उपजिल्हा रूग्णालयात नेत्ररोग तज्ञांची सेवा उपलब्ध करून द्या

18 Feb 2023 19:02:51
कुरखेडा, 
उपजिल्हा रुग्णालय (Sub District Hospital) कुरखेडा येथे परिसरातील रुग्णांची मोठी वर्दळ असते. मात्र, येथे नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा उपलब्ध नसल्याने येथे नेत्र रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यामुळे येथे नियमित नेत्ररोग तज्ञांची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शहर विचार मंचाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित ठमके यांच्याकडे करण्यात आली.
Sub District Hospital
 
येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub District Hospital) 50 खाटांचे आंतररुग्ण विभागासह बाह्यरुग्ण विभाग आहे. रुग्णालयात आरोग्याच्या आत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. येथे कुरखेडा, कोरची, देसाईगंज या तीन तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येत आरोग्याचा लाभ घेतात. मात्र, येथे मागील अनेक वर्षापासून नियमित नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार मिळत नाही. त्यामुळे नेत्र रुग्णांची हेळसांड होत आहे. डोळ्यांचा आजार हा विशेषत: वृद्धांनाच अधिक असल्याने उपचाराकरीता दूरचा प्रवास करीत शहरात पोहचणे त्यांना शक्य होत नाही.
 
 
नाईलाजाने जावे लागल्यास अधिकचा आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेत येथे नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी आवश्यक कार्यवाही व पाठपूरावा करण्याचे आश्‍वासन अधिक्षक डॉ. अमित ठमके यांनी दिले. निवेदन देताना शहर विचार मंचाचे संयोजक अध्यक्ष माधवदास निरंकारी, प्रवक्ता अ‍ॅड. उमेश वालदे, डॉ. सतिश गोगूलवार, मोहन मनूजा, रामभाऊ वैद्य, डॉ. जगदीश बोरकर, प्रा. विनोद नागपूरकर, सिराज पठान, सागर निरंकारी व विचार मंचाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0