सुनील केदार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येण्याची शक्यता

नाना पटोले यांच्या विरोधात प्रचंड रोष

    दिनांक :26-Feb-2023
Total Views |
नागपूर, 
वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व माजी मंत्री (Sunil Kedar) तसेच नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे किंग मेकर म्हणून ओळख निर्माण करणारे आमदार सुनील केदार यांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात विदर्भातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व त्यांच्या कामकाजाच्या विरोधात रोष प्रकट केल्यामुळे या खांदेपालटाची शक्यता वर्तविली जात आहे.
 
Sunil Kedar
 
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचे प्रकरण आणि त्या प्रकरणानंतर बाळासाहेब थोरात यांनी दिलेला विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा तसेच नागपूर शिक्षक मतदार संघातील उमेदवारीवरून उद्भवलेली परिस्थिती यामुळे महाराष्ट्रासह विदर्भातही नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू झाली होती. (Sunil Kedar) काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाणे आणि भाजपा सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर थेट विधानसभा अध्यक्ष आणि त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आल्यामुळे तसेही नाना पटोले यांच्याबाबत काँग्रेसच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, पटोले यांना दिल्लीश्वरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांच्या विरोधात काही करण्यासाठी कोणी समोर सरसावत नव्हते.
 
 
आता मात्र रायपूर काँग्रेस अधिवेशनाचे निमित्त साधून महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी चेन्नीथला आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे पटोलेच्या विरोधात गार्‍हाणे मांडण्यात आले. यात विदर्भातील नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या नेत्यांनी (Sunil Kedar) सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांची नावेही सुचविल्याची माहिती आहे. मोघे यांचे वय पाहता त्यांच्या बाजूने पक्षश्रेष्ठी किती अनुकूल राहतील, याबाबत शंका असून, सुनील केदार यांची एकूण कार्यशैली पाहाता त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करू शकतात, असे वाटते.