भाजीपाला, मनेरी व्यवसायातून समीक्षा झाली आत्मनिर्भर
17 Feb 2023 18:43:49
गोंदिया,
कर्मानेच नसीब बदलते. SAMIKSHA मात्र अनेकांना आलेल्या अपयशामुळे ते आपल्या नसीबालाच दोष देतात. तर काही जन नसीबाला दोष देण्यापेक्षा कर्म करून आपले नसीब बदलतात. अशीच कहाणी आहे समीक्षा या महिलेची. तिने आपल्या नसीबाला दोष देण्यापेक्षा व्यवसायाची कास धरून आपले व कुटुंबियांचे नसीब पालटले. तिची गाथा अनेकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तिरोडा या तालुका स्थळापासून 15 किमी अंतरावर 871 कुटूंब संख्या असलेलेे मोरगाव आहे. मोरगावात 17 स्वयं सहायता महिला बचत गट आहेत. मार्च 2014 मध्ये स्थापन झालेल्या बचत गटाच्या समीक्षा समीर फटीक या सदस्य आहेत.
समीक्षा SAMIKSHA यांच्या कुटुंबात सासू, सासरे, दोन मुले, पती व त्या अशी सदस्य संख्या आहे. यांच्याकडे शेती, रोजगार नसल्याने घर कसे चालवावे हा प्रश्न नेहमी त्यांना पडायचा. बचत गटातुन समीक्षा यांनी 15 हजार रुपये फिरता निधी मिळविला. आयसीआयसीआय बँकेतून 50 हजार कर्ज घेऊन कपडा व्यवसाय सुरु केला. गावोगावी व आठवडी बाजारात जाऊन कपडे विकणे, मंडईमध्ये खेळणे विकून त्या कुटेंबियांचा उदरनिर्वाह चालवित होत्या. परंतु कोरोनामुळे त्यांचे जीवनच विस्कटले. मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला व संपूर्ण देशात टाळेबंदी झाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची घडी पुर्णपणे विस्कटून गेली. त्याची झळ समीक्षा यांच्याही कुटूंबाला सोसावी लागली. दरम्यान त्यांच्या सहयोगिनी भारती लांजेवार यांनी त्यांना फोन करून हालचाल विचारला. कोरोना कालावधीत आपण काय नविन काम किंवा गावातील व्यक्तीसाठी काय करता येईल यासंबंधी चर्चा केली. तेव्हा भारती यांनी समीक्षाला भाजीपाला व मनेरी सामान विक्री करण्याचा सल्ला दिला. या सल्ला समीक्षाला पटला. त्यांच्या पतीनेही त्यांच्या निर्णयाला पाठींबा दिला. एप्रिल 2020 मध्ये बचत गटातून 25 हजार रुपये कर्ज घेऊन मनेरी सामान व भाजीपाला विकत घेतला. कधी त्या तर कधी त्रूांचे पती कधी दोघेही स्कुटी, सायकलवर गावागावांत मनेरी व भाजीपाला विकतात. यातुन दिवसाला 500 ते 700 रुपये अशी विक्री होते. त्यातून 150 ते 200 रुपये निव्वळ नफा होत असल्याचे त्यांनी सांगीतले.