तुका आकाशाएवढा
जीवनात सुखकर प्रवास व्हावा याकरिता सर्वच प्रयत्नात असतात. संघर्षमय असलेले जीवन जगता-जगता सुखाचा मार्ग शोधत जावा लागतो. तो शोधत असताना आत्मविश्वास हा अत्यंत जरूरीचा असतो. तो प्राप्त करण्याकरिता तेवढीच निष्ठा व श्रद्धा लागत असताना दिसते. म्हणूनच हे विसरून चालणार नाही. विकारावर विजय मिळविण्यासाठी केवळ कल्पित गोष्टींच्या आधारावर विजय मिळविता येत नाही. त्यासाठी गाठीशी अनुभव असावा लागतो. अनुभवाच्या आधारावरच जीवनात परिवर्तन घडू शकते. विकारावर विजय मिळविण्याकरिता अनुभव श्रेष्ठ ठरतो आणि याच मताशी संत तुकाराम महाराज ठाम असल्याचे दिसून येतात.
आयुष्यभर Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. हे घालत असताना अनेक प्रकारचे अनुभव त्यांनी आत्मसात केले. याच अनुभवाच्या शिदोरीवर समाजाला चांगली शिकवण दिली.
मानवतावादी विचारसरणीचा पुरस्कार करत असताना विरोधकांशी सामना करीत आपलं सर्वस्व पंढरीचा पांडुरंग असल्याचे ठामपणे मांडले. जनसेवा हीच ईश्वर सेवा त्यांनी शेवटपर्यंत आचरणात आणली व ईश्वर भक्ती किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी अनुभवाच्या जोरावर समजावून सांगितले. काल्पनिक कथा सांगून परिवर्तनाची धार बोथट होते. कारण अशा प्रकारच्या कथा कथन करून समाज प्रबोधन होत नाही. होत असेल ते मनोरंजनच. म्हणूनच संघर्षाला सामोरे जात असताना त्यामधून यशस्वीरीत्या बाहेर कसे पडावे याकरिता अनुभव लागतो. अनुभवाच्या ताकदीवर जिंकता येऊ शकते. त्याच वेळेस आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. प्रत्यक्ष कृतीचा असलेला अनुभव महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच देव हा माणसांच्या हृदयातच असतो, हे अनुभूतीच्या जोरावर आपल्या जवळपासचे उदाहरण देऊन दाखवून दिले. ते आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतांना दिसतात. जीवनात अनुभव किती श्रेष्ठ ठरतो हे सांगताना म्हणतात की,
नका दंत कथा येथें सांगों कोणी।
कोरडे ते मानी बोल कोण॥
अनुभव येथें पाहिजे साचार।
न चलती चार आम्हापुढे॥
वरी कोण मानी रसाळ बोलणें।
नाही झाली मने ओळखितो॥
निवडी वेगळें क्षीर व पाणी।
राजहंस दोन्ही वेगळालीं॥
तुका म्हणे येथें पाहिजे जातिचें।
येर गाबाळाचें काय काम॥
अ. क्र. 2460.
अनुभवाच्या जोरावर विचारसणीचं वैशिष्ट्य लक्षात घेताना केवळ काल्पनिक प्रसंग सांगून काही निष्पन्न निघत नाही. मग ते बोल व्यर्थ ठरतात. जी गोष्ट व्यर्थ असून ती सांगण्यात काहीच अर्थ उरत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धाचा व युद्धनीतीच्या सखोल अभ्यासाबरोबरच दांडगा अनुभव असल्यामुळे कमी सैनिक बळ असतानासुद्धा त्यांनी बलाढ्य शत्रूवर मात करीत अनेक किल्ले काबीज केले. त्यांनी जर काल्पनिक गोष्टी कथन केल्या असत्या तर त्यांना एकही किल्ला काबीज करता आला नसता. रयतेला स्वतंत्र, समता, बंधुता, सदाचार प्रदान करता आली नसती तसेच शत्रूपासून संरक्षणही करता आले नसते. एवढंच नाही, तर त्यांनी कर्तृत्वाला जास्त महत्त्व देऊन शुभ-अशुभतेला तिलांजली दिल्यामुळेच अमावास्येच्या रात्रीसुद्धा शत्रूवर चाली करून विजय संपादन केला. जर का ते काल्पनिकतेला महत्त्व देऊन शुभ-अशुभ पाहात बसले असते तर स्वराज्य स्थापनेचे अंतिम ध्येय साध्य करता आले नसते. म्हणूनच दंतकथेला Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी स्थान दिले नाही. कारण अशा कोरड्या बोलांना काहीही अर्थ उरत नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते.
त्यांच्या मते अनुभव हा प्रमाण मानावयास पाहिजे. त्यानुसार आपली योग्य दिशा ठरवावी. उदा. एखादा जर का आजारी पडला असेल तर त्याला त्याचे आरोग्य ठीक करायचे असेल तर त्याकरिता त्याला वैद्यापर्यंत घेऊन जावे लागेल किंवा वैद्याला बोलवावे लागेल व लवकरात लवकर बरे होण्याच्या द़ृष्टीने औषधोपचार करावा लागेल किंवा एखाद्याला शिक्षण घ्यावयाचे असेल तर त्याला शिक्षकाकडे जाऊन योग्य ती शैक्षणिक साधणे वापरून शिक्षण घ्यावे लागेल किंवा आपल्याला आपलं आयुष्य आनंददायी घालवावयाचे असेल तर संतांचा उपदेश घ्यायला त्यांच्या आश्रमापर्यंत जावंच लागेल; तरच तो प्रत्यक्षपणे संतांचा उपदेश घेऊन आचरण शुद्ध ठेवू शकतो किंवा शिक्षकाकडे जाऊन ज्ञान ग्रहण करू शकतो. त्याचप्रमाणे आरोग्य निरोगी ठेवावयाचे असेल तर त्याला वैद्याकडे जाऊन औषधोपचार करावाच लागेल. केवळ काल्पनिक माहितीच्या आधारावर कोणताच विकास शक्य नाही. म्हणूनच कुठल्याही प्रकारचे नखरे किंवा चाळे करून चालणार नाही, तर अनुभवाचे प्रमाण निश्चित करून त्या मार्गाने जाणे गरजेचे आहे. एकदा काय ते ठरलं ती त्याच्यानुसार आचरणात आणल्यास माणसाच्या हृदयात असलेल्या देवाचे आपोआप दर्शन झाल्याविना राहणार नाही. माणसातला चांगूलपणा म्हणजे देवत्व होय. म्हणूनच आपलं कार्य हे प्रमाण ठरलं पाहिजे. आधार नसलेल्या कोरड्या गोष्टीला कुणीही मान्यता देणार नाही. अनुभव गाठीशी असणे गरजेचे आहे. केवळ ऐकीव माहितीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. केवळ नेहमीच गोड-गोड बोलून जिंकता येत नाही. असे गोड बोलणारे ओळखूच येतात. त्यांचा परिचय विवेकी लोकांना द्यायची गरज भासत नाही. ते बरोबर ओळखतात. बदक आणि राजहंस जवळपास सारखेही दिसत असले, तरी अनुभवाच्या कसोटीवर उतरल्यानंतर राजहंस कोणता, हे त्वरित लक्षात येतं. कारण राजहंस बरोबर दूध व पाणी वेगळं करून दाखवित असतो व आपली सिद्धता सिद्ध करतो. परंतु बदक मात्र ही सिद्धता सिद्ध करण्यास असमर्थ ठरतो. ही बाब अनुभवावरूनच सिद्ध होत असते. म्हणून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी अनुभवाला जास्त महत्त्व दिले आहे.
Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज म्हणतात की, आपली सिद्धता सिद्ध करण्यासाठी कोरडे बोल बोलणारे कधीही सिद्धता सिद्ध करू शकत नाही. हे काम गबाळ्यांचे नाहीच. कार्यक्षमता ज्याच्यामध्ये आहे असे कर्तृत्ववान लोक सामाजिक कार्य करू शकतात. म्हणूनच अनेक चांगल्या गोष्टी तज्ज्ञांकडून तपासून घेतल्या जातात. तेव्हाच अंतिम निर्णय घेतला जात असतो. म्हणूनच संतांच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण अनुभवाच्याच आधारावर ते मार्गदर्शन करीत असतात. जसे एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्याला कोणती सामग्री लागते, याची माहिती विवेकी माणसाला असते. दररोजच्या पाहण्यातील उदाहरणच घ्यावयाचे झाल्यास नवनीत म्हणजे लोणी सर्वांनीच पाहिलेलं आहे. परंतु ते कसं तयार होते हे फक्त तीच गृहिणी सांगू शकेल जिला त्याचा अनुभव आहे. केवळ दंतकथा ऐकून लोणी काढता येणार नाही. लोणी तयार करण्यासाठी दूध आणण्यापासून तर तयार होणार्या लोण्यापर्यंतच्या प्रक्रियेची परिपूर्ण माहिती असावी लागते. हीच अनुभवाची शिकवण महाराजांना द्यावयाची होती. अनुभवाला किती महत्त्व आहे हे यावरून स्पष्ट होते. अशी प्रयत्नपूर्वक साधना करावी लागते. तेवढे सातत्यपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
समजा एखाद्याला खूप भूक लागली असेल तर त्याला अन्नाऐवजी काल्पनिक खाद्य पदार्थ त्याच्या समोर कथेच्या माध्यमातून दिले तर त्याची भूक भागेल काय? तर, याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल. त्याला प्रत्यक्ष त्या वस्तू द्याव्याच लागतील तेव्हाच कुठे त्याला भुकेवर आवर घालता येईल. याचप्रमाणे माणसा-माणसामध्ये जर प्रेमाची भावना, आपुलकी, जिव्हाळा निर्माण करावयाचा असेल तर त्यांचा एकमेकांशी संपर्क घडून आणणे जरूरीचे आहे. भेटल्याशिवाय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होणार नाही. आलेल्या समस्या दूर करता येणार नाही. खर्या-खोट्यातला भेद समजणार नाही. म्हणून हे सर्व समजावं त्याकरिता एकत्र येणं गरजेचं आहे. प्रत्यक्षपणे जेव्हा एकमेकांच्या जवळ येऊ तेव्हा सावधानतेनं कसं वागावं हे लक्षात येऊन खोटं वागणार्यास धडा शिकवू शकू. म्हणूनच महाराज म्हणतात की,
तांबगी हे नाणें न चले खर्या मोले।
जरी हिंडविले देशोदेशी॥
अ. क्र. 3172.
खर्या-खोट्याचा न्याय करताना अनुभव किती महत्त्वाचा असतो, हे या अभंगाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. एखादी वस्तू इतर वस्तूच्या आकारासारखी असेल म्हणून ती मूळ वस्तूचं मूल्य, रूप धारण करू शकत नाही. सोन्याच्या नाण्याची किंमत तांब्याचे नाणे कसे करू शकेल? आकार, वजन जरी सारखे असले, तरी ते अनुभवाच्या जोरावर तज्ज्ञ लोक सोनं व चांदीचं नाणं बरोबर ओळखतील तसेच गारगोटी हिर्यासारखी चमकतही असेल म्हणून ती काय हिर्याची बरोबरी थोडीच करणार! त्याचप्रमाणे साधूच्या वेशातील दांभिक ओळखून त्यांना बरोबर जेलचा मार्ग दाखविलेला आहे. निव्वळ त्यांच्या पोशाखावरून साधू ठरवता येणार नाही. खरा संत आणि दांभिक बरोबर ओळखू येतात. म्हणूनच आजवर अनुभवाच्या भरवशावर अनेक दांभिकांना धडा शिकविण्यात जनता यशस्वी झालेली आहे. यावरून जीवनात अनुभव किती महत्त्वाचा ठरतो, हे लक्षात आणून दिले आहे. खोटे फार काळ टिकत नसते. Saint Tukaram Maharaj महाराजांनी अनुभव हा काल्पनिक गोष्टीपेक्षा प्रत्यक्षात किती वेगळा असतो, हे अनेक दाखले देऊन स्पष्ट केले आहे.
- प्रा. मधुकर वडोदे
9422200007