तभा वृत्तसेवा
पुसद,
Pusad ring road 2023 च्या अर्थसंकल्पात 54 कोटी 22 लाखाचा प्रस्ताव देण्यात आल्याने रिंग रोडसाठी पुसदच्या भोवतालची 65 हेक्टर जमीन भूपसंपादन करण्याच्या कारवाईस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अखेर पुसदला रिंग रोड होणारच..! अशी आशा पुसदकरांमध्ये पल्लवीत झाली आहे.
विदर्भाच्या एका टोकाला असणारे पुसद शहर विदर्भ मराठवाड्याला जोडणारे एक महत्वाचे शहर समजले जाते. त्यामुळे विदर्भातून मराठवाड्याकडे होणारी जड वाहतूक पुसदकरांसाठी डोकेदुखी ठरली होती. भर शहरातून होणारी ही जड वाहतूक जणू अपघात प्रवण क्षेत्र झाले आहे. फू.ना. ते बा. ना. रस्त्यावरून अनेकांचे बळी सुद्धा गेले आहेत. Pusad ring road त्यामुळेच पोलिस वाहतूक यंत्रणेवर प्रश्न चिन्ह लागले होते. या कारणास्तव पुसद शहराला वळसा घालणारा रिंग रोड हवा होत. सुमारे 24 किलोमिटर अंतर असलेल्या प्रस्तावीत रिंग रोडसाठी अनेकवेळा आंदोलनेही झाली. त्यासाठी विकास कामे निर्माण कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर आणि सहकार्यांकडून खासदार भावना गवळी व आमदार नीलय नाईक यांच्या मार्फत शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला होता.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ यांनी संबंधित मंत्रालयाला 2023 च्या अर्थसंकल्पात 54 कोटी 22 लाखाचा प्रस्ताव दिला होता. या रिंगरोडसाठी पुसदच्या भोवतालची 65 हेक्टर जमीन भूपसंपादन करण्याच्या कारवाईस प्रारंभ झाला आहे. या रिंग रोडमुळे संबंधित शेतकर्यांना सुमारे 184 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. विशेष म्हणजे आमदार नीलय नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रस्तावीत रिंग रोडच्या मंजुरातीसाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर अंदाजे 350 कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.