मानोरा,
crop insurance तालुयातील खरीप हंगाम ऐन भरात असताना दोन आठवड्यापेक्षा अधिक दिवस पावसाने ओढ दिल्याने मुख्य पीक असलेले सोयाबीनचे पीक हातातून गेल्याने शासनाने विविध निकष लावून शेतकर्यांना मंजूर केलेली पिक विमा राशी तोकडी असल्याची ओरड नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकर्यांकडून पुढे येत आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागू शकतो हा भविष्यातील धोका ओळखून शासनाकडून खरीप व रब्बी हंगामातील विशिष्ट पिकांना पिक विमा च्या कवचाद्वारा संरक्षण दिले गेले आहे. केवळ एक रुपया एवढी नाममात्र राशी शेतकर्यांना भरावयाची होती, उर्वरित पीक विम्याची जोखीम राशी शासनाकडून भरण्यात आली असताना खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना मात्र नुकसान झाल्याच्या प्रमाणात शासनाने मंजूर केलेल्या भरपाई पेक्षा अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकर्यांमधून तीव्र प्रतिक्रिया पुढे येत आहे.crop insurance वाशीम जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्यांसाठी १०५ कोटी ७९ लाख रुपये अग्रीम रक्कम पिक विमा नुकसान भरपाई साठी मिळाले असल्याचे माहिती आहे.मानोरा तालुयातील शेतकर्यांच्या खात्यामध्ये मागील काही दिवसांपासून पीक विम्याची रक्कम जमा होत असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकरी केवळ दीड हजार रुपये मिळत असल्यामुळे ज्या शेतकर्यांच्या शेतशिवारात चार एकर सोयाबीन पीक होते आणि किमान एवढ्या शेतात ३० ते ३२ पोते सोयाबीन पासून जवळपास दीड लक्ष रुपयापर्यंत उत्पन्न मिळण्याची आस पावसाचा दीर्घ खंड आणि येल्लो मोझ्याक रोगाच्या प्रादुर्भावाने धुळीस मिळाली त्या शेतकर्याच्या खात्यात चार एकराचे सहा हजार रुपये जमा झाले असल्याची आपबीती शेतकर्यांने विशद केली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना २५ टक्के प्रमाणे पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याचे सांगितले गेले असताना कुठल्या निकषाने एवढी नाममात्र भरपाई शेतकर्यांना दिली जात आहे वा भविष्यात आणखी भरपाई मिळेल का, असे अनेक गंभीर सवाल या निमित्ताने शेतकर्यांकडून उपस्थित केल्या जात आहे.