तुका आकाशाएवढा
या जगामध्ये प्रथम आपल्यावर जर का अनंत उपकार कुणाचे असतील तर ते आहेत आपल्या आईवडिलांचे. हे जग दाखविले ते प्रथम यांनीच. म्हणूनच आईवडील हे ईश्वरासमान आहेत. ईश्वराचेच ते एक रूप आहे, हे कधीही विसरून चालणार नाही. असं हे आपलं पहिलं श्रद्धास्थान आहे. म्हणूनच नम्रपणे लीन होऊन आपण ज्यांच्या चरणावर डोकं ठेवून मन:शांतीबरोबरच आशीर्वाद घेतो. जे आपल्या मुलांच्या सुखी आणि समाधानी जीवनाकरिता अपार कष्ट सोसत असतात. या कष्टाची जाण मात्र मुलांना असणे गरजेचे आहे. जाण याकरिता की, आज अनेक मुलं ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ या भूमिकेत असल्याचे निदर्शनास येत आहे. आईवडील मुलांच्या भरभराटीकरिता आयुष्यभर अनेक संकटांशी सामना करून मुलांच्या जीवनाला आकार व उकार देत असतात. अर्थात हा सामना करण्याचं बळ आई-वडिलांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या तोच कर्ता-करविता देत असतो, हे नाकारून चालणार नाही. भक्ती व शक्ती एकत्र येत असल्यामुळे जीवनातील सर्व मार्ग सुकर होताना दिसतात. त्याकरिता श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची ठरते. आज सुख-दु:खानं व्यापलेलं आपलं जीवन असलं, तरीही ते अत्यंत अमूल्य आहे. भोग भोगून देण्याकरिताच आपला जन्म झालेला आहे.
आयुष्यात मनाला जर शांती पाहिजे असेल तर आईवडिलांची सेवा करून त्यांना समाधानी ठेवणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांची मनापासून सेवा करणे गरजेचे आहे. ते का वरवरचे असेल, मतलबी असेल किंवा नाटकी असेल तर आपल्या वाट्याला सुख येण्याऐवजी दु:खच येईल. खरं तरं त्यांच्याच पुण्याईवर आपण सुखासमाधानाचे दिवस पाहू शकतो. मात्र, ही बाब प्रत्येकाच्या लक्षात येईलच असे नाही. त्याकरिता श्रद्धा असावी लागते. पैसा हा आपला चरितार्थ चालविण्याकरिता महत्त्वाचा असला, तरी तो व्यवहार पूर्ण करण्याचे साधन आहे. साध्य नाही, हे लक्षात घेणे अत्यंत जरूरीचे आहे. जर का पैसा साध्य मानला तर काही काळ सुख दिसेलही; परंतु ते कमी कालावधीसाठी, नंतर ते आपल्याला दु:खाच्या खाईकडे कधी घेऊन जाईल, याचा पत्ताही लागू देणार नाही. मग मात्र अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. म्हणून आचरण शुद्ध ठेवावे. आईवडिलांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. हेच महत्त्व संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. कारण संत साहित्य हे एक सशक्त समाज निर्मितीचे साधन आहे. त्यांच्या वाणीला व शब्दांना खूप महत्त्व आहे. संत तुकाराम महाराजांनी केवळ उपदेश न करता आधी तो आचरणात आणला. नंतर जगाला त्यांनी उपदेश केला. म्हणूनच त्यांचे असे म्हणणे आहे की, आईवडिलांच्या संपर्कात जी मुलं राहतात त्यांना काशीची तीर्थयात्रा करण्याची काहीच गरज नाही. आईवडिलांची सेवा म्हणजेच काशीची तीर्थयात्रा केल्याचे पुण्य त्याच्या पदरात पडते. म्हणून जगद्गुरू Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की,
माय बापे केवळ काशी। तेणें न वजावे तीर्थसी।
पुंडलिकें काय केले?। परब्रह्म उभे ठेले॥
तैसा होई सावधान। हृदयी धरी नारायण।
तुका म्हणे मायबापे। अवघी देवाची स्वरूपे॥
अ. क्र. 2896 संस्थान.
या अभंगाच्या माध्यमातून मायबापाची सेवा किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी समजावून सांगितले आहे. साक्षात ईश्वराला बाजूला करून सेवेचे व्रत पुंडलिकाने सोडले नाही. याचा अर्थ असाही नाही की, Saint Tukaram Maharaj ईश्वराची पूजा करणे सोडून द्यावे. मनोभावे पूजाही करायलाच पाहिजे. परंतु ही पूजा करीत असताना मात्र आईवडिलांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी पुंडलिकाने जशी घेतली त्याचप्रमाणे आपणही जीवन जगत असताना आईवडिलांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे सेवेचे कार्य करीत असताना सतर्क राहणे गरजेचे आहे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सावध राहिल्यास जीवनात सुख व समाधान मिळवू शकतो. आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना निदर्शनास येत आहे. ती कमी करण्याच्या हेतूने विकृतीवर प्रहार करून दु:खावर फुंकर घालण्याकरिता आईवडिलांची सेवा केल्याने जीवनात समाधान प्राप्त करण्यासाठीचा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग अत्यंत मोलाचा ठरतो. आईवडील हे ईश्वराचेच एक रूप असून त्यांची मनोभावे सेवा ही पूजेसमान आहे. आज मनुष्य विनाश व विकृतीकडे झुकत चालेला आहे. म्हातारपणाचा एक दिवस आपलाही असेल, ही जाणीव त्याने ठेवावी. परंतु तो ही बाब आपल्या सोयीनुसार विसरतो आहे. कुणाच्या तरी म्हणण्यावरून तो आईवडिलांना दूर करण्याचं साहस करतो आहे. आपल्या थोड्याशा मतलबाकरिता तो असा का वागत आहे? अशावेळी त्याने वळून पाहणे गरजेचे आहे आणि आपलं कुठेतरी चुकत आहे, ही बाब जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा मात्र त्याचं जीवन खर्या अर्थानं आरपार उजळून निघेल.
Saint Tukaram Maharaj : आईवडील आपल्या मुलाकरिता शेवटच्या क्षणापर्यंत राब राब राबताना दिसतात. ही बाब केवळ माणसांच्याच द़ृष्टीने न पाहता ज्यांना बुद्धी नाही अशांना आपण जनावर म्हणतो; तेसुद्धा आपल्या नवजात पिलांजवळ कुणालाही येऊ देत नाही. अशा प्रकारचं ते रक्षण करताना दिसतात व पुढेही पिल्ले मोठी झाल्यावर पालकाचे रक्षण करताना दिसतात. त्यांच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. म्हणूनच त्यांच्यावर जर का कुणी हल्ला चढविला तर मात्र त्यांना ते सहन होत नाही. ते लगेच समोरच्यावर हल्ला करताना दिसतात. एवढी साधी गोष्ट माणसाला का कळू नये? ही बाब आपण दररोजच अनुभवत असतो. माणसाला तर बुद्धीचे वरदान मिळाले असताना पुढच्या काळात आपणही म्हातारे होऊ, हे ते सोयीनुसार विसरतात. म्हणून की काय ते म्हातारपण आलेल्या आईवडिलांना बरीच मुलं त्रास देताना किंवा वेठीस धरताना नजरेस पडतात? कृतज्ञऐवजी कृतघ्न होताना दिसतात. वास्तविक आई मुलांना घास भरविल्याशिवाय अन्नही ग्रहण करत नाही. त्यांच्या सुखात तिचं सुख सामावलेलं असतं. मुलांना ते जिवापाड जपतात, वागवतात. वडील त्यांच्या मौजमजेकरिता त्यांचे लाड पुरवितात. आपल्या गरजा बाजूला ठेवून त्यांना गोडधोड खाऊ घालतात. त्यांच्या सुखाकरिता आयुष्यभर झटतात. ते आजारी पडलेत तर रात्र रात्र जागरण करून औषधोपचार करून तो या दु:खातून बाहेर कसा पडेल याकरिता ईश्वराजवळ मन:पूर्वक प्रतिज्ञा करताना दिसतात. वैद्यांची मनधरणी करताना दिसतात. एवढेच काय, तर कुठलेही संकट आले तर त्या संकटाशी स्वत: दोन हात करण्याची तयारीही करतात.
मन असंच असतं. आई-वडिलांचं मन मुलं उपचारानंतर बरं झाल्यास आनंदून जातं. मनात कुठलाही वाईट हेतू न ठेवता केवळ त्याचं सुख ते आपलं सुख मानतात. त्यामध्येच ते सुखावतात. मुलांच्या जीवनात सुगीचे दिवस पाहण्याकरिता ते अहोरात्र झटताना दिसतात. पुढील जीवन सुकर जाण्याकरिता सर्वतोपरी सुख-सुविधा पुरवितात. केवळ मुलांच्या जीवनात सुखाचे क्षण आणण्याच्या हेतूने कार्य करीत असताना दिसतात. एवढं झटूनही मात्र काही आई-वडिलांच्या पदरात दु:खाचे दान टाकणार्या मुलांना काय म्हणायचे, असा प्रश्न मनात उपस्थित होतो. अशांना काही वेळेस जनावराची उपमा दिली जाते. अशी वेळ कुणाही मुलाच्या नशिबी येऊ नये, असे मनापासून वाटते. खरं तर सुखाची किंमत तेव्हा कळते जेव्हा मनुष्य दु:खाच्या खाईत पडतो. उन्हाची चटक बसली की, मायेची सावली आणि तिचा अर्थ समजतो. म्हणूनच ‘मुलांनी तोडू नये आधाराचे कळी कोंडे.’ मानवी प्रगती व कल्याण साधण्यासाठी संतविचारांची नितांत गरज आहे. Saint Tukaram Maharaj संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी अभंगाद्वारे प्रकट केलेले विचार आयुष्य जगताना अत्यंत मोलाचे ठरतील असे आहे.
जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा परामर्ष घेतल्यास जीवनातील अनेक न सुटणार्या कोड्यातून निश्चितच मुक्तता मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात सुख-समाधान आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच म्हटले की, जगताना संतांची संगती व त्यांच आचारविचार हा अत्यंत मोलाचा ठरतो. आपल्या निकोप आणि सर्वांगीण विकासाकरिता जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी आपला मौलिक विचार अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्यांनी आई-वडिलांच्या सेवेला ईश्वरसेवेच्या समान मानले आहे. म्हणूनच भक्त पुंडलिकाचे उदाहरण देऊन आई-वडिलांची सेवा ही ईश्वराचीच पूजा असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
Saint Tukaram Maharaj : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आईचं मन आपल्या मुलांविषयी कसं असतं ते सांगितलं आहे. त्याप्रमाणं या संसार सागरात आई जेवढी महत्त्वाची तेवढाच बापसुद्धा महत्त्वाचा असतो. संसारची ही दोनं चाकं जर का एकमेकांना समजून चालत नसतील तर संसार अत्यंत कठीण आहे. परंतु ते का समांतर चालत असतील तर संसारात आनंदाला तोटा नाही. म्हणूनच आईचं वात्सल्य आणि पित्याचं कर्तृत्व महान ठरतं.
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007