परीक्षा बघणारा काळ...

    दिनांक :12-Mar-2023
Total Views |
- अखिलेश बांदेकर
 
शिक्षणतज्ज्ञ
Examination time : काळ बदलतो तशा जगण्याशी संबंधित संकल्पनाही बदलतात. या निकषानुसार आता जगण्याचे आयाम बदलले आहेत. पूर्वीची शिक्षणाकडे बघण्याची ‘ज्ञानार्जना’ची भूमिका आता ‘अर्थार्जना’त परावर्तित झाली आहे. ज्ञानोपासना हेच तेव्हाचे बालसुक्त होते. व्यासंग, अभ्यास, वादविवाद, अभिव्यक्त होणे आदी शिक्षणाची विविध अंगे काल-परवापर्यंत अत्यंत महत्त्व राखून होती. त्यामुळेच रट्टा मारून शिकत चांगल्या गुणांचा हव्यास कमी आणि एखाद्या विषयातील परिपूर्ण ज्ञानाची आसक्ती अधिक, ही पूर्वीची स्थिती होती. मनुष्याची विद्यार्थिदशा कधीच संपत नसते, या उक्तीवर विश्वास ठेवत माणूस सतत शिकत असे आणि शिकवत असे. बाकी कशाचीही चोरी करता येते; मात्र ज्ञानाची चोरी करता येत नाही; हा विचार प्रमाण मानणारी ती पिढी होती. ती ज्ञानदान हे सर्वोत्तम दान मानायची. हे दान दिल्याने वाढते, या दृढभावनेने ती जगायची आणि अर्थार्जनाचा हेतू न ठेवता विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करून देशाला आधार देणारी खंबीर आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी झटायची. मात्र काळ बदलला आणि या उदात्त विचारांचाही क्षय झाला. आताचे शिक्षण इतके निकोप आणि निरामय राहिलेले नाही. समाज शिक्षित आणि शिक्षणाचे महत्त्व जाणणारा असला, तरी सरस्वतीचे खरे पूजक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. जुजबी ज्ञान मिळवून लवकरात लवकर चांगल्या पगाराची नोकरी शोधण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यातही अर्थार्जन रुपयामध्ये नव्हे तर भरभक्कम परदेशी चलनामध्ये असावे या हेतूनेच प्राथमिक शिक्षणाच्या वावरात प्रयत्नांचे बीज पेरले जाते. त्यामुळेच त्यावर पोषित झालेल्या पुष्ट वेलींची रुजवण परदेशी भूमीत होताना दिसते. अशा बदलत्या अपेक्षा, परिस्थिती आणि अनाकलनीय उद्देशाच्या जंजाळात अडकलेले विद्यार्थी भरकटले नाहीत तरच नवल...
 
 
School-Exam-Pattern1
 
सध्याच्या Examination time परीक्षांच्या काळात ही बाब प्रकर्षाने जाणवते, म्हणून या काळात विद्यार्थ्यांवर येणार्‍या ताणाची दखल घ्यावीशी वाटते. खरे पाहता वर्षभर केलेला अभ्यास, ग्रहण केलेले ज्ञान, शिकलेला विषय समर्थपणे मांडण्याचा मार्ग म्हणजे परीक्षा. याद्वारे एक प्रकारे स्वत:च्या बुद्धीचे अवलोकन होते, क्षमतेचा अंदाज येतो आणि कोणत्या विषयात आणखी किती प्रयत्न करावे लागतील याची स्पष्टताही येते. मात्र हा हेतू केव्हाच लोप पावला असून आता परीक्षेचा संबंध कॉपी, पेपरफुटी, बनावट नावाने दिली जाणारी परीक्षा, भरारी पथकाकडून होणार्‍या कारवाया, तणावापोटी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, त्यांच्यातील वाढती अंधश्रद्धा आदी नकारात्मक बातम्यांनी वास्तवाशी जोडला जातो. त्यामुळे पहिली-दुसरीपासून पदवी वा पदव्युत्तर परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्‍या या दिवसांमध्ये जाणवणारा ताण केवळ एखाद्या-दुसर्‍या घरात नव्हे तर संपूर्ण समाजात जाणवतो.
 
 
Examination time : शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न गंभीर असला, तरी प्रत्येकाला व्यक्तिगत पातळीवर जाणवणारे नैराश्य आणि हतबलता खरी की अभ्यासात्मक त्रुटी महत्त्वाच्या हा विचार व्हायला हवा. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नियोजनाला वादातीत महत्त्व आहे, हे प्रथमत: पालकांनी समजून घ्यायला हवे. परीक्षा (विशेषत: वार्षिक) अगदी तोंडावर आल्या की, सैरभैर होण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीपासून सोयीनुसार अभ्यासाचे वेळापत्रक आखले तर निम्मा ताण कमी होईल; मात्र त्यासाठी ‘सोयीनुसार’ या शब्दाचा अर्थ उमगणे जरुरीचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुद्धीची प्रतवारी वेगळी असते. आपल्या पाल्यांच्या क्षमता जाणून अधिकाधिक वापर करून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थात आता आपण शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे वर्षभर काय करायला हवे, हे महत्त्वाचे असूनही या क्षणी तात्पुरत्या उपायांबद्दल बोलले पाहिजे.
 
 
Examination time : अगदी थोडा कालावधी हातात उरल्याने या टप्प्यामध्ये ‘हे करू की ते’ अशी सैरभैर मनोवृत्ती अधिक प्रमाणात दिसते. अर्थात गोंधळलेल्या मन:स्थितीत हे किंवा ते काहीही केले तरी निष्पन्न नकारात्मक असण्याची शक्यता अधिक. तेव्हा तातडीची उपाययोजना म्हणून हातात असलेल्या दिवसांसाठी नवे वेळापत्रक आखायला हवे. प्रथमत: चांगले समजलेले, कमी समजलेले आणि अगदी कमी समजलेले विषय यांची प्रतवारी करून त्याप्रमाणे हाती असलेल्या दिवसांचे विषयानुरूप कमी-अधिक प्रमाणात विभाजन करावे. ऐन वेळी समजून घेण्याची प्रक्रिया साधणे कठीण. सबब अभ्यासक्रमातील आतापर्यंत समजलेल्या भागाची उजळणी करणे हितकर ठरते. पाल्याची वर्षभराची तयारी लक्षात घेऊन असे वेळापत्रक तयार करण्यास पालकांनीच मुलांना मदत करावी.
 
 
‘वर्षभर शिकून तुला हे समजले नाही’ यासारख्या नकारात्मक प्रतिक्रिया पालकांनी या शेवटच्या काळात व्यक्त करू नयेत. उलट, समजलेल्या भागाच्या वारंवार उजळणीमुळे गुणांमध्ये निश्चित फरक पडेल, असा विश्वास मुलांमध्ये निर्माण करावा. पालकांचा त्रागा किंवा चिडचीड मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करते. परिणामी पाठ असलेले किंवा सोपे प्रश्नही मुलांना प्रसंगी आठवत नाहीत. ते न आठवल्यामुळे मुलांचा अधिक गोंधळ होऊन एकूण गोळा-बेरीज खालच्या टप्प्याकडे प्रवास करते. अगदी वर्षभर व्यवस्थित अभ्यास करूनही विद्यार्थ्यांना वेळेवर काही न आठवण्याची उदाहरणेही आहेत. प्रचंड तणाव किंवा दडपण हे त्यामागचे कारण आहे. Examination time विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटतच असते. त्यात भर न टाकता पालकांनी होकारार्थी विधानांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. अर्थात पालकांचे बोलणे अगदीच वरवरचे न वाटता वस्तुस्थितीचे भानही असायला हवे. विशेषत: दहावी-बारावीच्या परीक्षेच्या अलीकडच्या काळात ‘तुला शक्य होते ते प्रयत्न तू केले आहेत, त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही’, हे मुलांना वारंवार सांगितले पाहिजे. त्याचबरोबर गुणांबद्दल अवाजवी अपेक्षा व्यक्त करण्याचे टाळून बोलता बोलता केवळ या परीक्षेतील गुण हे जीवनासाठी अंतिम सत्य नाही, हेही समजावले पाहिजे. दुर्दैवाने गुण कमी पडले तरी पुन्हा प्रयत्न करून समस्येवर मात करता येईल, हा विचार पाल्याच्या मनात रुजवता आला तर पाल्याला पेपरनंतर वेगळ्या समुपदेशनाची गरज भासणार नाही.
 
 
पालकांनी पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काहीच नाही. अपेक्षांचे मागणीत रूपांतर होते तेव्हा खरा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे पालकांनी ‘तू अमूक इतके गुण मिळवलेच पाहिजेत’ यासारखी वाक्ये टाळावीत. कोणत्याही वाक्याला ‘च’ लावणे पालकांच्या अट्टहासी भूमिकेचे द्योतक असते. पालकांच्या मागण्यांचे दडपण असह्य झाल्यास पाल्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी त्यांच्या अपेक्षा नोंदवताना ‘च’ आवर्जून टाळावा. पाल्याकडून ठेवल्या जात असलेल्या अपेक्षा तर्कसंगत असतील याचे भान पालकांनी राखावे. पाल्याची आजवरची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन ठरवलेले ध्येय साध्य करणे पाल्याला जड जाणार नाही.
 
 
हल्ली शालेय स्तरावरील स्पर्धेत पाल्याचा नंबर चुकून मागे-पुढे झाला (किंवा अपेक्षित नंबर मिळाला नाही) तर पालक मुलांसमोर शिक्षकांशी वाद घालतात किंवा ताशेरे ओढतात. त्यामुळे ‘आपण कमी पडलो’ अशी अपराधी भावना मुलांना कुरतडू लागते. अशा वेळी भविष्यात अधिक तयारी करून पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, हा विचार मुलांच्या मनात रुजतच नाही. केवळ याच कारणांमुळे गुण कमी पडले तर आत्महत्या करण्याचे आततायी पाऊल मुले उचलतात. हे टाळायचे असले तर परीक्षा प्रातिनिधिक असतात, एखाद्या परीक्षेच्या निकालाने जीवनावर कायमस्वरूपी मोहर उमटणार नाही आणि संपूर्ण जीवनाच्या पृष्ठभूमीवर चुकून वाया गेलेले एखादे वर्ष नगण्य ठरते, हे पालकांनी स्वत:ला आणि नंतर आपल्या मुलांना पटवायला हवे. पालकांच्या या सहेतूक मोकळ्या वागण्यामुळे मुले स्थिरावतील आणि शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जातील. अशा पद्धतीने मुले या काळाला सामोरी गेली तर यश त्यांचेच असेल.