- दिग्रसला मोरेंच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदे येणार
अभय इंगळे
दिग्रस,
Digras-Pranit More : दिग्रस शिवसेना शहरप्रमुख प्रणित मोरे यांनी स्वत:च्या लग्नाचे आमंत्रण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. लग्नपत्रिका देतानाचे त्यांचे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले आहे. प्रणित मोरे हे नाव दिग्रस तालुक्याला अनेक संदर्भात परिचित आहे. कमी वयात करोडो रुपयांची उलाढाल, अनेक तरुणांना रोजगार, कोरोना काळात व अतिवृष्टीत अनेक गरजवंतांना मदत, स्वखर्चाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सौंदर्यीकरण, पोळ्यातील मानकरींना मानधन, स्वखर्चाने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार व विविध स्पर्धांमध्ये आर्थिक सहयोग देणारे हे सतत चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आहे.
आता थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःची लग्नपत्रिका दिल्याने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार दिल्याने Digras-Pranit More प्रणित मोरे चांगलेच चर्चेत आले आहेत. प्रणित मोरे यांचा शुक्रवार, 15 डिसेंबरला विवाह होत असून स्वत: प्रणित यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या लग्नाची पत्रिका दिली आहे. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम ठवकर, साहिल जयस्वाल, संजय कुकडी, विनायक दुधे व दिनेश खाडे उपस्थित होते. नागपूरला विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री 15 डिसेंबरला नागपूरलाच असल्याने त्यांना दिग्रसला येणे सोयीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्नाला हजेरी लावतील, असा विश्वास प्रणित मोरेंना आहे. या लग्नाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. लग्नात थेट मुख्यमंत्री हजर होणार असल्याने हा लग्न सोहळा यवतमाळ जिल्ह्यात चर्चेत राहणार आहे. लग्नाच्या तयारीबरोबर मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे एक खास आयोजन करण्यात प्रणित मोरे मित्रमंडळ मग्न आहे.