तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Sudhir Mungantiwar : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी 5718.30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शहरात मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या यादीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भर पडली असून, क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात असून, विविध क्रीडा संघटनांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालकमंत्री, क्रीडामंत्री तसेच शासनाचे आभार मानले आहेत. यापूर्वी या संकुलाकरीता 20 कोटी रुपये खर्च झाले असून, 7718.20 लाख रुपयांची सुधारित मान्यता प्रदान करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल सुसज्ज असावे आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा प्राप्त व्हाव्यात, अशी मागणी चंद्रपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेळाडूंनी पालकमंत्री यांच्याकडे केली होती. यासाठी मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला होता. चंद्रपूर या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये अनेक गुणी खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सरावासाठी सुसज्ज मैदान उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच जिल्ह्यातील आदिवासी व इतर सर्व तरुणांना क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेता यावी, म्हणून माझा प्रयत्न सुरु आहे, असेही मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मिशन ऑलम्पिक 2036 ची तयारी करत असताना, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेची जबाबदारी चंद्रपूरवर सोपविण्यात आली, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. याच पृष्ठभूमीवर राज्य सरकारनेही जिल्हा क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीर केलेला निधी हा खेळाडूंचे मनोबल उंचाविणारा आहे, अशी प्रतिक्रियाही Sudhir Mungantiwar मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूरचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे : मुनगंटीवार
मैदानी खेळात चंद्रपूरचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, त्यांना यश मिळाले पाहिजे, यासाठी त्यांना क्रीडानुकूल वातावरण मिळावे, म्हणूनच पालकमंत्री म्हणून मी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. राज्य सरकारने याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी मागणीची दखल घेत सुमारे 57 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशा भावना सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानले आहेत.