‘मैत्र’ समूहातर्फे आशा बगे यांचे अभिनंदन!

15 Feb 2023 19:53:31
नागपूर, 
केवळ नागपूरचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका आशा बगे (Asha Bage) यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून दिला जाणारा, अतिशय मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर झाला आणि साहित्य विश्वात आनंदाची लाट उसळली.
Asha Bage 
 
या पुरस्कारानिमित्त मैत्र समूहाच्या प्रमुख डॉ. अरुंधती वैद्य यांच्या पुढाकारातून डॉ. विनिता हिंगे, डॉ. स्वाती मोहरीर, सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या माधुरी आशीरगडे, वर्षा पतके थोटे, वृषाली देशपांडे या समूह सदस्यांनी पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन आशाताईंचे अभिनंदन केले. या भेटीत ‘तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?’ या प्रश्नाला उत्तर देताना, ‘‘मी दुसर्‍या दिवशी सिंगापूरला जाणार होते. सगळे सामान भरून तयार होते. त्यामुळे हा फोन आल्यावर, हा पुरस्कार मला पुढच्या वर्षी दिला तर नाही चालणार का, असा प्रश्न आपसूकच माझ्या ओठांवर आला, पण लगेचच माझी चूक मला कळली.’’ असे अतिशय प्रांजळपणाने आशाताईंनी (Asha Bage) सांगितले. चिवडा आणि चहाच्या सोबतीने रंगलेल्या गप्पांमध्ये नागपूरकरांनी नेहमीच माझ्यावर भरभरून प्रेम केले, असेही आशाताई म्हणाल्या. गप्पांमधे वेळ कसा गेला ते कळलेच नाही. आशाताईंनी आपल्या मोठेपणाचे दडपण न येऊ देता सगळ्यांना आनंदाने छायाचित्रे काढू दिली. आशाताईंच्या ऋजू व्यक्तिमत्त्वाने भारावलेल्या अवस्थेतच सगळ्यांनी त्यांना चरण स्पर्श करून त्यांचा निरोप घेतला.
  
             सौजन्य : डॉ. अरुंधती वैद्य (संपर्क प्रमुख)
 
Powered By Sangraha 9.0