प्रस्तावित वाशीम बडनेरा हा रेल्वे railway line मार्ग राज्य शासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे रखडला आहे. हा रेल्वे मार्ग अस्तीत्वात आल्यास वर्हाडच्या विकासाला चालना मिळुन आकांक्षीत वाशीम जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. परंतु, ज्यांच्या खांद्यावर सामान्य जनतेनी विकासाची जबाबदारी टाकली आहे, तेच हात वर करीत असल्याने जिल्हा सध्या सवतीसारखा अडगळीत पडला आहे.
नरखेड वाशीम हा प्रस्तावित railway line रेल्वेमार्ग बडनेरापर्यंत पुर्ण झाला असून, वाशीम बडनेरा हा १०८ किमीचा मार्ग फाईलीमध्ये धुळखात पडला आहे. या मार्गाचे सर्वेक्षण विनात्रुटी पूर्ण झाले असून, तसा अहवालही रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, राज्य शासन याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने हा मार्ग रखडला आहे. या मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले होते. तरीही सदर प्रकरण मंत्रालयातच अडकले असून, याबबात राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या मार्गासाठी निधीमध्ये आपला वाटा उचलावा, अशी वर्हाडातील जनतेची मागणी आहे. नरखेड, बडनेरा, वाशीम या प्रस्तावित रेल्वे मार्गाला लागुन असलेला बहुतांश भाग अविकसीत आहे. त्यामुळे या भागासोबतच विदर्भाच्या विकासासाठी वाशीम बडनेरा हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु नेमके घोडे तेथेच अडले आहे. नवी दिल्ली ते बंगलोर या मार्गावरील बडनेरा ते वाशीम हा फक्त १०८ किमीचा टप्पा पूर्ण झाल्यास नवी दिल्ली बंगलोर मार्ग पुर्णपणे तयार होऊ शकतो. त्यामुळे अंतर कमी होऊन प्रवाशांच्या पैशाची व वेळेचीही बचत होऊ शकते. वाशीम बडनेरा या प्रस्तावित रेल्वे मार्गाला लागून असलेला बहुतांश भाग अविकसीत आहे. या भागातील शेती, गृहउद्योग, कुटीरउद्योग, व्यवसायाच्या विकासासाठी, रोजगार, पर्यटन, दळणवळणाचे अंतर व त्यावरील खर्च कमी होण्यासाठी व मालवाहतूक वाढविण्यासाठी हा मार्ग मदत करणारा ठरणार आहे. या मार्गासाठी भूसंपादन व अन्य प्रक्रियांसाठी सहकार्य करणे, खर्चातील वाटा उचलणे, आदी बाबत महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे भूमिका स्पष्ट केली तर हे काम लवकर सुरू होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी जनतेची मागणी आहे.