तभा वृत्तसेवा
अमरावती,
Bhushan Gavai : वकिली क्षेत्र मोठे आव्हानात्मक आहे. दररोज होणार्या न्यायालयीन घडामोडीसह प्रत्येक क्षेत्राच्या लहान मोठ्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते. असे असतांना सुद्धा विधी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अमरावती न्यायालयात सेवा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ एका दीपस्तंभासारखे आहेत. आजवर अनेक वकील घडलेत, त्यामागे खर्या अर्थाने अमरावती न्यायालयात सेवा देणार्या व न्यायदानात मोलाची भूमिका निभावणार्या ज्येष्ठ दिवंगत विधिज्ञ यांचे अनमोल मार्गदर्शन आणि त्यांची प्रेरणा सर्वश्रुत आहे. त्यामुळे ज्येष्ठ आणि दिवंगत अधिवक्त्यांच्या केलेल्या अपार कष्टाचे खर्या अर्थाने आज सर्वोच्च फलित झाल्याची भावना सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई Bhushan Gavai यांनी व्यक्त केली.
अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित दिवंगत अधिवक्त्यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी विचारपीठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासनिक न्यायमूर्ती एन. डब्ल्यू. संब्रे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एस. किलोर व न्यायमूर्ती ए. एल. पानसरे तसेच जिल्हा व सत्र न्यायालय अमरावतीचे प्रमुख न्यायाधीश एम. आर. देशपांडे, अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिरीष जाखड व सचिव अॅड. उमेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी अमरावती न्यायालयात सेवा देणारे प्रेरणादायी अधिवक्ता स्व. एम. एम. अग्रवाल, स्व. एस. आर. तिवारी, स्व. पी. वाय. देशपांडे, स्व. डी. आर. कुलकर्णी, स्व. पी. एन. राठी यांच्या तैलचित्राचे न्या. भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उपस्थित अतिथींच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत अधिवक्त्यांच्या कुटुंबियांना न्या. भूषण गवई Bhushan Gavai यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
माझ्या यशात स्व. राठी यांचा सिंहाचा वाटा
दिवंगत अधिवक्ता स्व. पी. एन. राठी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे मला यशाचा मार्ग मिळाला. माझ्या यशात स्व. राठी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे यावेळी न्या. भूषण गवई Bhushan Gavai यांनी म्हटले. शिवाय राठी यांच्या कुटुंबियांना स्मृतिचिन्ह देण्यासाठी न्या. गवई यांनी विचारपीठावरून खाली उतरून स्व. राठी यांच्या पत्नीला स्मृतिचिन्ह देत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित सर्व भारावून गेले होते. यावेळी माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या.