एक पाऊल ध्येयाच्या दिशेने...!

PoK-Amit Shah-Nehru नेहरूंच्या कार्यकाळात दोन चुका

    दिनांक :07-Dec-2023
Total Views |
अग्रलेख
PoK-Amit Shah-Nehru प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकास अभिमान वाटेल असा एक अनोखा प्रसंग संसदेत बुधवारी घडला. केवळ सत्ता मिळविणे आणि त्याकरिता कसेही राजकारण करणे, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, तर या सत्तेचे काही निश्चित ध्येय आहे व ते ध्येय राजकारण किंवा सत्ताकारणाशी बांधलेले नसून राष्ट्रकारणाशी बांधलेले आहे, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका वक्तव्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि जनसंघ ते भाजपा या राजकीय प्रवासातील ध्येयपूर्तीच्या दिशेने मोदी सरकारची पावले निश्चित आणि ठोस कार्यक्रमानिशी पुढे पडत आहेत, हेही स्पष्ट झाले. PoK-Amit Shah-Nehru ‘एक देश में दो निशान, दो प्रधान, दो संविधान नही चलेंगे' हा केवळ राजकीय नारा नव्हता, तर ते आमचे ध्येय आहे आणि ज्या कोणी ही चूक केली होती, ती चूक पंतप्रधान मोदी यांनी दुरुस्त केली आहे. PoK-Amit Shah-Nehru १९५० पासून भारतीय जनता पार्टीच्या पूर्वसुरींचा तो ध्यास होता; नरेंद्र मोदी यांनी त्या ध्यासाची पूर्तता केली आहे, असे अमित शाह यांनी संसदेत ठणकावून बजावले आणि भारताच्या जनमानसात भळाळणाऱ्या आणखी एका वेदनेचा हुंकारही पुन्हा एकदा संसदेत उमटला. PoK-Amit Shah-Nehru काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावर नेऊन पंडित नेहरूंनी चूक केली आणि या चुकीमुळेच व्याप्त काश्मीर निर्माण झाले, असा थेट दावा अमित शाह यांनी लोकसभेत केल्याने, मोदी सरकारचे यापुढचे पाऊल कोणते असेल तेही स्पष्ट झाले.
 
 

PoK-Amit Shah-Nehru 
 
 
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांपासून अन्यायग्रस्त जीवन जगणाऱ्या, अपमानित होऊन विस्थापित झालेल्यांना आणि दुर्लक्षित राहिलेल्या जनतेस न्याय देण्यासाठी व त्यांना त्यांचे हक्क पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी संसदेत आणले गेलेले विधेयक बुधवारी लोकसभेत संमत झाले आणि काश्मीरच्या प्रश्नावर भाजपा सरकार संवेदनशील असल्याची ग्वाही देशाला मिळाली. PoK-Amit Shah-Nehru हे केवळ मतपेढीचे राजकारण नाही आणि संपूर्ण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, या भाजपच्या भावनेचा केवळ पुनरुच्चार नव्हे, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या त्यागाशी असलेल्या बांधिलकीची जबाबदारीही गृहमंत्र्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली आहे. १९८० च्या दशकात काश्मीरमधील दहशतवादी अत्याचारामुळे बेघर झालेल्या लाखो पंडितांच्या मनात गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विश्वासाची आणि निर्भयतेची आश्वस्त भावना रुजली असेल. व्याप्त काश्मीरचा भूभाग ही भारताची भूमी आहे आणि व्याप्त काश्मीरमधील २४ विधानसभेच्या २४ जागा आम्ही राखून ठेवल्या आहेत, हे स्पष्टपणे नमूद करून गृहमंत्र्यांनी मोदी सरकारच्या भविष्यातील जबाबदारीचे सुतोवाच केले. PoK-Amit Shah-Nehru त्यामुळे निवडणुका किंवा राजकारण हा भाजपाचा अजेंडा नाही, हे स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत व्याप्त काश्मीरमधून एक महिला प्रतिनिधीचे राज्यपालांद्वारे नामांकन केले जाईल, ही केवळ माहिती नाही, तर भविष्यातील स्पष्ट निर्धाराचा हा उच्चार आहे.
 
 
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात दोन गंभीर चुका घडल्या; त्याचे गंभीर परिणाम वर्षानुवर्षे काश्मिरी जनतेस भोगावे लागत आहेत. त्या चुकीमुळे व्याप्त काश्मीरची निर्मिती झाली, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले हे योग्य झाले. संसदेच्या सभागृहात त्याचा पुनरुच्चार होऊन तशी नोंद होणे आवश्यकच होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून शतक महोत्सवी वर्षापर्यंत साजऱ्या केल्या जाणाऱ्या अमृतकाळात आमच्या संकल्पांची सिद्धी करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर भाषणातूनच बोलून दाखविले होते. PoK-Amit Shah-Nehru आता ती प्रक्रिया ठामपणे सुरू झाली आहे आणि ज्या एका राष्ट्रभावनेतून संघ परिवाराच्या मुशीत घडलेल्या व मातृसंस्थेच्या संस्काराचे ऋण फेडण्याची प्रामाणिक प्रेरणा घेऊन राजकारणात दाखल झालेल्या भाजपाच्या प्रवासातील ध्येयाचा आणखी एक टप्पा आता पूर्ततेच्या मार्गावर दाखल झाला आहे. ब्रिटिशांशी संघर्ष करून मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी प्राचीन भारतीय परंपरांचा आधार घेत निखळ राष्ट्रवादाचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती असलेल्या प्रबळ नेतृत्वाच्या अभावामुळे स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हाच भाजपची मातृसंस्था असलेल्या जनसंघाचा हेतू होता. PoK-Amit Shah-Nehru काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानधार्जिण्यांनी केलेली घुसखोरी, काश्मीरसारख्या संवेदनशील राज्याला दिला गेलेला स्वतंत्र दर्जा, हे देशापुढील भविष्यातील धोके असतील, अशी स्पष्ट जाणीव जनसंघाला होती, म्हणूनच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरला स्वतंत्र दर्जा बहाल करणाऱ्या कलम ३७० च्या विरोधात उग्र आंदोलन केले. तेव्हापासूनच जनसंघाच्या भारतीय राष्ट्रवादाच्या विचारधारेचा प्रवास सुरू झाला.
 
 
१९८० पासून या प्रवासाची पालखी भाजपाने खांद्यावर घेतली आहे आणि याच विचारधारेच्या आधारावर हा पक्ष राष्ट्रीय राजकारणातील अवघे अवकाश व्यापून राहिला आहे. देशातील जनतेच्या राष्ट्रभावनेला साद घालून या भावनेशी प्रामाणिक राहण्याची ग्वाही पारदर्शकपणे देणारा पक्ष म्हणूनच बहुधा देशातील जनतेचा कौल सातत्याने या पक्षासोबत राहिला आहे. PoK-Amit Shah-Nehru आता व्याप्त काश्मीरच्या मुद्यावर जेव्हा या पक्षाच्या पाठीशी प्रचंड जनाधार निवडणुकीच्या मार्गाने पुन्हा उभा राहील, तेव्हा पक्षाच्या ध्येयपूर्तीची आणि जबाबदारीची जाणीव अधिक गंभीर झालेली असेल. अमित शाह यांनी त्या जाणिवेचेच दर्शन लोकसभेत घडविले आहे. कारण हा राष्ट्रवादाचा विचार या प्रवाहाने वेगवेगळ्या आंदोलनांतून जिवंत ठेवला आहे. काश्मीरला स्वतंत्र दर्जा देण्याविरोधात, ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे' असा नारा देतच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले. जनसंघाच्या त्या आंदोलनाच्या घोषणेची नोंद इतिहासात अजरामर झाली आहे. PoK-Amit Shah-Nehru ‘ना फौज हारी, कौम ना हारी, हार गयी सरकार हमारी' (ना सैन्याचा पराभव झाला, ना जनतेचा पराभव झाला, हा तर सरकारचा पराभव!) ही त्या आंदोलनाची घोषणा होती. अमित शाह यांनी बुधवारी याच घोषणेचे संकेत देणाऱ्या निर्धाराचा पुनरुच्चार करून व्याप्त काश्मीरचा भूभाग पुन्हा प्राप्त करण्याच्या धाडसाचेही दर्शन घडविले. यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, राजकारणविरहित राष्ट्रभावना, कोणतीही किंमत मोजण्याची तयारीही असावी लागते.
 
 
भाजपाने सत्ताग्रहण केल्यापासून अशाच तयारीतून असे धाडसी निर्णय घेतले. अंतिमतः हे निर्णय राष्ट्रहिताचेच असल्याचे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले. देशभक्ती हा या पक्षाच्या राजकारणाचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्याच्या रक्ताचा रंग आहे. मतपेढीच्या राजकारणापलीकडे राष्ट्रीयत्व नावाची भावना असते. राजकारणासाठी एखाद्या धर्माला, जातीला, एखाद्या प्रादेशिक समूहाला खूश करण्यासाठी राष्ट्रहिताकडे डोळेझाक करणे भाजपाला मान्य नाही. PoK-Amit Shah-Nehru यातूनच पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विश्वास' या घोषणेचाही जन्म झाला. सर्वांना न्याय देणे आणि कोणाचेच तुष्टीकरण, लांगूलचालन न करणे हा भाजपाच्या विचारसरणीचा आणि सत्ताकारणाचा पाया आहे. कारण भाजपाने आपल्या राजकारणात विचारधारेला सर्वोच्च स्थान दिले आहे. ‘भारत हे राष्ट्र नाही, तर तो केवळ राज्यांचा समूह आहे,' असे विचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केले, तेव्हा त्यावर मोठा वादंग माजला होता. भारताकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन म्हणजे राष्ट्रवादाची संकल्पना जपलेल्या हजारो वर्षांच्या जनभावनेचा अपमान असून इतिहास दडपण्याचा प्रयत्न आहे, असा आक्षेप त्याच मुलाखतीदरम्यान एका श्रोत्याने जागीच घेतला होता. PoK-Amit Shah-Nehru राहुल गांधींच्या या वक्तव्याने राष्ट्रवादाच्या सामूहिक भावनेस पहिला तडाखा बसला.
 
 
बुधवारी लोकसभेतही विरोधी बाकावरून एका सदस्याने काश्मीरच्या स्वतंत्र दर्जाविरोधात जनसंघाने केलेल्या आंदोलनाची पुन्हा अशीच खिल्ली उडविली आणि भाजपाच्या राष्ट्रवादाच्या भावनेसच खिजविण्याचा प्रयत्न सभागृहात झाला. अमित शाह यांनी तातडीने त्याचा समाचार घेत जनभावनांच्या संवेदनाची जाणीव करून दिली; यासाठी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. PoK-Amit Shah-Nehru कारण केवळ समाजास एकत्र आणणाऱ्या, एकसंध ठेवणाऱ्या सांस्कृतिक ऐक्याच्या विचारास केवळ आपल्या क्षुद्र राजकीय लाभाकरिता बाधा आणणारे कोणतेही विचार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश गृहमंत्र्यांनी आपल्या उत्तरातून दिला आहे. राजकीय लाभाची गणिते अल्पजीवी असतात; केवळ राजकीय लाभ पदरात पडेपर्यंत अशा संभ्रमाचे शिंतोडे उडविण्याचे प्रयत्न केले जातात, पण त्यामुळे राष्ट्राचे, जनभावनाचे मोठे नुकसान होते आणि त्याची किंमत अशा स्वार्थी प्रवृत्तींनाही मोजावी लागते. अलिकडेच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून काँग्रेससारख्या पक्षांनी याचा अनुभव घेतला असेलच. आता समाजानेही त्यापासून बोध घ्यायला हवा. PoK-Amit Shah-Nehru ज्या देशाच्या जनतेमध्ये राष्ट्राभिमान रुजलेला असतो, तो देश संघटित शक्तीच्या बळावर राष्ट्राला बलशाली बनवतो. मोदी सरकारची वाटचाल याच ध्येयाच्या दिशेने सुरू आहे, हे दिलासादायक आहे.