शिवपूर,
कुनो राष्ट्रीय प्रकल्पात चित्ते सोडल्यानंतर शिवपूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत, असे प्रतिपादन (Shivraj Singh Chauhan) मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. येथे 768 कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणार्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी आणि इतर विकास कामांच्या रविवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याने शिवपूर येथे चित्ते आले. त्यामुळे शिवपुरात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था घरातच करण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे, असे (Shivraj Singh Chauhan) चौहान यांनी सांगितले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नामिबियातून आणलेल्या आठपैकी दोन चित्त्यांना कुनो राष्ट्रीय प्रकल्पात शनिवारी सोडण्यात आले. नामिबियातून आल्यावर जवळपास सहा महिन्यांनंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले. या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून सात नर आणि पाच मादी असे एकूण 12 चित्ते आणले असून, चित्त्यांची एकूण संख्या 20 झाली आहे.
इमारत उभारणीनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यावर शिवपूरमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता भासणार नाही आणि येथील रहिवाशांना जवळच्या शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे तोमर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ग्वाल्हेर-शिवपूर दरम्यान ब्रॉडगेज लाईन टाकली जात आहे आणि दुसर्या टप्प्यात ती कोटापर्यंत वाढवली जाईल. त्यामुळे मध्यप्रदेशचा विकास होईल, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.