तभा वृत्तसेवा
पुसद,
एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीन वर्षे (Physical abuse) शारीरिक शोषण, तर दुसर्या महिलेचा विनयभंग करणार्या एका डान्स मास्तरवर वसंतनगर पोलिस ठाण्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच गुन्हे दाखल करण्यात आले. पुसदलगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळ रेसिडेन्सीत राहणारा डान्स मास्तर तथा योगशिक्षक आकाश शंकर गवळी (वय 36) असे या आरोपीचे नाव आहे. वसंतनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आकाश गवळीने श्रीरामपूरमधीलच एका 36 वर्षीय महिलेसोबत संधान साधून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिचे सतत तीन वर्षे शारीरिक शोषण केले. या महिलेने आकाशला लग्न करण्यास सांगितले असता त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तक्रार दाखल केली.
त्याचवेळी हाच आकाश गवळी एका 46 वर्षीय (Physical abuse) महिलेसोबत संधान साधण्याचा प्रयत्न करत होता. सोबतच तिला वारंवार फोन करून त्रास देत होता. त्यामुळे या महिलेने त्याचा नंबरही ब्लॉक केला. तरीसुद्धा तिचा पाठलाग करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून, तिच्या घरी जाऊन, घरातील साहित्याची नासधूस करून, तिच्या पतीसही धक्काबुक्की केल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेची तक्रार त्या दुसर्या पीडित महिलेने मध्यरात्रीच वसंतनगर पोलिस ठाण्यात दिली असून त्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असल्याने पुसद परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या घटनेबाबत वसंतनगर पोलिसांनी आरोपी आकाश गवळी याच्याविरुद्ध पहिल्या तक्रारीवरून बलात्कारासह (Physical abuse) विविध गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसर्या प्रकरणामध्येही छेडखानीसह अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. विशेषतः दोन महिलांवर अत्याचाराच्या घटनांनंतरसुद्धा पोलिसांची भूमिका त्यांच्याबद्दल सहानुभूतीची नव्हती, हे विशेष.
या महिला रात्रीला दहा ते अकराच्या सुमारास वसंतनगर पोलिस ठाण्यात आल्या असताना रात्र उलटून सकाळपर्यंत त्यांना ठाण्यात बसवून ठेवण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (Physical abuse) दोन महिलांसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतरसुद्धा आकाश गवळी या आरोपीच्या अटक संदर्भात पोलिसांनी कोणतीच हालचाल केली नसल्याने इतर पोलिसांकडूनच या हलगर्जीपणाबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.