मंगरूळनाथ,
Kanifnath Maharaj : सावरगाव कान्होबा या नावाने तालुकाच नव्हे तर वाशीम आणि आजूबाजूच्या जिल्ह्याच्या नागरिकांच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या व नवनाथांपैकी एक असलेल्या चैतन्य कानिफनाथ महाराजांचा भव्य यात्रा महोत्सव यावर्षी संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरे करण्यात येत आहे.
कानिफनाथ महाराजांच्या (Kanifnath Maharaj) यात्रेचे हे १५० वे वर्ष आहे. येत्या २३ तारखेपासून तर पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पर्यंत नवनाथ कथा (भागवत सप्ताह), अखंड हरिनाम, प्रवचन, भजन, कीर्तन,काकडा इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल या दोन आठवड्या दरम्यान मंदिर परिसरात राहणार आहे. २३ फेब्रुवारी पासून ३ मार्च पर्यंत नवनाथांच्या ४० अध्यायांचे वाचन मनोहर महाराज गावंडे पोटी यांच्या सुमधुर वाणीतून भक्तांसाठी होणार आहे. ४ मार्च रोजी प्रातःकाळी महापूजा व होम विधीचे आयोजन मंदिरात करण्यात आले असून, त्यानंतर काल्याचे किर्तन हस्ते होणार आहे.
४ मार्च रोजी सकाळी ११ ते ५ वाजताच्या दरम्यान रांगेत बारीमध्ये ग्रामस्थ आणि भक्तगणांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा वाटप करण्यात येणार आहे. सावरगाव येथे कानिफनाथ महाराजांचे गडावर पुरातन मंदिर असून, निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या ह्या मंदिरावर दरवर्षी हजारो श्रध्दाळू मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव महामारीच्या आरिष्ठांमुळे तब्बल तीन वर्षे खुल्या वातावरणात होऊ शकलेला नाही. यावर्षी १५० व्या यात्रा महोत्सवा निमित्य आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ चैतन्य कान्होबाच्या भक्तांनी घेण्याचे आवाहन संस्थानचे विश्वस्त राजेंद्र पाटील राऊत यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.