- प्रशांत दामलेंच्या हस्ते झाले उद्घाटन
सांगली,
अखिल भारतीय Marathi Natya Sammelan मराठी नाट्यसंमेलनाचा शुक्रवारी नाट्य पंढरी सांगलीमध्ये थाटात शुभारंभ झाला. नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटा वाजवून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी नाट्य विश्वासाठी यंदाचे वर्ष खास आहे. कारण, मराठी नाट्य संमेलनाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचेच औचित्य साधून नाट्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या सांगलीत शंभराव्या संमेलनाच्या शताब्दी वर्षाचा मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या निमित्ताने दोन दिवस सांगलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
यंदाचे नाट्यसंमेलनाचे शंभरावे वर्ष असल्याने ते ठिकठिकाणी साजरे करण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, मुंबई इथेही संमेलन होणार असून, समारोप रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे. नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, उदय सामंत, शरद पवार ही सर्व मंडळी नाट्यवेडी आहेत. ही मंडळी नेहमीच आमच्या पाठीशी असतात. आम्हाला काय हवं आणि काय नको, हे त्यांना माहिती आहे. नाटक म्हटले की, त्यात नाट्य हवे. मी नाटकवाला असल्याने मला प्रत्येक कामात नाट्य लागते. नाट्य संमेलनादरम्यान नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. एकावेळी सगळे कलाकार एकत्र येण्यासाठी नाट्यसंमेलन ही योग्य जागा आहे. नवोदित कलाकारांना मार्ग दाखवण्याचे काम नाट्यपरिषदेकडून केले जाणार आहे. Marathi Natya Sammelan नाट्यसंमलेनासाठी शासनाने खूप मदत केली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून मुंबईत येणार्या नवोदित कलाकारांची राहण्याची अडचण आहे. शासनाने या कलाकारांची राहण्याची सोय करावी. नाट्य परिषदेकडून या नवोदित कलाकारांच्या राहण्याची आम्ही व्यवस्था करू, असेही यावेळी प्रशांत दामले म्हणाले.