संतनगरी आजनसरा ते शक्तीपीठ माहूर बससेवा सुरू

27 Feb 2023 19:49:38
तभा वृत्तसेवा 
आजनसरा, 
आजनसरा (Ajansara) या तिर्थस्थळी संत भोजाजी महाराजांच्या दर्शनाला व पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हिंगणघाट आगाराकडून रविवारपासून आजनसरा ते माहूर ही संतनगरी ते शक्तीपीठ बसफेरी सुरू करण्यात आल्याने भोजाजींच्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
Ajansara
 
आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नातून हिंगणघाट आगाराला 10 नवीन गाड्या मिळाल्या आहे. त्यातीलच नवीन कोरी गाडी नियमित (Ajansara) या मार्गासाठी देण्यात आली असल्याने भाविक भक्तांचा आरामदायी प्रवास होणार आहे. ही बस श्रीक्षेत्र माहूरवरून सकाळी 7 वाजता सुटणार असून धनोडा, आर्णी, यवतमाळ, कळंब, राळेगाव, कापशी मार्गे आजनसरा येथे सकाळी 11 वाजता पोहचून हिंगणघाट आगारातून दुपारी 3 वाजता आजनसरा मार्गे माहूरसाठी निघणार आहे.
 
 
संत भोजाजी महाराज व सती सोनामाता या महान संतांनी जन्म घेऊन आजनसरा (Ajansara) या संत नगरीला पावन केले आहे. येथे यवतमाळ, अमरावती, नांदेड, वाशीम, अकोला बुलडाणा जिल्ह्यातून दर्शनासाठी महिन्याला लाखो भाविक व पर्यटक येतात. परंतु, या मार्गावर थेट बससेवा नसल्याने आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे देवस्थानाचे अध्यक्ष माजी पंस सदस्य डॉ. विजय पर्बत, सरपंच श्रावण काचोळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर यांनी आगार व्यवस्थापनाकडे सतत पाठपुरावा केल्याने रविवारपासून आजनसरा ते माहूर अशी थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे.
 
 
यावेळी वर्धा आगाराचे विभागीय वाहतूक अधिकारी विजय धायडे, संत भोजाजी महाराज देवस्थान द्वारा संचालित सेवार्थ दवाखान्याचे व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, प्रशासकीय विभागाचे सुरेश डेकाटे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोसूरकर, सरपंच श्रावण काचोळे यांनी बसचे पूजन करुन हिरवी झेंडी दाखवली. यावेळी हिंगणघाट आगाराचे सूर्यवंशी, गजानन बोरकर, प्रभाकर धुर्वे, लक्ष्मण खांडस्कर, चालक संतोष किरतवार, वाहक प्रशांत अरदपायरे यांच्यासह भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
 
Powered By Sangraha 9.0