युरोपियन सोरोसी प्रवृत्ती

    दिनांक :12-Mar-2023
Total Views |
- डॉ. विवेक राजे
मूळ हंगेरियन असलेल्या आणि हंगेरीने कायद्याने कारवाई करून देशाबाहेर काढलेल्या Sorosian tendency जॉर्ज सोरोस या अमेरिकन अब्जाधीश उद्यागपतीने पुन्हा एकदा भारत आणि त्याचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावाने शिमगा केला. खरं तर या देशातील लोकशाही व्यवस्था आणि त्याद्वारे निवडून आलेले नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार जागतिक पातळीवर अनेकांच्या नजरेत अनेक कारणांमुळे सलते आहे. मग या देशात एखादा देशहिताचा कायदा जरी पारित झाला तरी अशा काही व्यक्ती आणि देश यांचा पोटशूळ उठतो. मग आपल्याकडील समस्त संसाधने वापरून अशा निर्णयांना विरोध केला जातो. या देशातील काही आंदोलनजीवी लोकांना हाताशी धरून या देशात अस्थैर्य माजवण्याचा प्रयत्न करणे, एखादा तथाकथित अहवाल प्रसिद्ध करणे, खलिस्तानसारख्या संपून गेलेल्या हिंसक आंदोलनात नव्याने हवा भरणे, राजधानीत अकारण शेतकरी आंदोलन, शाहीनबाग अशी आडमुठी आणि कोणत्याही क्षणी हिंसक होतील अशी आंदोलने इत्यादी बाबी घडवून आणल्या जातात. जागतिकीकरणाच्या आधीदेखील देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेप केला जातच होता.
 
 
hand
 
जागतिकीकरण प्रक्रिया स्थिरावल्यानंतर आता असे हस्तक्षेप अधिक सहजतेने करणे शक्य आहे. याला सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जगातील सर्वात मोठी बाजारपेठ या देशात उपलब्ध आहे. या बाजारपेठेतून प्रत्येक उद्योगपतीला आणि विशेषतः ख्रिश्चन देशाला आपला हिस्सा हवा असतो. Sorosian tendency आजही युरोपियन-अमेरिकन ख्रिश्चन समाज आपल्याला, जगावर या ना त्या प्रकारे हुकूमत गाजवण्याचा अधिकार आहे, ही मानसिकता जोपासताना दिसतात. या विचारांची किंवा मानसिकतेची सुरुवात 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली, असे म्हणावे लागते. यातूनच पुढे इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी सगळ्या जगाला गुलामगिरीच्या खाईत लोटले. या गुलाम देशांमध्ये दोन महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी या युरोपियन ख्रिश्चन देशांनी अनन्वित अत्याचार केले. एक म्हणजे ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि दुसरे म्हणजे व्यापार. ख्रिश्चनांनी या देशात धर्म प्रसारासाठी अनन्वित अत्याचार केले. या अत्याचाराविषयी ज्यांना माहिती करून घ्यायची असेल त्यांनी अनंत पिरोळकर लिखित ‘गोवा इनक्विझेशन’ हे पुस्तक जरूर वाचावे.
 
 
Sorosian tendency ; इ. स. 1810 नंतर निरंकुश झालेल्या इंग्रजी सत्तेने या देशातील सर्व उद्योग उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केली आहे. 15 व्या शतकात जगाच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या या देशाला अवघ्या दीडशे वर्षांत उद्योगहीन, शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याची अभूतपूर्व कामगिरी इंग्रजी सत्तेने केलेली आहे. येथील जहाजबांधणी, पोलादनिर्मिती, वस्त्र उद्योगच नव्हे तर अत्यंत प्रगत, प्रगल्भ व स्वायत्त अशी गुरुकुल शिक्षण व्यवस्था इंग्रजी राजवटीने संपवून टाकली. याविषयी अधिक माहितीसाठी अभ्यासू मंडळी, शशी थरूर यांचे ‘इरा ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक वाचू शकतात. त्या विषयाचे विविध पुरावे आणि आकडेवारीसहित विस्तृत विवेचन या पुस्तकांत थरूर यांनी केले आहे. जे भारतात इंग्रजांनी केले, तेच इतरत्र जन्माने स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि धर्माने ख्रिश्चन असलेल्या लोकांनी केले. आमच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले. सत्ताधारी म्हणजे युरोपियन ख्रिश्चनांना सोईस्कर होईल, असे बदल त्यात करण्यात आले. स्वायत व स्वतंत्र असलेली आमची गुरुकुल पद्धती नियोजनबद्धरीतीने संपवण्यात आली. या मेकॉले प्रणित शिक्षण पद्धतीने आमची स्वतंत्रपणे विचार करण्याची, वेगळ्या वाटा चोखाळण्याची क्षमताच हिरावून घेतली. त्यातही सत्ताधार्‍यांनी फक्त इंग्रजाळलेल्या किंवा वसाहतीची मानसिकता असलेल्या लोकांनाच सरकारी सेवेत आणि त्यातही अधिकारांच्या पदावर नेमणुकी देऊन, भारतीय पद्धतीने स्वतंत्रपणे विचार करणार्‍यांचे संपूर्ण खच्चीकरण केले.
 
 
भारतीय लोकांमध्ये एक अपूर्णतेची, आपण कमजोर असल्याची भावना, मनोवृत्ती निर्माण केली गेली. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये जे इंग्लंडमध्ये शिकलेले नव्हते, अशा न्यायमूर्तींच्या मनात एक अपूर्णतेची, न्यूनगंडाची भावना होती; जी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या न्यायमूर्तींमध्ये आढळली नाही, असे मत न्यायमूर्ती हिदायत उल्ला यांनी नोंदविल्याचा उल्लेख आहे. (संदर्भ : सुप्रीम व्हिस्पर, लेखक : अभिनव चंद्रचूड, पान नंबर 39). जिथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये ही अपूर्णतेची, न्यूनगंडाची भावना असेल, त्या देशातील सामान्य नागरिकांचे काय? त्यांच्यामध्ये हा कॉम्प्लेक्स किती प्रचंड प्रमाणात असेल, याची नुसती कल्पनादेखील करता येत नाही. ही मानसिकता निर्माण करून वरून सगळ्या व्यवस्था मात्र Sorosian tendency युरोपियन संकल्पनांवर आधारित स्थापल्या गेल्या; नव्हे त्या तशा असाव्यात म्हणून आमच्या व्यवस्था बदनाम केल्या गेल्या. छोट्याशा घटनांचे अवडंबर करण्यात आले. (उदाहरणार्थ ‘घाशीराम कोतवाल’ नाटक). इतिहासातील अनेक कर्तृत्ववान माणसे बदनाम करण्यात आली. घाशीराम कोतवालसारख्या नाटकाने नाना फडणवीसांचे सगळे कार्य, त्यांचे कर्तृत्व झाकोळून टाकलेे. ‘राऊ’, ‘स्वामी’ यांसारख्या कादंबर्‍यांनी पेशव्यांचे कर्तृत्व नाकारण्याचेच काम जास्त झाले. कारण इतिहासाचा अभ्यास करण्याऐवजी सामान्य भारतीय कल्पनारम्य कादंबर्‍यांमध्ये जास्त रमतो. जे सहज उपलब्ध आहे त्यावर जास्त विश्वास ठेवतो. याच दृष्टीने आमचा इतिहास लिहिण्यात आला. तो चुकीचा इतिहास शिकवण्यात आला.
 
 
वसाहती गुलामगिरीची मानसिकता जोपासून, सर्वच निकष किंवा आर्थिक वा सामाजिक फूटपट्ट्या ज्या Sorosian tendency युरोपियन देशातील अभ्यासकांनी त्यांच्या सोयीनुसार तयार केलेल्या असतात, इथल्या व्यवस्थेला, परिस्थितीला लावण्यात येतात. हे निकष निश्चित करताना विकसनशील राष्ट्रांचा, तेथील परिस्थितीचा, लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला नसतो. तरीही, ते निकष आपल्या देशातील परिस्थितीचा विचार न करता जसेच्या तसे लावण्यात येतात. त्यामुळे आमच्या देशातील एकही विद्यापीठ, आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्था जगातील पहिल्या 100 संस्था वा विद्यापीठात येत नाहीत. इंडीयन सीए इन्स्टिट्यूटने तयार केलेले ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवाल मानके’ ही जागतिक पातळीवर अत्यंत उच्च दर्जाची मानली जातात. त्याच वेळी जगातील सगळ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या उद्योगांमध्ये भारतीय व्यक्ती महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसतात; त्यांना तयार करणार्‍या संस्था मात्र अव्वल स्थानावर नसतात. पण, आमच्या देशातील विद्वान अभ्यासक, पाश्चात्त्य विद्वान व संस्थांच्या ओंजळीने पाणी पिण्यात धन्यता मानणारे असल्याने अशा अहवालांना, निकषांना नाकारत नाहीत. जेव्हा पाश्चात्त्य देशांचे सकल उत्पन्न चांगले होते तेव्हा ते ‘जीडीपी’बद्दल बोलत होते. त्यानंतर त्यांनी अचानक ‘एचआरडी इंडेक्स’ काढला. आमच्या देशातील हवामान आणि आहाराच्या सवयींचा विचार न करता ‘हंगर इंडेक्स’ आला. या बाबतीत हास्यास्पद बाब अशी की, जगभरात हातात भिकेचा कटोरा घेऊन मदत मागत फिरणार्‍या पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या देशांची कामगिरी भारतापेक्षा याबाबतीत सरस दिसते.
 
 
या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण करून वसाहतीची मानसिकता आपल्यात रुजवण्यासाठीच केले जाते. दुर्दैवाने आमच्या देशातील काही विद्वान, प्रचार माध्यमे या पाश्चात्त्य कारस्थानांना साथ देताना दिसतात. आंतरराष्ट्रीय संबंध अबाधित ठेवून अशा निकषांना, अहवालांना, तालिकांना, सिद्धांताना ठोसपणे नाकारणे, जे भूतानसारखा देश ‘हॅपिनेस इंडेक्स’द्वारे करू शकतो, तेच आपल्यालाही करावे लागेल.
 
- 9881242224