चंद्रपूर,
मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असलेले Vinod Mohitka महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्याकडे शासनाने तंत्रशिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. डॉ. मोहितकर यांनी सिव्हिलमध्ये बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग केल्यानंतर महामार्ग आणि वाहतूकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर व्यवसाय प्रशासन (वित्तीय व्यवस्थापन) मध्ये पदव्युत्तर पदविका आणि नंतर पीएचडी पूर्ण केली. डॉ मोहितकर यांना तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासक ते धोरण निर्माते म्हणून 22 वर्षांचा आणि अभियंता म्हणून 10 वर्षांचा अनुभव आहे.
2017 मध्ये एमएसबीटीईचे संचालक Vinod Mohitka म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. मोहितकर यांनी सहायक परिवहन अभियंता म्हणून काम केले. तसेच सहायक संचालक (टेक) व तंत्रशिक्षण संचालनालयात तंत्रशिक्षण उपसंचालक म्हणून कार्य केले. डॉ. मोहितकर हे उत्तम प्रशासक आणि उत्तम शिक्षणतज्ज्ञही आहेत. त्यांच्या नावावर तीन पेटंट आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात समाजासाठी योग्य योगदानाबद्दल सर सी. व्ही. रमण मेमोरियल पुरस्कार 2012 आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनद्वारे अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात समर्पित सेवांसाठी सेवा पुरस्कार 2018 चे ते प्राप्तकर्ते आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि व्हीजेटीआय मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. आपल्यावर विश्वास दाखवून संधी दिल्याबद्दल डॉ. मोहितकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचे आभार मानले आहेत.