ही साधना सोपी नाही!

05 Feb 2023 06:00:00
रोखठोक
- दिनेश गुणे
योगसाधनेचे विविध प्रकार आपल्याला नवे नाहीत. प्राणायाम, सूर्यनमस्कार आदींचा प्रसार अलिकडच्या काळात झपाट्याने होऊ लागला आहे. मोदी सरकारच्या पुढाकारामुळे जगभर योग दिवस साजरादेखील केला जाऊ लागला आहे. योगविद्या, अस्सल भारतीय व्यायामप्रकारांची माहिती मिळू लागल्याने, अशा प्रकारांमुळे मन आणि शरीर सुदृढ होते, याची सर्वांस कल्पना आहे. प्राणायाम आपल्याला माहीत असला, तरी Dravidian Pranayama द्राविडी प्राणायाम नावाच्या एका प्रकाराचा मोठा बोलबाला असूनही, तो प्रत्यक्षात कसा केला जातो, हे फारसे कोणास ठावूक नसते. सूर्यनमस्कारांचेही तसेच आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार सर्वांस माहीत आहे. पण राजकारणातील सूर्यनमस्कार सोपे नसतात. काही क्षेत्रांत द्राविडी प्राणायाम, सूर्यनमस्कार हेच प्रचलित योग आणि व्यायामप्रकार असल्याने, त्यांचा संबंधितांच्या मनावर किंवा शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो हे सांगता येत नसले तरी त्या त्या क्षेत्रांत हेच प्रकार अधिक लोकप्रिय असतात. राजकारणात तर याच प्रकारांचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे, द्राविडी प्राणायाम हा राजकीय योगप्रकार आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
 
 
rokhthok04feb

 
Dravidian Pranayama द्राविडी प्राणायामाची कृती नेमकी सांगता येत नाही. तो कसा करावा, हे शिकविणारे कोणी योगगुरू राजकारणातदेखील अस्तित्वात नाहीत. पण द्राविडी प्राणायाम करणार्‍या राजकीय योगगुरूंचे एकलव्याच्या निष्ठेने निरीक्षण केले, तर सरावाने तो प्रकार आकळता येऊ शकतो, आणि क्वचित प्रसंगी तो जमूनही जातो. मात्र, आपण करतो तो द्राविडी प्राणायामच आहे, हे तो योग करणार्‍यासही माहीत नसते. त्यावर लक्ष ठेवणार्‍यांनी त्यास द्राविडी प्राणायाम असे नाव दिलेले असते. प्रत्येकाची हा योगप्रकार करण्याची आपापली स्वतंत्र पद्धत असते. त्यामुळे द्राविडी प्राणायामाचे अनेक प्रकार राजकारणात पाहावयास मिळतात. एखाद्याच नेत्यास या प्राणायामाचे अनेक प्रकार साध्य होतात आणि प्रसंगानुरूप कोणत्या प्रकारे कोणता प्रकार करावा हेही त्यास चांगले अवगत असते. महाराष्ट्रात असा द्राविडी प्राणायाम करणार्‍या काही ठराविकांच्या मांदियाळीत शरद पवार यांचे नाव मोठे आहे. शरद पवार द्राविडी प्राणायाम करतात, पण त्याचे परिणाम मात्र इतरांच्या मन आणि शरीरावर होत असतात, ही एक मोठी जादू आहे. अगदी अलिकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या बाबतीत एक मोठा गौप्यस्फोट केला. राज्यभर गाजलेला तो पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातून कधीच पुसला जाणार नाही. खरे तर तो पहाटेचा शपथविधी नव्हताच. शपथविधी संपन्न झाला तेव्हा चांगलेच उजाडले होते. (आम्ही सूर्योदयाआधीच काम सुरू करतो तरी त्याला पहाटेचा शपथविधी का म्हणतात हा प्रश्न अजूनही अजित पवारांना छळतो आहे.) 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि 23 नोव्हेंबर 2019 च्या भल्या सकाळी राजभवनावर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या संयुक्त सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
 
 
 
त्यानंतर राज्यात उडालेली खळबळ, फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचे झालेले कौतुक आणि त्यापाठोपाठ या सत्तास्थापनेवर अजित पवार यांच्या बंडाचा ठपका ठेवून ते मोडून काढण्यासाठी शरद पवार यांनी दाखविलेली राजकीय चाणक्यनीती हे सारे आजही महाराष्ट्रास लख्ख आठवत आहे. अजित पवार यांचे ते कथित बंड, पहाटेच्या शपथविधीनंतर स्थापन झालेले व जेमतेम 72 तास तग धरू शकलेले ते फडणवीस-पवार सरकार आणि पाठोपाठ घडून आलेल्या राजकीय उलथापालथींमागे शरद पवार यांचाच हात असावा, असा शंकेच्या सुरातील गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केला. महाराष्ट्रात लागू असलेली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून निवडणुकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी शरद पवार यांच्या पाठिंब्यानेच अजित पवार यांनी फडणवीस यांचा हात धरून भाजपला कात्रजचा घाट दाखविला असावा, असा जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटाचा सारांश असल्याने, पवार यांनी सरकार स्थापनेच्या खेळाचा अचाट Dravidian Pranayama द्राविडी प्राणायाम कसा केला असावा, ते आता लोकांस उमगू लागले आहे. त्या घडामोडींमागे शरद पवार यांचा खरोखरीच हात होता का, असेल तर जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटापर्यंत ते लपवून का ठेवले गेले, जयंत पाटील यांच्या गौप्यस्फोटामुळे शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले की अजित पवार यांनाच कात्रजचा घाट दाखविला गेला, असे काही प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत हे खरे असले, तरी द्राविडी प्राणायामाच्या या प्रकारातून महाराष्ट्राच्या राजकारणाचे वेगळेच कंगोरे तेव्हा स्पष्ट झाले होते. जयंत पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे शरद पवार यांच्या द्राविडी प्राणायाम कौशल्याचे आणखी एक रूप उघड झाले आणि चर्चेचा सारा रोख तीन वर्षांपूर्वी घडून गेलेल्या त्या शपथविधीवर खिळला. त्यानंतर राज्यात बर्‍याच घडामोडी घडल्या, पण त्या शपथविधीचे गूढ लोकांच्या मनात अजूनही औत्सुक्याचा विषय होऊन घर करून बसलेले असल्याने त्याची चर्चा घडवून पाटील यांनी अजित पवार यांच्या राजकीय जखमेवरची एक खपली अलगद काढली. त्यानंतर आता अजित पवार बोलू लागले आहेत आणि त्या प्रकाराची सारवासारव करताना त्यांच्यावरील राजकीय अन्यायाच्या व्यथादेखील बोलक्या होऊ लागल्या आहेत.
 
 
अन्य महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या त्या गौप्यस्फोटाचा प्रकार बासनात गुंडाळला असला, तरी त्यानंतरच्या अजितदादांच्या वक्तव्यांतून त्यांच्या अनेक व्यथांना वाचा फुटू लागल्याने, जुन्या जखमेवरील ती खपली काढून अजितदादांना बोलके करण्यासाठीच हा Dravidian Pranayama द्राविडी प्राणायाम केला गेला का, अशीही शंका येऊ शकते. त्या शपथविधीची चर्चा जयंत पाटील यांनी नव्याने सुरू केल्यानंतर अजित पवार यांनी गुलदस्त्यातील अनेक बाबी उघड केल्या. 2019 मधील शपथविधीची घटना भूतकाळात जमा करून त्यावर भाष्य करण्याचे टाळणार्‍या अजितदादांच्या मनात 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचे शल्य अजूनही बोचते आहे. आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्या व्यक्ती माझ्या विश्वासाला पात्र ठरल्या नाहीत, असे अजित पवार यांनी अलिकडेच स्पष्ट बोलून दाखविले. त्याआधीच्या, 2004 मधील निवडणुकीपासून बोचणारी एक सलदेखील अजित पवार यांनी व्यक्त केली. त्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे चालून आलेले मुख्यमंत्रिपद काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असता, तर साहजिकच ते पद अजित पवार यांना मिळाले असते, असे आजही अनेकांना वाटते. अजितदादांची ती खंत परवा बोलकी झाली. त्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपद सोडावयास नको होते, आर. आर पाटील, छगन भुजबळ किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते, त्यापैकी कोणासही मुख्यमंत्री करावयास हवे होते, या त्यांच्या विधानातून स्वत:स डावलले गेल्याच्या जाणिवेचे सूक्ष्म पदर हलकेच उलगडत गेले आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी तोच धागा पकडून अजितदादांच्या जखमेवर फुंकर घातली. अजितदादांनी आपल्या व्यथा पत्रकार परिषद घेऊन मोकळेपणाने व्यक्त करावयास हव्यात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तेव्हा, वरिष्ठांनी निर्णय घ्यायचे आणि आम्ही मान डोलावून त्यास सहमती द्यायची असाच प्रकार होता, हे अजित पवारांचे वाक्य, शरद पवार यांच्या निर्णयातील चुकीवर बोट ठेवणारेच ठरले आणि राजकारणातील घडामोडींमागील द्राविडी प्राणायामाचा एक नवा प्रकार उजेडात आला.
 
 
अजित पवार यांना डावलले जात असल्याची कुजबुज अधूनमधून राजकीय वर्तुळात सुरू असते. अजित पवारांची काही विधाने त्यास अप्रत्यक्ष दुजोरा देणारी असतात. हे सारे कशासाठी सुरू आहे, हे मात्र अजूनही कोणास कळलेले नाही. 2024 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर काय कराल, असा प्रश्न अलिकडे कुणा पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर थेट उत्तर न देता, आत्याबाईला मिशा असत्या तर, या प्रसिद्ध म्हणीचा संदर्भ देत त्यांनी प्रश्नाला बगल दिली, पण आपण अन्यायग्रस्त आहोत, या छुप्या भावनेचा पदर त्यातूनही पुढे आलाच. अशा बगलबाज उत्तरांतून अजितदादा आपल्या मनातील नाराजीचे संकेत देत असतात. आपल्या व्यथांना वाट करून देण्याची संधी त्यांना दिली जात आहे की त्यांच्या मनातील राजकीय वाटचालीचा मार्ग अधिक मोकळा व प्रशस्त करून देण्याचा हा प्रकार आहे, की अजितदादांची कोंडी करून त्यांचे महत्त्व कमी कमी करण्याचा प्रयत्न आहे, हे आज तरी स्पष्ट झालेले नाही. कदाचित, याच भावनेतून अजितदादांनी देखील एक गौप्यस्फोट करून टाकला असावा. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून खुद्द शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला होता, असे अजितदादा म्हणाले आणि Dravidian Pranayama द्राविडी प्राणायामाचा आणखी एक प्रकार समोर येऊ लागला. अशा वक्तव्यांमागील राजकीय संकेतांचे अर्थ शोधणे सोपे नसते. शरद पवार यांच्या रदबदलीनंतरही सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीसंदर्भातील काँग्रेसची भूमिका बदलली नाही, यावरून पवार यांच्या मध्यस्थीचे वजन कमी झाले असा अर्थदेखील अजितदादांच्या गौप्यस्फोटानंतर लावला जात आहे. अजितदादांच्या विधानातील द्राविडी प्राणायामाचा हा वेगळा प्रकार म्हणावा लागेल.
 
 
पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील जयंत पाटील यांच्या त्या शंकेनंतर अजित पवार यांनी तर गौप्यस्फोटांची माळच लावली आहे. शिवसेनेत बंडाचे वारे धुमसत असल्याची शंका आपण अगोदरच उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलूनही दाखविली होती, पण उद्धव ठाकरे गाफील राहिले, असा नवा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनाही या बंडाचा अंदाज आला होता, पण हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीबाबतचा प्रश्न असाच टोलवून, तो ठाकरे आणि आंबेडकर यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी आमचा संबंध नाही असे अजित पवार म्हणाले होते. शिवसेनेचे आमदार फुटणार याची कल्पना खुद्द शरद पवार यांनी दोन, तीन वेळा उद्धव ठाकरे यांना दिली होती, पण हा आमचा पक्षांतर्गत मामला आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी खुशाल या गोष्टी घडू दिल्या, असेही अजित पवार म्हणाले. आमदार फुटणार हे माहीत असूनही शरद पवार यांनी ठाकरे यांना सावध करण्यापलीकडे सरकार सावरण्यासाठी आपले वजन पणाला का लावले नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडेही खुद्द शरद पवार यांच्या इशार्‍याचे वजन कमी झाले का, अशा शंका अजित पवार यांच्या इशार्‍यानंतर व्यक्त होऊ लागल्या. शिवसेनेतील फुटीस उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष ठपकादेखील अजितदादांनी ठेवल्याने, त्यांच्या वक्तव्यातून सुटणारे बाण किती जणांचा वेध घेतात, यावरही तर्कवितर्क सुरू झाले. अजित पवार भाजपविषयी बोलताना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध सूर लावतात, अशीही चर्चा सध्या सुरू आहे. भाजपविरोधातील त्यांच्या टीकेची धार कमी होत आहे का, अशीही शंका व्यक्त होत असते.
 
 
राजकारणात प्राणायामाची जागा Dravidian Pranayama द्राविडी प्राणायामाने घेतली, तशी सूर्यनमस्काराचाही नवा प्रकार अलिकडे अस्तित्वात येत आहे. या प्रकारात केवळ कमरेतून वाकावे लागते. शक्यतो सूर्यनमस्काराचा हा प्रकार सातत्याने करावा लागत नाही. कारण, यामध्ये उगवत्या सूर्यास नमस्कार करणे अभिप्रेत असते. कोणता सूर्य केव्हा उगवेल याचा नेमका अंदाज घेणे व त्या सूर्यास नमस्कार करणे हे सहजासहजी ओळखणे सोपे नसते. त्यासाठी द्राविडी प्राणायामांतून मिळणार्‍या संकेतांचा अर्थ लावण्याचे कसब प्राप्त करावे लागते. उलटे सूर्यनमस्कार हा अलिकडे राजकारणात येऊ घातलेला आणखी एक व्यायामप्रकार आहे, पण त्याला अजून सारे जण सरावलेले नाहीत. शिवसेनेचे नेते व दापोली रिसॉर्ट प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले मविआ सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या उलट्या सूर्यनमस्कारांचा प्रयत्न मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टिपला. असे उलटे सूर्यनमस्कार याआधीही राजकारणाच्या योगसाधनेत कदाचित घातले गेले असतील, पण द्राविडी प्राणायाम आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या प्रस्थापित योगसाधनेत त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नसावे. आता उलट्या सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके शोधण्याची सुरुवात होईल आणि राजकीय साधकांना नव्या योगविद्येची ओळख होईल. भविष्यात राजकीय योगसाधना अधिक मनोरंजक होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. 
Powered By Sangraha 9.0