Vijay Vadettiwar : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत विरोधकांनी पुन्हा शेतकर्यांच्या प्रश्नांवर गोंधळ घातला. वेलमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. अध्यक्षांनी चर्चा करण्यास परवानगी न दिल्याने विरोधकांनी आज विधानसभेत सभात्याग केला. दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत विरोधक सभागृहात फिरकले नाहीत, हे विशेष.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोतराचा तास पुकारला. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी प्रश्नोत्तरे बाजूला ठेवून शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी केली. मात्र, अध्यक्ष त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येताच विरोधक विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोरील वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले. अध्यक्षांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तरे होऊ द्या, नंतर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधक आसनावर बसले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यात दुष्काळाने 6 लाख 35 हजार हेक्टर बाधित झाले असून, शेतकर्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे सांगत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांना पिके गमावावी लागले. आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरीसुद्धा फक्त चर्चा करू, असे मोघम उत्तर सरकार देत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. सरकारने पिकांचा एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? पीकविमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा होणार आहे. सरकारला याची जाणीव असायला हवी, अशा शब्दांत वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकरी विकताहेत अवयव
राज्यात काही शेतकर्यांनी आपले अवयव विकायला परवानगी मागितली आहे. तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही. राज्यातील शेतकरी पीककर्ज परत करू शकत नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवलेली नाही, नाशिक पट्ट्यात अतिपाऊस झाल्याने द्राक्षाचे पीक वाया गेले. तिथेदेखील शेतकर्यांना अद्याप मदत देण्यात आलेली नाही. नाशिक महामार्गावर शेतकर्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर बसले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कसे जगणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. व्यापार्यांनी हात वर केले आहेत. हे लक्षात घेता यावर चर्चा करावी लागेल, अशी मागणी Vijay Vadettiwar वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत केली. त्यानंतर अध्यक्षांनी इतर सदस्यांना बोलू दिले नाही. याविषयावर बोलण्यासाठी दिवस ठरवूून चर्चा करू, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगताच संतप्त झालेल्या विरोधी बाकावरील सदस्यांनी सभात्याग केला. दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत ते सभागृहात आलेच नाहीत.