ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला...

03 Dec 2023 05:45:00
तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : माणसाचं व्यक्तिमत्त्व पाहून तो कोणत्या वृत्तीचा आहे, हे लक्षात येते. त्याच्या वृत्तीचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. ते याकरिता की, आपलं आयुष्य त्याच्या संगतीनं नाश होऊ नये याकरिता खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच एकदा जी वृत्ती बनली; मग त्यामध्ये बदल होणे शक्य नाही. बदलास मनाचा खूप मोठेपणा लागतो. बर्‍याच वेळा आपण नीट वागत नसल्याचे समोरच्याचे लक्षातही येते, परंतु आधीपासून बनलेल्या वृत्तीमुळे ती गोष्ट टाळणे त्याला शक्य होत नाही. म्हणून वाईटाची संगती करणे कधी-कधी नव्हे तर नेहमीच महागात पडत असते.
 

tukaram 
 
या संदर्भाची अनुभूती अनेकांनी घेतलेली आहे. समाजात आपण हे नेहमीच पाहतो. खरं तर हे पाहत असूनही आपण त्यापासून धडा घेत नाही व आपणच आपल्या आयुष्याशी खेळत असतो. सद्गुण व दुर्गुणातला फरक आपल्याला समजावा; कुसंगतीमुळे सात्त्विकता कशी भंग होते, हे समजण्याच्या द़ृष्टीने Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून कुसंगतीचे दुष्परिणाम काय होतात, त्याचप्रमाणे अशांची संगत लाभल्यास चांगल्या आयुष्याचा सत्यानाश कसा होऊ शकतो, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आयुष्यात सावधानतेने जगावे. नैतिकतेचा मार्ग सोडू नये. हीच बाब संत तुकाराम महाराजांना इथे अभिप्रेत आहे. ते म्हणतात की,
 
ढेकणाचे संगें हिरा जो भंगला।
कुसंगें नाडला साधु तैसा॥
ओढाळाच्या संगें सात्त्विक नासलीं।
क्षण एक नाडलीं समागमे॥
डांकाचे संगती सोनें हीन जालें।
मोल तें तुटले लक्ष कोडी॥
विशानें पक्वांन्नें गोड कडू जालीं।
कुसंगाने केली तैसी परी॥
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा।
कुसंग हा फेरा चौर्‍यांशीचा॥
अ. क्र. 1952
खरा हिरा अत्यंत कणखर असतो. त्याच्यामध्ये आघात सोसण्याचं बळ भरपूर असते. त्याचं सौंदर्य खुलविण्यासाठी त्यावर पैलू पाडावे लागतात. पैलू पाडत असताना त्यावर घणाचे आघात करावे लागतात. असे हे घणाचे कितीही घाव केले तरी तो तुटत नाही. परंतु पैलू पाडताना त्याला नको असलेला भाग मात्र तो सोडत असतो. त्यामुळे ते अधिक आकर्षक दिसते. असा हा एवढा कणखर असलेला लोखंडी घणाचे घाव करूनही तो तुटत नाही. परंतु हिर्‍याच्या सान्निध्यात जर ढेकून आल्यास तो मात्र भंगताना दिसतो. हा केवळ संगतीचा परिणाम दिसून येतो. Saint Tukaram Maharaj महाराजांनी हिर्‍याचे उदाहरण दिले ते याकरिता की, इथं हिरा म्हणजे सद्गुण व ढेकून म्हणजे दुर्गुण होय. म्हणून आपण सोबत कुणाशी करावी, हे लक्षात येतं. एका दुर्गुणामुळे आयुष्यभर चांगलं काम करणारा त्याच्या संगतीने बदनाम होतो. म्हणून मैत्री करताना खूप सावधान राहून करावी लागते. जसे दुधामध्ये एक मिठाचा खडा पडल्यास हजारो लिटर दूध नासून जाते. ते चहा करण्याच्या योग्यतेचे राहत नाही. म्हणून चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहणे गरजेचे ठरते. वास्तविक पाहता माणूस हा जन्मत: वाईट कधीच नसतो. जसे लहान मुलांकडे बघितल्यास ती अत्यंत निरागस वृत्तीची असतात. भेदाभेद, जातपात, द्वेष, मत्सर, चोरी, उच्च-नीचता यापासून ते खूप लांब असतात.
 
 
निखळ मैत्रीचे संबंध त्यांचे जूळलेले दिसतात. परंतु हेच मोठे झाल्यावर त्यांच्या वर्तणुकीत बदल झालेला दिसतो. असे होण्याचे कारण म्हणजे हा संगतीचा परिणाम होय. कारण दुर्गुण आत्मसात करण्यासाठी जास्त शिकावं लागत नाही. फार मेहनतही घ्यावी लागत नाही. जे दुर्गुण येतात ते संगतीमुळे. आज आपण पाहतो की, भ्रष्टाचार अगदी मुळापर्यंत गेलेला आहे. एक भ्रष्ट कर्मचारी सर्वांना भ्रष्टाचारी बनविताना दिसतो. एक लुटारू सोबतच्यांना लूटारू बनवित असतो. अशा या वृत्तीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. मुळात तिथलं वातावरणच भ्रष्ट स्वरूपाचं झाल्यानं भ्रष्ट स्वरूपाच्या नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतो. हा भ्रष्टाचार समुळ नष्ट करायचा असेल, तर त्या कार्यालयातीलच प्रमुख या गोष्टीला आळा घालू शकतात. नैतिकतेने प्रामाणिकपणे त्यांनी काम करायचं ठरवलं तर हे सर्व शक्य होऊ शकतं. वाईट गोष्टींना आळा बसू शकतो. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे- ‘जसा राजा तशी प्रजा.Saint Tukaram Maharaj ’ म्हणूनच महाराज म्हणतात, नैतिकतेने चालणारा साधू त्याची जर दुर्गुण व्यक्तीसोबत जर का संगत झाली तर तोसुद्धा त्या वृत्तीचा होण्यास फार काळ लागणार नाही. जसा सहवास तसे व्यक्तिमत्त्व फुलत जाते. रोग्याच्या संपर्कातला वैद्यसुद्धा रोगी होऊ शकतो. म्हणून तो आपली काळजी वारंवार घेत असताना दिसतो. म्हणून आपला संपर्क चांगल्या व्यक्तीसोबत कसा येईल या प्रयत्नात असावे.
 
 
आपल्यातला चांगूलपणा टिकविण्याच्या द़ृष्टीने आपण चांगल्या वृत्तीच्या लोकांशी संगत करावी अन्यथा आपली सात्त्विकता भंग होईल. आज समाजात कधी नव्हे तो तरुणवर्ग व्यसनाधीनतेकडे वळताना दिसून येत आहे. आपण कधी याचा विचार केला का; आपला मुलगा कुठे जातो? कुणाला भेटतो? रात्री-अपरात्री घरी का येतो? त्याचे मित्र कोण? ते काय काम करतात? या सर्व प्रश्नांचा भावार्थ लक्षात घेतल्यास आपल्या असे लक्षात येते की, आधी याला तर कोणतेच व्यसन नव्हते. मग आता हा एकाएकी कसा बिघडला? केवळ याचं उत्तर एकच येते; ते म्हणजे आपण केलेलं दुर्लक्ष. तो कुसंगतीमुळे व्यसनाधीन झालेला आहे. चोर, खुनी, बलात्कारी झालेला आहे. त्याने संगतीमुळे आधीच्या सात्त्विकतेच्या सर्व भिंती पाडून तो नालायक वृत्तीच्या गटामध्ये सामील झालेला आहे. आपण पालक म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्या एवढेच आपणही तेवढेच या गोष्टीला जबाबदार आहोत हे मान्य करायला पाहिजे. दुर्गुण घ्यायला फार जास्त अक्कल लागत नाही. हीच बाब स्त्रियांसाठी लागू होते. जसे बाजारात चांगल्या सोन्याची किंमत मोठी असते. त्याची किंमत त्याच्या गुणांनी ठरविली जात असते. परंतु, हेच बाजारात मौल्यवान ठरलेलं सोन्याला जर का इतर धातूचे सोबत डाग देऊन ते जर बाजारात आणले तर त्याची किंमत कमी होताना दिसते. याचा अर्थ तुम्ही जर नालायक धातूसोबत घट्ट मैत्री केल्यास परिणाम तत्काळ दिसून येतील. आता मिळालेली मान्यता कमी झाली तर त्याला तुम्हीच जबाबदार धरले जाल.
 
 
या संदर्भातील उदाहरणच पाहयचे झाल्यास ते असे की, एक अत्यंत हुशार मुलगा होता. त्याला दहावीपर्यंत पैकीच्या पैकी मार्क पडत होते. पुढे तो बारावीच्या परीक्षेला बसला. अभ्यासात एकदम हुशार होता. कोणताही प्रश्न तो सोडवत होता. परंतु, दिवाळीच्या सुटीत त्याचे वर्गातील कॉपीबहाद्दर मुलाशी मैत्री झाली. ही बाब त्याच्या वर्ग शिक्षकाच्या लक्षात येताच त्याचे पुढे नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांपर्यंत जाऊन ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र वडिलांनी या गोष्टीकडेे दुर्लक्ष केले. शिक्षकाचा मात्र नाईलाज झाला. अत्यंत हुशार, होतकरू विद्यार्थी अगदी शेवटच्या टप्प्यात झालेल्या मैत्रीचे शेवटी काय होणार? एक सडलेला आंबा दुसर्‍या अनेक चांगल्या आंब्यांना कसं सडवतो हे यावरून लक्षात येईल. Saint Tukaram Maharaj हा दुर्जन मुलगा त्याच्या सवयीनुसार त्याला अभ्यासापासून परावृत्त करण्यास यशस्वी झाला. कॉपी करून कमी श्रमात जास्त मार्क कसे पडू शकतात, याबाबत त्याने त्याला सखोल मार्गदर्शन केले. परीक्षा सुरू झाली होती. पहिले दोन पेपर त्याने कॉपी करून भरपूर सोडविल्याचा आनंद त्याला झाला होता. परंतु तिसरा पेपर सुरू असताना आज मात्र त्याची कॉपी, नक्कल पकडली गेली. त्याला तत्काळ गैरवर्तणुकीच्या अंतर्गत बाहेर काढण्यात आलं. आणि पुढचे पेपर देता येणार नसल्याचे पत्र त्याला मिळाले. आता मात्र त्याला वाईट वाटले. क्षमता असतानाही त्याने आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली होती.
 
 
हा मैत्रीचा परिणाम दिसून आला. वाईट संगतीमुळे आयुष्याचं तो नुकसान करून बसला होता. याही पुढे जाऊन आपण जर महाभारत पाहिलं असेल तर त्यामध्ये राधेय अर्थात कर्णाची दुरवस्था जी झाली त्यालाही मैत्रीच कारणीभूत असल्याचे लक्षात येईल. आई-वडिलांनी समजावून सांगितल्यानंतरही न ऐकल्यामुळे एवढा शूरवीर असताना अयशस्वी ठरला. तो जर पांडवांच्या सहवासात आला असता तर निश्चित त्याची हानी झाली नसती. त्याची अफाट शक्ती व चांगला योद्धा हाच त्याचा परिचय असताना अहंकारी दुर्योधनाच्या सहवासाने तो नीतिवान असूनही नीतिमत्ता विसरला होता. परिणाम अपमानाशिवाय त्याच्या हाती काहीच लागले नाही. म्हणून आपल्या क्षमतेनुसार सन्मान प्राप्त करावयाचा असेल तर धर्म सोडू नये. सज्जनाने जर अधर्माची संगत केली तर त्याच्या अस्तित्वाचा नाश अटळ आहे. जसे अन्य धातूचा डाग दिल्यास सोन्याची किंमत कमी होणे अटळ आहे. असा हा वाईट संगतीचा दुष्परिणाम होय. Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात की, पंचपक्वान्न बनविले असता त्याची गोडी चाखण्यासारखी असते, हे कुणीही नाकारू शकत नाही. परंतु जर या पक्वान्नांनी विषाशी मैत्री केल्यास त्या पक्वांन्नाची किंमत शून्य होईल. त्याचा स्वाद घ्यायला कुणीही तयार होणार नाही. समजा कुणी स्वाद घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा मृत्यू अटळ! कारण त्याच्या स्वादात तसेच मूळ रूपात व उद्दिष्टात बदल होतो; म्हणजेच तो गोड न राहता कडू होऊन जातो. त्याच बरोबर ते शरीरास मारक बनते. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की, नेहमी संगत ही सद्गुणांशी करावी. दुर्गुणामुळे कुणाच्याही आयुष्याचे कल्याण होत नाही. एवढंच काय, तर चांगल्या वृत्तीची साधू माणसंसुद्धा दुर्गुणामुळे बदनाम होतात.
 
- प्रा. मधुकर वडोदे
9422200007
Powered By Sangraha 9.0