- श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली,
Madhya Pradesh Election : मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होत असून, भाजपाचे कमळ आणि काँग्रेसचे कमल (नाथ) यांच्यात लढत होत आहे. राज्यातील ही निवडणूक मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला निसटते बहुमत मिळाले, कमलनाथ मुख्यमंत्री झाले, पण त्यांचे मुख्यमंत्रिपद फार काळ टिकू शकले नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने कमलनाथ सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांच्या गळ्यात चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाने यावेळी शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले नाही, भाजपा राज्यातील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि चेहर्यावर लढवत आहे.
संजय गांधी यांच्यामुळे Madhya Pradesh Election कमलनाथ राजकारणात आले आणि युवक काँग्रेसपासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. डुन स्कूलमध्ये कमलनाथ आणि संजय गांधी एका वर्गात होते. या मैत्रीने त्यांना राजकारणात आणले. कमलनाथ यांच्या छिंदवाडा आणि भोपाळ येथील निवासस्थानी तसेच कार्यालयात अजूनही संजय गांधी यांचे छायाचित्र आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही छायाचित्रे त्यांच्या निवासस्थानी आहेत. पण, संजय गांधींचे छायाचित्र अजूनही आपल्या निवासस्थानी आणि कार्यालयात कायम ठेवणारे कमलनाथ हे काँग्रेसमधील बहुधा एकमेव नेते असावे. आणिबाणीनंतर संजय गांधी यांना अटक झाली, त्यावेळी इंदिरा गांधींना संजय गांधींची खूप काळजी वाटत होती. त्यामुळे तिहार तुरुंगात संजय गांधींना साथ देण्यासाठी कमलनाथ न्यायाधीशाशी भांडून न्यायालय अवमानाच्या प्रकरणात जाणीवपूर्वक तुरुंगात गेले आणि संजय गांधीसोबत राहिले, असे म्हणतात. येथूनच त्यांची संजय गांधींशी असलेली मैत्री आणखी घनिष्ट झाली, तसेच इंदिरा गांधींचाही विश्वास त्यांनी मिळवला.
याचेच फळ म्हणून 1980 च्या लोकसभा Madhya Pradesh Election निवडणुकीत काँग्रेसने छिदवाडा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. कमलनाथ यांच्या प्रचारासाठी स्वत: इंदिरा गांधी छिंदवाढ्यात आल्या होत्या. काँग्रेस नेते म्हणून तुम्ही कमलनाथ यांना मत देऊ नका, तर माझा तिसरा मुलगा म्हणून त्याला मत द्या, असे आवाहन इंदिरा गांधींनी केले होते. त्यामुळेच ‘इंदिरा गांधी के दो हाथ, संजय गांधी आणि कमलनाथ’ असा नारा तेव्हा लोकप्रिय झाला होता.
कमलनाथ Madhya Pradesh Election छिंदवाडा मतदारसंघातून 1980, 1985, 1989, 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये 1996 चा अपवाद वगळता नऊवेळा विजयी झाले. 1991 मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून त्यांचा समावेश झाला. 2004 तसेच 2009 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. संजय गांधी तसेच इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर कमलनाथ यांच्या कारकीर्दीला थोडा धक्का बसला, पण नंतर त्यांनी राजीव गांधींशी जुळवून घेतले. 1993 मध्येच कमलनाथ मुख्यमंत्री झाले असते, पण त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी आपले वजन दिग्विजयसिंह यांच्या पारड्यात टाकले. 2018 मध्ये त्यांना अल्पकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली, आता 2023 च्या निवडणुकीत कमलनाथ यांना दुसर्यांदा मु‘यमंत्रिपदाची संधी मिळेल का, हे 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतर समजणार आहे.