मराठी तरुणांकरिता ‘अग्निवीर’

भरती मेळाव्यापूर्वी ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा

    दिनांक :12-Mar-2023
Total Views |
राष्ट्ररक्षा
'Agnipath' scheme ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका 27 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. या निर्णयामुळे योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे, असे मत न्यायालयाने याचिका फेटाळताना मांडले आहे. अग्निपथ योजनेला आव्हान देणार्‍या याचिका देशाच्या विविध भागांत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग केली होती. सर्व याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात सरन्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यात या खंडपीठाने अग्निपथला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळून लावल्या. अग्निपथ योजना ही संरक्षण भरतीमधील सर्वात मोठ्या धोरणात्मक बदलांपैकी एक बदल असेल.
 
 
agniveer1
 
अग्निपथ योजना भारतीय लष्करातील तज्ज्ञांनी तयार केली
न्यायालयाने म्हटले की, 'Agnipath' scheme अग्निपथ योजना ऐच्छिक आहे. ज्यांना याबाबत कोणती अडचण असेल, त्यांनी सशस्त्र दलात भरती होऊ नये. भरतीसाठी अग्निपथ योजना भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील तज्ज्ञांनी तयार केली. न्यायाधीश हे लष्करी तज्ज्ञ नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने याबाबत विशेष धोरण केले आहे. कोणते अधिकार काढून घेतले आहेत हे सिद्ध करावे अन्यथा यात सामील होऊ नये. कोणतीही सक्ती नसेल. जर तुम्ही चांगले असाल तर त्यानंतर (चार वर्षांनंतर) तुम्हाला कायमस्वरूपी समाविष्ट केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. योजनेच्या नियमांनुसार, साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील युवक अर्ज करण्यास पात्र आहेत. 2022 मध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली.
 
 
50 हजार अग्निवीरांची दरवर्षी भरती
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शंकांचे वादळ आता अजीन शांत होईल. या योजनेंतर्गत सुमारे 50 हजार 'Agnipath' scheme अग्निवीर दरवर्षी भरती केले जातील. ही योजना सशस्त्र दलात चार वर्षांच्या सेवाकालासाठी असून यातील 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी केडर म्हणून आणखी 15 वर्षे सेवेत कायम राहता येणार आहे. अग्निवीर योजनेंतर्गत पार पडलेल्या भरती प्रक्रियेत तरुणांचा लाखोंच्या संख्येने सहभाग पाहता ते राष्ट्रसेवेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते. त्यात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीने आपापल्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या योजनेचे अधिक परिपक्व आणि व्यावहारिक पद्धतीने पुनरावलोकन करणे शक्य होईल.
 
 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जुन्या प्रशिक्षण पद्धती सुरू ठेवणे चुकीचे
1998 मध्ये सशस्त्र दलांसह सर्व केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय हे दोन वर्षांनी वाढविण्यात आले होते. त्याचप्रमाणे सैन्यदल, हवाईदल आणि नौदलातील जवानांच्या सेवाशर्तींमध्ये वेळोवेळी बदल होत गेले आहेत. या आधी भरतीनंतर तांत्रिक प्रशिक्षणामध्ये मोठा कालावधी जात असे. सध्याच्या काळात देशातील सर्व तरुण तंत्रज्ञानस्नेही आहेत, त्यामध्ये खेड्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, प्रत्येक जण डिजिटल पेमेंटचा वापर करीत आहे. अनेकांनी आयटीआयसारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन भरतीच्या आधीच तांत्रिक शिक्षण घेतले आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात जुन्याच प्रशिक्षण पद्धती सुरू ठेवणे चुकीचे व खर्चिक आहे. यामुळे प्रशिक्षण कालावधी कमी करणे शक्य असून मूलभूत प्रशिक्षण दिले तर लष्करात प्रावीण्यही मिळविता येईल. जगातील अनेक सशस्त्र दलांमध्ये असेच केले जाते. 'Agnipath' scheme अग्निपथ योजना तयार होत असतानाही या मुद्यांबाबत परदेशी सेवाप्रमुख आणि शिष्टमंडळांशी चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणाच्या कालावधीपेक्षा प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे.
 
 
अग्निवीर युनिटचा कार्यक्षम भाग
'Agnipath' scheme योजनेंतर्गत अग्निवीरांचे ‘बॉण्डिंग’ आणि सहकार्याची भावना तसेच वेळ आल्यावर अग्निवीर याचे प्रदर्शन कसे करतील, या पैलूंवरही चर्चा झाली आहे. त्याची जबाबदारी युनिट्सवर आहे. भारतीय सैन्यदलात एक म्हण आहे - ‘कोणतीही युनिट चांगली किंवा वाईट नसतात, तर केवळ चांगले आणि वाईट अधिकारी असतात.’ जर युनिटमधील ‘वरिष्ठ’ चांगले असतील, तर ते अग्निवीरांना युनिटचा कार्यक्षम भाग बनवतील. 1971 च्या युद्धापूर्वी कमी प्रशिक्षण कालावधीनंतर भरती झालेल्या जवानांना युनिट्समध्ये समाविष्ट केले गेले आणि काही महिन्यांतच ते लढाईला गेले होते. एक किंवा दोन महिन्यांत त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली तसेच या योजनेतील अग्निवीरही सक्षम होतील. तरुण जवानांमध्ये अधिक जोखीम घेण्याची क्षमता असते. आजवर बहुतांश शौर्य पुरस्कार मिळालेल्यांमध्ये तरुण जवान जास्त आहेत. सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव फक्त 19 वर्षांचे होते, जेव्हा त्यांना कारगिल युद्धात त्यांच्या विशिष्ट शौर्यामुळे परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. अग्निपथ योजना तयार करताना केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राज्य पोलिस तसेच इतर मंत्रालयांमध्ये या अग्निवीरांना सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतर लॅटरल इंडक्शनच्या (पुन्हा नियुक्ती) पैलूवर विचार केला गेला. 'Agnipath' scheme अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर अग्निवीरांच्या पुनर्वसनाच्या मुद्यावरून गृह मंत्रालय आणि काही राज्य सरकारांनी लगेच 10 टक्के लॅटरल इंडक्शनची घोषणा केली होती.
 
 
संतुलन साधण्यासाठी लष्कर भरतीत बदल
भरती प्रक्रियेतून निवडले जाणार उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि बुद्धिमान असतील. उमेदवारांच्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या या लेखी परीक्षेनंतर घेतल्या जातील. लेखी परीक्षेसाठी आता प्रत्येकी 500 रुपये शुल्क असेल. त्यातही भारतीय लष्कर प्रत्येकी 250 रुपये देईल. त्यामुळे,उमेदवारांना प्रत्येकी 250 रुपयेच द्यावे लागतील. 'Agnipath' scheme अग्निवीरांच्या भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून त्याची अधिसूचनाही जारी केली आहे. ‘अग्निवीर’ भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आहे. ‘बोनस’ अंक ज्याने 10 वी पास, शिवाय आयटीआय दोन वर्षांचा कोर्स केला आहे; एनसीसीचे बी, सी प्रमाणपत्र आहे, उत्कृष्ट खेळाडू आहेत याला दिले जातील. यानुसार यापुढे लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना आधी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती (फिजिकल फिटनेस) आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील. नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. 2023-24 च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल. अग्निवीर भरतीसाठी पहिली ऑनलाईन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे 200 ठिकाणी घेतली जाणार आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल. जे उएए पार होतील, त्यांना दुसर्‍या टप्प्यात, सैन्य भरती कार्यालयांद्वारे ठरविल्या जाणार्‍या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जिथे त्यांची शारीरिक क्षमता चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. शेवटी तिसर्‍या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.
 
 
भरतीची तयारी कशी करावी?
भरती वैद्यकीय चाचणी एका चांगल्या डॉक्टरकडून करून घ्यावी. शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, लांब उडी मारणे आणि सिंगलबारवर 10 पुलप्स काढणे हे सामील असते. त्याचा सराव करावा, व्यायाम करावा. लेखी परीक्षेची तयारी करावी. त्याकरिता पुस्तके मोठ्या पुस्तकाच्या दुकानात मिळू शकतील. भरतीसाठी राज्य शासनाची भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सातारा, कोल्हापूर, बुलडाणा या ठिकाणी आहेत. तरुणांनी या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या जगातील सर्वांत तरुण लोकांमध्ये असल्याचे स्पष्ट होते. मात्र, ही लोकसंख्या शिस्तबद्ध आणि राष्ट्रीय प्रेमाने प्रेरित असेल, तर ही त्या देशासाठी लाभदायक बाब असेल. 'Agnipath' scheme अग्निपथ योजनेचेदेखील हेच तत्त्वज्ञान आहे, जे सशस्त्र दल, राष्ट्र आणि अग्निवीरांच्या फायद्याचे ठरेल. सर्व नवीन योजनांमध्ये सुरुवातीला काही अडचणी असतात. याचा विचार करता अभ्यासक्रम दुरुस्तीसाठी नेहमीच जागा असेल. त्यामुळे अग्निपथ योजना यशस्वी करण्यासाठी सामूहिक संकल्पाची तसेच आवश्यक असल्यास सकारात्मक बदलांची गरज आहे.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
 (लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)