बाबत अनेक लाभार्थी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र त्याचा हाती निराशाच येत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. याबाबत निराधार व योजनेच्या लाभार्थ्यांनी संदीप कोरेत Sandeep Koret यांना निवेदन देऊन पाठपूरावा करण्याची मागणी केली.
समाजातील निराधार व दुर्बल घटकांना तसेच निराधार वयोवृध्द व्यक्तीना जिवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे योजनेतून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब योजनांमार्फत मदत केली जाते. त्या अनुषंगाने विधवा, दिव्यांग, निराधार, घटस्फोटित वयोवृध्द घटकांना शासनातर्फे मदत केली जाते. गेल्या तीन महिन्यांपासून उपविभागातील गरजू निराधार लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या सर्व निराधारांना मानधन देऊन दिवाळी गोड करावी, अशीही विनंती निवेदनाद्वारे संदीप कोरेत Sandeep Koret यांनी केली आहे.