सावरकरांचा इतिहासविषयक दृष्टिकोन...

26 Feb 2023 06:00:00
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Veer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा सिद्धांत मांडला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माउलींनी विश्वाच्या कल्याणासाठी ईश्वराकडे पसायदान मागितले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा सिद्धांत हा वैश्विक होता. खर्‍या अर्थाने तो मानवतावादी होता. हिंदुत्व हा ग्रंथ खरोखर अद्भुत आहे. आधुनिक युगाची गीता ठरावी इतके सामर्थ्य या ग्रंथात आहे. इतका अद्भुत, सर्वसमावेशक, वैश्विक आणि व्यापक विचार आधुनिक काळात कुणीच मांडलेला नाही. काँग्रेसने हिंदी राष्ट्रवाद नावाचा एक वेगळा सिद्धांत मांडला होता. तो सर्वसामान्यांमध्ये रुजला, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. तत्कालीन मुसलमान समाजाने हिंदी राष्ट्रवाद नाकारला आहे. उलट हिंदूंनीच हिंदी राष्ट्रवादाचा उदो उदो केला. मूलतः हिंदू मुस्लिम ऐक्य या हट्टासाठी हिंदी राष्ट्रवाद मांडण्यात आला. मात्र, मुसलमान समाजाने या नव्या सिद्धांताकडे पाठ फिरवल्यामुळे काँग्रेसला हा सिद्धांत हिंदूंच्या माथी मारण्याशिवाय पर्याय नव्हता. काँग्रेसच्या अशा फाजील हट्टामुळे भारताला रक्तरंजित फाळणीचा सामना करावा लागला. आधुनिक काळात राष्ट्रवादाचा व्यवस्थित सिद्धांत मांडला तो सावरकरांनी आणि आज भारत देश सावरकरांच्या वैचारिक मार्गावरून चालत आहे. काँग्रेसने राष्ट्रवादाबाबत गोंधळ निर्माण केला होता. सावरकरांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली.
 
 
head04-cover
 
Veer Savarkar सावरकरांनी शस्त्राचा गौरव केला आहे. साहित्य संमेलनाच्या मंचावरून, ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असे म्हणणारा साहित्य महर्षी झाला नाही. त्यांनी अणुबॉम्ब बनवण्याची सूचना केली होती. सावरकरांनी अनेक विषयांवर दीर्घ चर्चा केली आहे. नाट्य लिखाणाविषयी ते म्हणतात की, ‘‘नाटकात मानवी जीवनाचा आदर्श दाखवायला हवा.’’ इतिहासाकडे पाहण्याचादेखील सावरकरांचा विशिष्ट दृष्टिकोन होता. त्यासाठी आपल्याला सावरकरांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्यावे लागेल. सावरकर हे कुटुंबवत्सल होते. त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. ते निःस्वार्थी होते. राष्ट्रासाठी काहीही करण्याची त्यांची सिद्धता होती. सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अंदमानला जाण्यापूर्वी डोंगरीच्या कारागृहात त्यांच्या पत्नीची भेट झाली. सावरकरांनी आपल्या पत्नीकडे पाहिले आणि हसून विचारले, ‘‘काय, मला पाहिल्याबरोबर ओळखलंत का? केवळ कपडे बदललेत. मी तोच आहे. ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे, यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असा संसार कावळा-चिमणीही करतात, पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल, तर आपण आपली चार चूल बोळकी फोडून टाकली, पण त्यायोगे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल.’’
 
 
Veer Savarkar सावरकरांचं व्यक्तिमत्त्व धाडसी होतं, ते शूर होते, त्यांना आपल्या पूर्वजांविषयी आदर होता, आपल्या इतिहासाबद्दल अभिमान होता आणि हौतात्म्याचे एक वेगळेच आकर्षण होते. सावरकरांनी केलेले प्रत्येक कार्य त्यांनी भारतमातेला अर्पण केले आहे आणि ही हिंदू भूमी आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच सावरकर इतिहासाकडे पाहताना हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून पाहायचे. सावरकरांची भारतमातेवर प्रचंड निष्ठा होती. देव आणि देश यामध्ये ते भेद करीत नव्हते. देशसेवा हीच देवसेवा अशी त्यांची मनोधारणा होती. देशासाठी प्राण अर्पण करून मिळालेली मुक्ती त्यांना प्रिय होती. सावरकरांच्या इतिहास लेखनात आणि इतिहासविषयक ललित साहित्यात राष्ट्राविषयी निष्ठा दिसून येते. आपला पती बंदिवान झाला असतानाही शत्रूला शरण न जाता, पुरुष वेष धारण केलेली सुलोचना म्हणते, ‘‘आता शरण नव्हे रण मारित मारित मरण.’’
 
 
‘1857 चे स्वातंत्र्यसमर’, ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’, ‘हिंदुपदपादशाही’, ‘नेपाळी आंदोलनाचा इतिहास’ हे सावरकरांचे इतिहासविषयक ग्रंथ आहेत. सावरकरांना लहानपणापासूनच इतिहासाचे आकर्षण होते. त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती. छत्रपती आणि पेशव्यांच्या बखरीच्या वाचनाने त्यांच्या मनात मराठी सत्तेबद्दल आदर निर्माण झाला होता. इतिहासाच्या माध्यमातून झालेल्या संस्काराद्वारे त्यांच्या मनात पराक्रमाची भावना जागृत झाली होती. किशोरवयात त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अष्टभुजा देवीसमोर घेतलेल्या शपथेची तुलना छत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी रायरेश्वरासमोर घेतलेल्या शपथेशी करता येईल. कारण या दोन्ही महापुरुषांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना स्वातंत्र्यप्राप्तीची शपथ घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली.
 
 
‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात सावरकर लिहितात, ‘‘आमच्या महाशालेय कालातच आम्ही त्या वेळच्या मराठी इतिहासाच्या विस्तृत पण विस्कळीत पसार्‍यावर हिंदुराष्ट्र दृष्टीच्या विद्युल्लतेचा प्रकाशझोत टाकताच आमचे मनही अकस्मात प्रकाशमय झाले.’’ काही लेखकांचे असे मत आहे की, सावरकर अंदमानात गेल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन हिंदुत्ववादी झाला. मात्र, सावरकरांचे वरील नमूद वाक्य पाहता त्यांचा या दृष्टिकोनाला महाविद्यालयीन काळातच आकार प्राप्त झाला होता. Veer Savarkar सावरकरांच्या साहित्यात हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र असे शब्द अनेकदा येतात व त्यांचा उल्लेख गौरवाने झालेला आहे. सावरकरांनी हिंदूंच्या इतिहासावर झालेल्या टीकेचे खंडण केले आहे. ‘हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा आहे’ ही अंधश्रद्धा सावरकरांनी दूर केली. ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. या ग्रंथाद्वारे सावरकरांनी दाखवून दिले की, आपला इतिहास पराभवाचा नसून पराक्रमाचा आहे. आपण प्रत्येक दशकांत पराक्रम गाजवला आहे. बरं, हिंदुत्ववादी दृष्टिकोन जोपासताना हिंदूंनी केलेल्या चुकांवर सावरकरांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे जरी त्यांचा दृष्टिकोन हिंदुत्ववादी असला, तरी हा हिंदुत्ववाद बुद्धिनिष्ठेच्या भक्कम पायावर उभा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
सावरकरांच्या इतिहास लेखनाचा परिणाम इंग्रजांवर झाला. 1857 ची लढाई हे सामान्य बंड नसून ते स्वातंत्र्यसमर आहे, असे Veer Savarkar सावरकरांनी पटवून दिले. हा ग्रंथ सावरकरांनी मराठीत लिहिला होता. त्यांनी हा ग्रंथ इंग्लंडहून भारतात पाठवला होता. ‘अभिनव भारत’ ही संस्था या ग्रंथाचे प्रकाशन करणार होती. परंतु, हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली. म्हणून हा ग्रंथ पुन्हा सावरकरांना पाठवण्यात आला. पुढे त्या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर झाले आणि इंग्लंडमध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी डॉ. कुटिनो (अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते) यांनी मूळ मराठी ग्रंथ अमेरिकेत नेला. 1946 मध्ये इंग्रजांनी या ग्रंथावरील बंदी उठवली तेव्हा त्यांनी हा ग्रंथ सावरकरांना परत सुपूर्द केला. सावरकरांनी लिहिलेल्या या इतिहासविषयक ग्रंथाची दहशत इंग्रजांनी घेतली होती. सावरकरांचा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन इंग्रजांनी ओळखला होता.
 
 
मुसलमानी आक्रमणांविषयी अनेकांचा सूर नकारात्मक असतो. मुस्लिमांनी हिंदूंवर राज्य केले आणि हिंदूंनी प्रतिकार केलाच नाही, असा स्वरूपाचा समज त्या काळी निर्माण झाला होता. दुर्दैवाने आजही काही लोक तोच पाढा गिरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदूंनी आपल्या प्रत्येक शत्रुविरोधात कडवी झुंज दिली आहे. हूनांचा दारुण पराभव केल्यानंतर काही शतकांनी मुसलमानी आक्रमण झाले. हे आक्रमण केवळ राज्याची सीमा वाढवण्यासाठी अथवा हे केवळ विस्तारवादी आक्रमण नव्हते, तर त्यास धार्मिक स्वरूपही होते. आपल्या राज्याच्या सीमा वाढवणे हा हेतू होताच; त्याचबरोबर आपल्या धर्माच्या सीमासुद्धा वाढवायच्या होत्या. मात्र हिंदूंनी कडवा प्रतिकार केला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या मनात पुन्हा देशप्रेमाची भावना जागवली. स्वराज्य म्हणजेच हिंदुराष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपर्यंत झेंडा रोवला आणि मुस्लिमांच्या विरोधातल्या या युद्धामध्ये हिंदूंनी विजय प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख सावरकर ‘हिंदुनृसिंहा’ असा करतात. सावरकरांनी राजकारणाची आणि हिंदुत्ववादी दृष्टिकोनाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेतली असावी. शिवाजी महाराजांवर रचलेल्या आरतीमध्ये ‘जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणां, आर्या ताराया’ आणि ‘साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया, भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या’ अशी विनवणी सावरकर छत्रपतींना करतात. Veer Savarkar सावरकरांच्या मनामध्ये शिवरायांविषयी अतिशय पवित्र आणि आदराची भावना होती.
 
 
आपला इतिहास कसा लिहावा आणि कसा वाचावा, याविषयी Veer Savarkar सावरकरांची भूमिका स्पष्ट होती. मात्र, ही भूमिका मांडताना त्यांनी बुद्धिनिष्ठेचा त्याग केला नाही हे विशेष. सावरकर भारताच्या इतिहासाकडे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून पाहायचे आणि त्यांनी इतिहासाचं लेखनसुद्धा हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून केलेले आहे. हे हिंदी राष्ट्र आहे किंवा पुढे ज्यास धर्मनिरपेक्ष म्हटले गेले, असा गोंधळ काँग्रेसने घातला. याचे परिणाम आपल्याला अनेक काळ भोगावे लागले असले, तरी सावरकरांचा दृष्टिकोन जनमानसामध्ये हळूहळू रुजत होता. आता भारतीय समाज जागृत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या यशामागे त्यांचे कर्तृत्व, कौशल्य आहेच; त्यांच्या पक्षाच्या आधीच्या पिढीचे योगदानही आहेच; त्याचबरोबर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळी जी बीजे पेरली होती, त्यांचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे आणि त्यांची मधूर फळे आपल्याला चाखायला मिळत आहेत, असा यामागचा व्यापक अर्थ आहे. एक राष्ट्र म्हणून पुढे जाताना नागरिकांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देऊन समाजात राष्ट्रीय मूल्य प्रस्थापित केली पाहिजेत. याची प्रेरणा सावरकरांकडून घेता येते.
 
- 9967796254
Powered By Sangraha 9.0