तभा वृत्तसेवा
गोंदिया,
येथील पोलिस अधिक्षक (Policeman) कार्यालयांतर्गंत रामनगर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याला कुत्रा चावल्याने तो जखमी झाला. चावलेला कुत्रा हा पिसाळलेला आहे, यासाठी सुट्टी घेण्याआधी सिद्ध करण्याचे फरमान पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधीक्षकाने पत्राव्दारे दिल्याचा विचित्र प्रकार नुकताच पहायला मिळाला आहे.
पोलिस कर्मचार्याला (Policeman) कुत्रा चावल्यानंतर त्यांनी उपचारासाठी सुट्टी हवी म्हणून अर्ज केला. तसेच उपचारही घेतले. त्यानंतर जखमा भरल्यानंतर कर्तव्यावर रुजूही झाला. आता तब्बल दोन महिन्यानंतर पोलिस कर्मचार्याला वरील पत्र मिळाल्याने आता दोन महिन्यानंतर चावलेला कुत्रा कसा शोधणार असा प्रश्न पोलिस कर्मचार्यासमोर पडला आहे. मात्र सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांबद्दल गंमतीशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे आधी सिद्ध करा आणि नंतरच उपचारासाठीची देय रजा टाका, असा फतवा चक्क पोलिस अधिक्षक कार्यालयातील अधिक्षकाने एका पोलिस कर्मचार्यासाठी काढला आहे. आता देय रजा मंजूर करण्यासाठी चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे, हे सिद्ध करण्याची पंचाईत त्या पीडित कर्मचार्यावर आली आहे. एका पोलीस कर्मचार्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुटीच्या संदर्भाने नुकतेच तसे पत्र दिले आहे. त्या पत्राची प्रत सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.