कानपूर,
भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष Girish Awasthi गिरीश अवस्थी यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता कानपूर येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बालपणापासूनच ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. अनेक वर्षे ते संघाचे प्रचारक होते. अत्यंत कडक शिस्तीचे तसेच देशभर कार्यकर्ते व कामगार जोडणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांचे ते सहकारी होते.
Girish Awasthi गिरीश अवस्थी हे संरक्षण उद्योगातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी संरक्षण उद्योगात भारतीय मजदूर संघाची संघटना स्थापन करून प्रभावी करण्यात भरीव योगदान दिले. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष, महामंत्री आदी विविध जबाबदार सांभाळताना, भारतीय मजदूर संघाचे अ. भा. उपाध्यक्ष आणि कटक येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. संरक्षण खात्यातील कर्मचार्यांच्या न्याय मागण्या जसे, सेवानिवृत्तीचे वय 60 करणे, बोनसवरील मर्यादा हटवणे, महागाई भत्ता वाढ आदी त्यांनी मंजूर करून दिल्या.
कानपूर येथील गंगा नदीच्या किनार्यावरील घाटावर Girish Awasthi गिरीश अवस्थी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनाने भारतीय मजदूर संघाची व कामगार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट प्रदेशाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.