बालासोर,
ओडिशाच्या तटवर्ती भागातील अब्दुल कलाम द्वीपावरून भारताने Pralay missile ‘प्रलय’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्याने दिली. शेजारी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील गरज लक्षात घेऊन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र सकाळी 9.50 वाजता डागण्यात आले. त्याने चाचणीसाठी ठेवलेले सर्व निकष पूर्ण केले.
मागोवा घेणार्या उपकरणांच्या संचाने तटवर्ती भागातून त्याच्या प्रक्षेपणावर नजर ठेवली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा नियंत्रण रेषेवर तैनात करण्यासाठी प्रलय विकसित करण्यात आले आहे, असे संरक्षण विभागाच्या अधिकार्याने सांगितले. प्रलयची तुलना चीनच्या डाँग फेंग-12 आणि रशियाच्या इस्कंदर क्षेपणास्त्राशी होऊ शकते. युक्रेन युद्धात रशियाने इस्कंदर क्षेपणास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.
हवेतच दिशा बदलण्याची क्षमता
Pralay missile : प्रलय क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 ते 500 किमीची असून, ते 500 ते 1000 किलो स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. घन इंधनाचा वापरण करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित आहे. प्रलय क्षेपणास्त्रात हवेतच दिशा बदलण्याची क्षमता आहे.