अग्रलेख...
समाजात नतद्रष्ट आणि विघ्नसंतोषी माणसांची संख्या वाढते आहे. स्वत:चे काही कर्त्तव्य नसताना समाजासाठी आणि देशासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणार्या माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात काही जणांना मोठेपणा वाटतो आहे. तसेच आपल्या पक्षाजवळ सांगण्यासारखे आणि नाव घेण्यासारखे तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखा हिमालयाएवढ्या उंचीचा त्यागमहर्षी त्यांच्याकडे कोणी नसल्यामुळे त्यांचा अपमान करण्याची अहमहमिका काँग्रेस नेत्यांमध्ये लागली आहे. काँग्रेसचे वाचाळ आणि वायफळ बडबड करणारे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या नेत्यांची संख्या वाढत आहे. सावरकरांबद्दल अपशब्द काढणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खडगे यांची सावरकरांचे नाव घेण्याचीही पात्रता नाही. पण, राहुल आणि सोनिया गांधींना खुश करण्यासाठी ते सावरकरांचा अपमान करीत आहेत. आपल्या कृतीने ते स्वत:ला आणि काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. खडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र भाजपाने तातडीने आंदोलन करून काँग्रेसला जागा दाखवून दिली, यासाठी भाजपाचे अभिनंदन! तसे पाहिले तर मल्लिकार्जुन खडगे यांची काँग्रेस पक्षातील सभ्य, संयमी आणि प्रगल्भ नेते अशी ओळख आहे. पण Priyank Kharge प्रियांक खडगे यांनी आपल्या बापाचे नाव मातीमोल करण्याचा जणू चंग बांधल्यासारखे दिसते आहे.
काँग्रेस पक्षातील एकेकाळचे सर्वोच्च नेतृत्व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी सावरकरांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत, याचे वैषम्य काँग्रेस पक्षातील लोकांना नेहमीच वाटत आले आहे. याबद्दल गांधी आणि नेहरू घराण्यातील नेत्यांना दोष देता येत नसल्यामुळे ते आपल्या मनातील वैषम्य या मार्गाने व्यक्त करीत आहेत. स्वत:ची रेघ मोठी करता येत नसल्यामुळे दुसर्याची रेघ छोटी करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. यातून ते फार काही साध्य करू शकले नाहीत, हा भाग वेगळा. सूर्यावर थुंंकण्याचा प्रयत्न करणार्याच्या तोंडावरच त्याच्या तोंडातील थुंकी पडत असते, ही वस्तुस्थिती आहे, तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना शहाणपण येत नाही. शहाणपण आणि काँग्रेस नेते यांच्यातील संबंध संपलेला दिसतो आहे. तसा जर असता, तर हे नेते काँग्रेस पक्षात राहिलेच नसते. कारण, कोणताही शहाणा माणूस काँग्रेस पक्षात फार काळ टिकत नाही. मुळात ज्याच्याजवळ थोडी फार विचार करण्याची अक्कल आहे, तो काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि तेथे राहण्याचा विचारच करू शकत नाही. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षातील, कोणतीही अक्कल नसलेले पण स्वत:ला विद्वान समजणारे, कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि तेथील मंत्री Priyank Kharge प्रियांक खडगे यांनी पुन्हा काही कारण नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे चिरंजीव एवढीच त्यांची ओळख आणि कर्तृत्व. बापाच्या कर्तृत्वावर राजकारण करणार्यांना सावरकरांचे मोठेपण कसे समजणार? सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय तसेच त्यांना वीर ही पदवी कोणी दिली, अशी विचारणा या महाशयांनी केली. मुळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरू आणि गांधी घराण्याचे किती योगदान आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी खपणारे, आपल्या प्राणाचेच नाही तर सर्वस्वाचे बलिदान करणारे वेगळे होते. नेहरू आणि गांधी घराणे तर आयत्या पिठावर नागोबा याप्रमाणे स्वातंत्र्योत्तर राजकारणात आरूढ झाले आणि त्यांनी सत्तेचे सगळे फायदे लाटले आणि अजूनही लाटत आहेत. काँग्रेस पक्षात सावरकरांसारखे कोणी वीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सावरकरांच्या मागे लागणारी स्वातंत्र्यवीर ही उपाधी काँग्रेस पक्षातील नेत्यांना खुपणारच. राज्य विधानसभेत असणारे सावरकरांचे छायाचित्र मी काढून टाकले असते, अशी दर्पोक्ती या खडगेंनी केली. खडगे तुम्ही कर्नाटक विधानसभेत असणारे सावरकरांचे छायाचित्र काढूनच दाखवा, म्हणजे त्याचे परिणाम किती भयंकर असतील, याची कल्पना तुम्हाला येईल. मधमाशाच्या पोळ्याला हात घातल्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आधी मणिशंकर अय्यर यांनी अंदमान तुरुंगाबाहेर असलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची नामपट्टिका उखडून फेकली होती. आता त्याच मार्गाने प्रियांक खडगे यांची वाटचाल सुरू आहे, असे दिसते आहे. पण, मणिशंकरासारखी कृती करण्याचे धाडस ते दाखवतील याची शक्यता कमीच.
Priyank Kharge खडगे बोलले नाहीत तर बरळले आहेत. सावरकरांबद्दल अपशब्द काढताना खडगे कोणत्या नशेत होते? सत्तेच्या की आणखी कशाच्या, ते समजू शकले नाही. पण त्यांचे डोके ठिकाणावर नव्हते, यात शंका नाही. गांधी-नेहरू घराण्यातील समस्त नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेवढा त्याग केला, तुरुंगवास भोगला, त्याची बेरीज केल्यानंतरही सावरकरांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाचे आणि तुरुंगवासाच्या शिक्षेचे पारडे जड आहे. सावरकरांनी स्वत:च नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने ज्या यातना आणि हालअपेष्टा सहन केल्या, त्यापुढे गांधी-नेहरू घराण्यातील लोकांनी केलेला त्याग काहीच नाही. बिसलेरीच्या पाण्यावर वाढलेल्या गांधी-नेहरू घराण्यातील तसेच त्यांचे लांगूलचालन करणार्या मणिशंकर अय्यर आणि प्रियांकसारख्या भाटांना काळ्या पाण्याच्या शिक्षेचे महत्त्व आणि गांभीर्य कसे समजणार? गांधी आणि नेहरू घराण्यातील नेत्यांनी तुरुंगवास भोगला नाही असे नाही, पण या नेत्यांचा तुरुंगवास हा पंचतारांकित होता. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात भोगलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखा तो भयानक नव्हता. प्रियांक खडगे कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र काढण्याची भाषा बोलू शकतात, पण देशातील कोट्यवधी जनतेच्या मनात त्यांनी जे स्थान मिळविले, ते कसे काढून टाकू शकतील? सावरकरांनी देशातील कोट्यवधी नागरिकांच्या हृदयात जी जागा मिळविली, ती गांधी घराण्यातील एकाही नेत्याला मिळवता आली नाही आणि भविष्यातही कधी मिळवता येऊ शकणार नाही. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता देशातील जनतेने काँग्रेस पक्षाला आणि गांधी घराण्यातील नेत्यांना त्यांची जागा आणि लायकी दाखवून दिली आहे, तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मर्यादा सोडून टीका करताना काँग्रेसच्या नेत्यांना लाज कशी वाटत नाही? काँग्रेसमधील नेते स्वत:चे आणि पक्षाचे अस्तित्व मिटवण्यासाठी एवढी घाई का करत आहेत, याचे आश्चर्यही वाटेनासे झाले आहे. यापुढे काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी प्रभू श्री रामचंद्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढले, त्यांचा अपमान केला तर देशातील जनता त्यांची खरडपट्टी काढल्याशिवाय राहणार नाही. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने चारीमुंड्या चीत केल्यानंतरही जर काँग्रेस सुधरणार नसेल तर 2024 साली काय होईल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मुस्लिमांचे वाट्टेल तेवढे तुष्टीकरण करा, पण त्यासाठी देशातील बहुसंख्य हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान करू नका, देशातील हिंदूंच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका; त्याचे गंभीर परिणाम होतील, हे काँग्रेसने आताच लक्षात घ्यावे. बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून कुणीही उठावे आणि कुणाचाही अपमान करणारे वक्तव्य करावे, हे योग्य नाही.