तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांचे अभंग मनन, चिंतन केल्यास लाखो भाविकांना प्रेरणा देणारे असून चैतन्याचे ते आगर असल्याचे जनसामान्याच्याच नव्हे, तर या भूतलावरील सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. समाजप्रबोधन करून जनसामान्यांना सुयोग्य मार्ग दाखविण्यात ते यशस्वी झाले. श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी, याबाबत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रबोधन केले आहे. सदैव सद्विचाराची कास धरणार्या या व्यक्तिमत्त्वाचे अवघे जीवन पांडुरंगमय झालेले आहे. श्री पांडुरंगाच्या भक्तिभावनेतून जीवनाचे सत्य प्रकट केले आहे. विकाराला दूर सारण्याचे सहज तत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. विकार वाढत आहे. मानवता संपुष्टात येत असल्याने समाजाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे अनंत विवंचना जीवन जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. माणसाला माणूस पारखा होतो की काय, याची भीती आता वाटत आहे.
असे चित्र का निर्माण झाले असावे? या प्रश्नाच्या तळाशी जाताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आचरण. माणसाचं आचरण कसं असावं? याबाबत असे लक्षात येते की, आचरण सदोष असल्यास त्याला इतरांचं खरंही पटत नाही. तो ते मान्यच करत नाही. कारण तो वैचारिकद़ृष्ट्या अंध झालेला असतो. बौद्धिक पातळी खाली गेलेली असते. समजून घेण्याची कुवतच नसते. मी...मी...मी म्हणेल तेच खरे. समजून सांगणारा तयार आहे, पण समजून घ्यायला तयारच नाही. परिणामी सारं जग त्याला तसंच दिसते. जसे कावीळ झालेल्या माणसाला सर्व जग पिवळं झालेलं दिसत त्यागत तो आपल्याच विचारात मग्न झालेला दिसतो. तो जे काही चूकीचं करतो ते त्याला बरोबरच वाटते. तो कुणाचंच ऐकायला तयार नसतो. तशीच त्याची मानसिकता बनते, परंतु सत्य वेगळंच असतं. तो सत्यापासून खूप लांब उभा असतो. म्हणून समाजामध्ये असे जे काही आंधळे झालेले लोक असतात त्यांचं आंधळेपण दूर करण्याकरिता या अभंगाच्या माध्यमातून माणसाने आपलं मन का शुद्ध ठेवावयाचं हे स्पष्ट करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की,
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे।
आपणासि डोळे द़ृष्टी नाहीं॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न।
तोंडासि कारण चवी नाही॥
तुका म्हणे शुद्ध नाही जों आपण।
तया त्रिभुवन सर्व खोटें॥
अ. क्र. 3339.
द़ृष्ट नसलेल्या माणसाला सर्व जग आंधळेच असल्याचे वाटते. कारण त्याला द़ृष्टी नसते. म्हणजेच इथे जे काही आहे ते आपल्यासारखेच असल्याचे वाटते. कारण तो आंधळा असतो. हीच बाब अज्ञानी लोकांच्या बाबतीत दिसून येते. परंतु ज्याला वैचारिक द़ृष्टी आहे, असा ज्ञानी माणूस त्याचे अज्ञान दूर करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो व अज्ञानाच्या दलदलीतून बाहेर येऊन आपला विकास करून जीवन सुखी व समृद्ध करतो. परंतु अज्ञानी माणूस दलदलीतून बाहेर येण्याऐवजी अधिक फसत जातो. कारण त्याला त्याचं अज्ञान आडवं येत असल्याकारणाने त्याला कितीही चांगले सांगितले तरी त्याची ऐकण्याची मानसिकताच नसते. पुन:पुन्हा तो त्याच त्या चुका तो करत आपलं आयुष्य बरबाद करतो. असे होऊ नये याकरिताच संत उपदेश जीवनास संजीवनी ठरतो. Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज आपणास आंधळ्याचा द़ृष्टांत देऊन सांगतात की, आंधळ्या लोकांना सर्व जगच आंधळं असल्याचे वाटत असते. कारण ते स्वत: आंधळे असतात. मुळात त्यांना द़ृष्टीच नसते. म्हणूनच त्यांची अनेक वेळा फसगत झालेली दिसून येते. वैचारिक क्षमता नसल्यामुळे ते चांगल्या गोष्टीचे आकलन करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनाचं मातेरं होत असताना दिसते. अशा वैचारिक क्षमता नसलेेल्या द़ृष्टिहीन लोकांचा शेवट ठरलेला असतो.
पुढे हाच मुा अधिक समजावून सांगताना Saint Tukaram Maharaj महाराज म्हणतात की, रोगी असेल व त्याला जर चांगले गोडधोड, मिष्टान्न दिले तरीसुद्धा त्याला त्याची चव कळतच नाही. त्याला हे मिष्टान्न विषासमच वाटत असते. त्याला चांगली चव कळतच नाही. त्याची चांगली चव त्याला झालेल्या रोगामुळे नष्ट होत असते. ती चांगली बनविण्यासाठी त्याला त्या आजारावरची औषध घ्यावी लागेल. म्हणजेच वैद्याकडे जाऊन रोगाचे निदान करून मग पाहिजे तो औषधोपचार करावा लागेल. त्याकरिता वैद्याकडे जाण्याची त्याची मानसिकता त्याला तयार करावी लागेल तर कुठे त्याला मिष्टान्नाची चव घेता येईल. अन्यथा त्याला मिष्टान्न हे विषासमानच वाटेल. भावार्थ असा की, माणसाचं मन हे शुद्ध असावं लागतं. ते जर का शुद्ध असेल, तर तो आहे ती परिस्थिती समजून घेण्याची कुवत ठेवू शकतो. असलेल्या अनेक अडचणींवर मात करून मार्ग काढू शकतो. परंतु तो अज्ञानी म्हणजेच ऐकून घेण्याची क्षमता नसेल तर त्याला दुसर्याने केलेला खरा उपदेशदेखील सत्य वाटणार नाही व आयुष्याचं मातेरं करून बसेल. कारण त्याची ती वैचारिक क्षमताच नसल्यामुळे त्याला अख्ख जग खोटंच वाटतं. कारण त्याचं मन शुद्ध नसतं. म्हणूनच महाराज या अभंगाच्या माध्यमातून अशा अज्ञानी, वैचारिक क्षमता नसलेल्या लोकांना समजावून सांगण्याकरिताच शुद्ध मनाचे जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे याबाबत आंधळ्या माणसाचा द़ृष्टांत देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून माणसाने आपलं मन जेवढं शुुद्ध ठेवता येईल तेवढं शुुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अज्ञानामुळे म्हणजेच वैचारिक क्षमता नसल्यामुळे आपलं किती नुकसान होऊ शकतं ही बाब लक्षात येते. अन्यथा चांगल्या गोष्टीची, मौल्यवान वस्तूची किंवा अमृतासमान मिष्टान्नाची किंमत आपणास कळू शकणार नाही व जीवन जगण्याचा खरा आनंद आपण घेऊ शकणार नाही. म्हणून माणसाचं वर्तन हे अशुद्ध किंवा सदोष असल्यास त्याला अख्खं जगचं सदोष असल्याचं दिसतं. म्हणूनच माणसानं आपलं मन शुुद्ध ठेवावं.
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007