‘अवकाळी’ पाठ सोडेना...

    दिनांक :03-Dec-2023
Total Views |
- प्रा. अशोक ढगे
वारंवार येणारी संकटे शेतकर्‍यांची पाठ सोडण्यास काही तयार नाहीत. एक तर पावसाअभावी शेतात काही पिकत तरी नाही आणि दुसरीकडे पिकले तर विकले जात नाही. विकायला गेले तर बाजारात शेती उत्पादनाचा उत्पादन खर्च निघू शकेल इतकाही भाव नसतो. कधी कधी निसर्गाचा लहरीपणा अगदी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. Unseasonal rain एकंदरीत अशा नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांशी लढता लढता शेतकरी थकून जातो आणि नाईलाजास्तव प्रकाशवाटा सोडून काळोखाचा मार्ग धरतो. मात्र, ही अनंतकाळची व्यथा असूनही व्यावसायिकांची आणि उद्योजकांची लाखो रुपयांची कर्जे माफ करणारे सरकार शेतकर्‍यांना मदत करण्याबाबत हात आखडता घेताना दिसते. यंदा अवकाळी, गारपीट आणि ऐन पर्जन्यकाळात प्रदीर्घ काळ पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी पूर्ण पिचून गेला. अनेकविध प्रयत्न करून जगणे असह्यच होत असल्यामुळे काही जण मृत्यूलाही कवटाळतात. त्यामुळेच महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची भाषा केवळ कागदोपत्रीच उरते. ग्राहकहित जपण्याच्या नावाखाली सरकार शेतीमालाच्या भावात हस्तक्षेप करते आणि भाव गडगडल्यानंतर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून मोकळी होते.
 
 
Farmar dksl
 
भाव वाढल्यानंतर नेपाळमधून टोमॅटो आयात करणारे सरकार एका बाजूला तर भाव पडल्यामुळे टोमॅटोच्या शेतात नांगर घालणारा, कोबी-फ्लॉवरच्या शेतात रोटाव्हेटर फिरवणारा, वांगी फेकून देणारा शेतकरी दुसर्‍या बाजूला. Unseasonal rain अशा अडचणीच्या वेळी मात्र सरकार काहीच करत नाही. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत होता. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला किलोला 200 रुपये किलो भाव मिळाला. त्यावेळी समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, गेल्या महिन्यात टोमॅटो 10 रुपये किलो दराने विकला गेला. साहजिकच वाहतूक खर्चही न निघाल्यामुळे शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. संतप्त शेतकर्‍यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात कोथिंबिरीलाही चांगला भाव होता. पण आता कोथिंबीर आणि मेथी मातीमोल भावाने विकली जात आहे. आता परत गारपिटीने नुकसान झाल्याने काही दिवसात त्याच्या भावामध्येही वाढ बघायला मिळण्याची शक्यता आहे. एकंदर या सगळ्या बेभरवशी परिस्थितीचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.
 
 
खरे पाहता काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे सांगितले होते. मात्र, केवळ एवढे करून सरकारची जबाबदारी संपत नसते. लाखो रुपयांची गुंतवणूक असणार्‍या द्राक्ष बागा, कांदा, वर्षानुवर्षे तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा आणि कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जोपासलेले पशुधन गारपीट वा Unseasonal rain अवकाळीने उद्ध्वस्त होत असलेले पाहताना शेतकर्‍यांच्या मनाला कोण यातना होत असतील, किती इंगळ्या डसत असतील, याचा विचार कोणीच करत नाही. नगदी पिकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून हाती काही यायची वेळ असते आणि नेमकी तेव्हाच गारपीट होते. अशा वेळी शेतकर्‍यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल होत असतो. आताही अनेक भागांमध्ये पिकांबरोबरच शेतकर्‍यांच्या स्वप्नांचाही चिखल बघायला मिळत आहे. विशेषत: पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशीम, नाशिक, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. हाताशी आलेले सोने भुईसपाट झाले आहे.
 
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगावात अलिकडेच गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. त्यात कांदा आणि बटाट्याचे मोठे नुकसान झाले. नाशिकमधील निफाड, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यांनाही गारपिटीने झोडपले. यंदाच्या पावसाळ्यात झाला नाही एवढा पाऊस तिथे काही तासांमध्ये पडला. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. काठीने झोडपून काढावी तशी पपई, बोरे, द्राक्षे, ऊस, केळी आदी पिकांची अवस्था झाली. पपईच्या झाडांवर फांद्या, पाने नावालाही राहिली नाहीत. शेतात गारांच्या आकाराचे खड्डे निर्माण झाले. काही ठिकाणी येत्या महिन्यात द्राक्षतोड होणार होती; पण द्राक्षांच्या घडावर गारांचा प्रहार झाला. खोडांना जखमा झाल्या. त्यामुळे आता द्राक्षांच्या उत्पादकेतवरही परिणाम होणार, यात शंका नाही. या अवकाळीने कांद्याचेही प्रचंड नुकसान केले. नेमकेपणाने सांगायचे तर कांद्याच्या चाळीतील 70 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच आधीच्या नुकसानीची आणि दुष्काळात झालेल्या वाताहातीची मदत मिळालेली नाही. त्यात हे नवीन संकट आल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला. पीकविमा कंपन्यांसोबतचा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यात गारपिटीचे आणि Unseasonal rain अवकाळी पावसाचे संकट पुढे आल्यामुळे समस्यांची तीव्रता वाढली आहे.
 
 
राज्यातील अनेक भागांमध्ये कपाशीची तोड राहिली होती. मात्र, आता निसर्गाच्या अवकृपेमुळे बोंडे मातीत मिसळल्याने कपाशीचा भाव एकदम कमी होईल. हिंगोली जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी पावसामुळे चांगलेच संकटात सापडले आहेत. कारण वेचणीला आलेला कापूस अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भिजला. कांद्याचे नुकसान झाल्याने उन्हाळी कांद्यावर दुष्परिणाम होईल. साहजिकच कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे भाव चढे राहण्याची शक्यता आहे. विशेषत: लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झाली असतानाच Unseasonal rain अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असताना कांद्याची लागवड वाढविण्यात आली होती. आता शेतातून कांदे काढायचे आणि बाजारात विकायचे अशी परिस्थिती होती. मात्र, ऐनवेळी अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने शेतकर्‍याच्या कांद्यावर घाला घातला. त्यामुळे शेतातील कांदा सडून शेतकर्‍याच्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती असून कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. अनेक भागात दोन-तीन दिवस पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो, ही त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणावी लागेल. त्याचबरोबर आता गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. ताज्या नुकसानीमुळे ज्वारी भाव खाऊन जाण्याची दाट शक्यता आहे.
 
 
पुण्यातील उत्तर भागालाही Unseasonal rain अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यात लोणी, धामणी, खडकवाडी गावातील शेतकर्‍यांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले तर काही भागात बटाटा पिकालाही फटका बसला. कांदा आणि टोमॅटोबरोबर मका पिकालाही फटका बसला आहे. पानोली, जवळा, निघोज या गावांमध्ये गारांचा मोठा फटका बसला आहे. नाशिक आणि पारनेर तालुक्यातील काही भागात गारांच्या वर्षावाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशसारखी स्थिती झाली होती.
 
 
Unseasonal rain : अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना बसला. शेतकर्‍याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात भिजलेली 30 टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज असून त्यामुळे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हे सर्व बघता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी हवामान विभागाने राज्यात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याचा इशारा दिल्यामुळे शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. आपल्या ताटात पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे, हेच त्याला समजेनासे झाले आहे. अशा स्थितीत केवळ पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार नाही. त्यांना शांत आणि आश्वस्त करण्यासाठी तातडीने मदत देण्याची गरज आहे. सरकारने त्यासाठी शासकीय कार्यवाहीचा वेग वाढवायला हवा.