दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय!

03 Dec 2023 05:55:00
- प्रा. जनार्दन पाटील
अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला क्षण आला आणि 'Operation Silkyara' बोगद्यात अडकलेले 41 कामगार सुखरूपपणे बाहेर आले. दीर्घकाळ बंदिस्त अवस्थेत अडकूनही बाहेर पडण्याची आशा मजुरांनी कधीच मरू दिली नाही. खरे सांगायचे तर त्यामुळेच ते आज जिवंत आहेत. इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळेच ते पुन्हा मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकले. बोगद्यात अडकल्यानंतर या 41 मजुरांसमोर फक्त अंधार होता. त्यांना काहीच दिसत नव्हते. बचावकार्य सुरू झाले आणि बोगद्यात अडकलेल्या मजुरांची जगण्याची धडपडही सुरू झाली. यातून मार्ग काढण्यास बराच वेळ लागणार असल्याचे मजुरांच्या लक्षात आले होते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी कामगारांची इच्छाशक्ती सरकारी यंत्रणांनी बळकट केली. त्यातून हे कामगार वेळ घालवण्याचे मार्ग शोधू लागले. कधी कधी तज्ज्ञ, बुद्धिवाद्यांना जमत नाही ते सामान्य मजूर सहजसाध्य करतात, हे या प्रकरणातून सिद्ध झाले. त्यांनी बोगद्याच्या आत मनोरंजनाचे साधन शोधून काढले. अडकलेले मजूर ‘चोर-पोलिस’पासून तीनपत्ती आणि रम्मीपर्यंतच्या खेळात व्यस्त राहिले. हळूहळू बोगदा त्यांच्यासाठी खेळाचे मैदान बनले. ते बोगद्यातून बाहेर येण्यास उत्सुक होतेच; पण धीरही राखून होते. बोगद्यात नियमित चालणे, योगासने, प्रशासनाच्या मदतीने कुटुंबीयांशी बोलणे हे उपाय 41 मजुरांसाठी जीवनदायी ठरले. नियमित दिनचर्येने मजुरांनी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवले. सुदैवाने बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सातत्याने संपर्क सुरू होता.
 
 
'Operation Silkyara'
 
सहा इंचांचा पाईप मजुरांसाठी जीवनदायी वाहिनीसारखाच होता. या पाईपद्वारे अधिकार्‍यांनी मजुरांना मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स दिले गेले. खैनीची खेपही मजुरांना पाठविण्यात आली. या पूर्ण काळात अडकलेल्या मजुरांची पूर्ण काळजी घेण्यात आली. मानसोपचारतज्ज्ञ सतत त्यांच्या संपर्कात होते. मनोचिकित्सकांनी, काही कार्यकर्त्यांनी त्यांना योगासने करण्यास सुचवले आणि मनोबल टिकविण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहण्याचे पथ्य पाळले. अडकलेल्या मजुरांना आवश्यक त्या औषधांचे डोस वेळेवर मिळाले. 'Operation Silkyara' सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बोगद्यातील मजुरांना वेळेत अन्न पोहोचविता आले. आरपार प्रवास करू शकलेल्या सहा इंची पाईपमुळे हे काम अगदी सोपे झाले. या 16 दिवसांमध्ये त्यांना केळी, सफरचंदाचे तुकडे, दलिया, खिचडी यासह अनेक खाद्यपदार्थ पाईपद्वारे पाठविण्यात आले. सुदैवाने मजुरांना पिण्याच्या पाण्यासाठी बोगद्यात नैसर्गिक पाण्याचा स्रोत होता. हे नसते आणि कोणतीही अनुचित घटना घडली असती तर केंद्र आणि राज्य सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असता. मात्र, सुदैवाने असे काही घडले नाही.
 
 
या संपूर्ण घटनेने नैसर्गिक आपत्तींबाबत संवेदनशील असणार्‍या उत्तराखंडला अनेक धडे शिकवले आहेत. या दुर्घटनेनंतर केवळ उत्तराखंडमध्येच नव्हे, तर देशभरात बोगद्याच्या उभारणीच्या धोरण-नियोजनाकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे वेगळ्या नजरेने बघितले जाण्याची खात्री आहे. आता योजनांचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व बोगद्यांचा नव्याने विचार करावा लागेल. 'Operation Silkyara' ‘ऑपरेशन सिलक्यारा’ यशस्वी झाल्यामुळे राज्यातील प्रस्तावित बोगद्याच्या प्रकल्पांवरील चिंतेची छायाही दूर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एखादी दुर्घटना घडली असती तर प्रस्तावित बोगद्याच्या विरोधात आवाज उठला असता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या उत्तराखंडमध्ये अनेक बोगदे बांधले जात असून पुढेही अनेक बोगदे बांधले जाणार आहेत. रुद्रप्रयागमधील केदारनाथ रस्त्यावरील बोगदे आणि दतकलीजवळील बोगदे ही याचीच काही उदाहरणे आहेत. तसेच गढवाल आणि कुमाऊच्या डोंगराळ भागात रेल्वे आणि रस्ते जोडणीसाठी प्रस्तावित प्रकल्पांमध्ये अनेक बोगद्यांची तरतूद करण्यात आली आहे. मसुरी, डेहराडून आणि तेहरी दरम्यानही बोगदा बांधण्याच्या योजनेवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. आता ताज्या आपत्तीतून सावरल्यानंतर आणि सुरक्षित देवभूमीवर विश्वास निर्माण झाल्यानंतर सरकार उत्तराखंडला देशातील आघाडीचे राज्य बनवण्याच्या योजनेसह पुढे जात आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे एक दशकापासूनचे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी देश आणि जगातील गुंतवणूकदारांना उत्तराखंडमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्लोबल इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्सपूर्वी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न थांबले होते; परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, या ऑपरेशनच्या यशामुळे उत्तराखंडमध्ये महत्त्वपूर्ण योजना राबविण्याच्या बाबतीत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली आहे. खरे पाहता हिमालयाच्या नाजूक पर्वतरांगांमध्ये वसलेल्या उत्तराखंडमध्ये आपत्तींची मालिका कधीच थांबणार नाही. मात्र, ताज्या दुर्घटनेने उत्तराखंडसारख्या आपत्तिग्रस्त राज्यालाही धडा शिकवला की, आपत्तींमध्ये वारंवार केंद्रीय यंत्रणांकडे संपर्क साधता येत नाही तर स्वतःहून ठोस तयारी करावी लागेल. या ‘ऑपरेशन सिलक्यारा’च्या यशस्वितेसाठी उत्तराखंड सरकारने समर्थतेचे दर्शन घडवण्यात कोणतीही कसर सोडली नाही; परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, सरकारला आणखी तयारी करावी लागेल. कारण प्रत्येक वेळी सिलक्यारा आपत्तीप्रमाणेच संकटे येणार नाहीत. स्वरूप वेगळेही असू शकते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित उपकरणे, कुशल मनुष्यबळ आणि कुशल तंत्रज्ञ तयार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने स्वत:हून परिपूर्ण असायला हवे.
 
 
महत्त्वाची बाब म्हणजे 'Operation Silkyara' उत्तर काशीतील बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरीत्या सुटका करणारे ‘ऑपरेशन सिलक्यारा’ हे बोगद्यामध्ये किंवा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे देशातील सर्वात मोठे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ ठरले आहे. यापूर्वी 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा खाणीतून 65 कामगारांना दोन दिवसांच्या ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. त्यासाठी देशभरातील तसेच जगभरातील तज्ज्ञांनी रात्रंदिवस काम केले होते. 13 नोव्हेंबर 1989 रोजी पश्चिम बंगालमधील महाबीर कोलियरी राणीगंज कोळसा खाण पाण्याखाली गेली. यामध्ये 65 मजूर अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी खाण अभियंता जसवंत गिल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पाण्याने भरलेल्या खाणीत 7 फूट उंच आणि 22 इंच व्यासाची स्टीलची कॅप्सूल पाठविण्यासाठी नवीन बोअरहोल तयार करण्याची कल्पना त्यांना सुचली. दोन दिवसांच्या ऑपरेशननंतर सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्या ऑपरेशनमध्ये गिल यांनी स्वतः स्टीलच्या कॅप्सूलमधून खाणीत जाऊन लोकांना वाचवले होते. या धाडसाप्रीत्यर्थ त्यांना 1991 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी सर्वोत्तम जीवनरक्षा पदक प्रदान केले होते. त्या ऑपरेशनमध्ये मजुरांची संख्या सिलक्यारापेक्षा जास्त असली, तरी त्यांना बाहेर काढण्यासाठी कमी वेळ लागला होता.
 
 
हरयाणातील कुरुक्षेत्राजवळील हलदेरी गावात 2006 मध्ये अशीच एक मोहीम राबविण्यात आली. तेव्हा प्रिन्स हा पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. सुमारे 50 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या बालकाला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले होते. या ऑपरेशनमध्ये तीन फूट व्यासाच्या लोखंडी पाईपद्वारे अशाच प्रकारची आणखी एक बोअरवेल जोडली गेली आणि आत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यात आले. 23 जून 2018 रोजी वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघ थायलंडमधील थाम लुआंग गुहेत गेला आणि पावसामुळे पाणी साचल्यामुळे आत अडकला. गुहेतील वाढत्या पाण्यामध्ये खेळाडूंना शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. सुमारे दोन आठवडे सुरू राहिलेल्या या कारवाईत तब्बल 90 तज्ज्ञ तैनात करण्यात आले होते. अथक प्रयत्नांनी या सर्वांनी मिळून संघाला बाहेर काढले. या बचाव मोहिमेत माजी थाई नेव्ही सील समन कुनान यांना आपला जीव गमवावा लागला. हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे बचाव कार्य मानले जाते.
 
 
5 ऑगस्ट 2010 रोजी सॅन जोस सोने आणि तांब्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत 33 कामगार गाडले गेले होते. जमिनीपासून सुमारे दोन हजार फूट खोल अडकलेल्या या कामगारांशी संपर्क साधणेही कठीण होते. तब्बल 17 दिवसांच्या मेहनतीनंतर पृष्ठभागाखाली एक लाईफलाईन छिद्र तयार करण्यात आले आणि त्याद्वारे अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी आणि औषध पाठवता आले. 69 दिवसांनंतर 13 ऑक्टोबरला एक-एक करून सर्व कामगारांना 'Operation Silkyara' बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. अशाच प्रकारे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील खाणीतही नऊ कामगार अडकले होते. मात्र, 22 इंच रुंद लोखंडी रिंगच्या साहाय्याने 77 तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढता आले. थोडक्यात आपत्ती येतात. निवारण करण्यासाठी पथकेही पुढे सरसावतात. अशा वेळी संकटग्रस्तांनी धीर न सोडता त्यांना साह्य करणे गरजेचे असते. ते साधले तर पुढचे अवघड आव्हान पेलणेही सोपे होते.
Powered By Sangraha 9.0