सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनाचा अन्वयार्थ

    दिनांक :13-Mar-2023
Total Views |
वेध
 
अभिजित लिखिते
 
 
श्रीकृष्णाचा कर्मसिद्धांत हा कालातीत आहे. काळ बदलला, तरी हा (Silicon Valley Bank) सिद्धांत प्रत्येक ठिकाणी अत्यंत चपखलपणे लागू होतो. दुसर्‍यांप्रती केलेले चांगले काम हे सकारात्मक कर्म आहे. काही लोक जाणीवपूर्वक दुसर्‍यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच या खड्ड्यात पडतात. जर तुमचे कर्म नकारात्मक, अनैतिक किंवा विनाशकारी असेल तर, ते तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. हा कर्मसिद्धांत सांगण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेचे पतन. 21 अब्ज डॉलर्सच्या रोखेविक‘ीतून 1.8 अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्याचे या बँकेने जाहीर केल्यानंतर अमेरिकेतील नियामकांनी सरळ या बँकेला कुलूप ठोकले. बरेच शोधकाम, खोदकाम केल्याचा आव आणून अमेरिकेतील शॉर्टसेलर हिंडेनबर्गने अदानी समूहाच्या विरोधात अहवाल प्रसिद्ध केला. आश्चर्य म्हणजे या हिंडेनबर्गला स्वतःच्या देशातील सिलिकॉन व्हॅली बँकेची भानगड दिसली नाही, पण दूरवरचा अदानी दिसला. त्यासोबतच अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालाची तळी उचलणारा अमेरिकी गुंतवणूकदार बिल अ‍ॅकमनला या (Silicon Valley Bank) बँकेला बेलआऊट पॅकेज द्या, अशी मागणी अमेरिकी सरकारकडे करावी लागली. हिंडेनबर्ग अहवाल, त्याचे समर्थन करणारा बिल अ‍ॅकमन तसेच जॉर्ज सोरोस यांचा हेतू भारतीय अर्थव्यवस्थेला हानी पोहोचविण्याचा होता, हेच म्हणावे लागेल. या धनाढ्यांचा हेतू प्रामाणिक असता, तर स्वतःचे घर जळत असताना दुसरीकडे आग लावायचे धंदे केले नसते.
 
Silicon Valley Bank
 
सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) कोसळण्यामागे अनेक कारणे आहेत. रोखे विक्रीतील तोटा हे त्याच्या पतनाचे कारण ठरले. आपल्यात भांडवल उभारण्याची क्षमता नाही तसेच आपल्याकडे पैसेही नसल्याचे स्पष्ट करीत या बँकेने हात वर केल्यानंतर नियंत्रकांनी कारवाई केली. त्यापूर्वी गुरुवारी या बँकेचे शेअर्स 60 टक्क्यांनी कोसळले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात ‘सिलिकॉन’च्या शेअर्सचे पानिपत होण्यापूर्वीच या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेगरी बेकर आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी थोडेथोडके नव्हे, तर 45 लाख डॉलर्सचे शेअर्स विकून टाकले होते. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून झालेली शेअर्सची विक्री म्हणजे हा एक मोठा घोटाळा असू शकतो आणि तो घडण्यापूर्वी कोणालाही बँक बुडेल याचा मागमूस लागला नाही, अशी कुजबूज आता अमेरिकेत सुरू आहे. भारतातील अदानी समूहावर अहवाल प्रकाशित करणार्‍या हिंडेनबर्गला आपल्याच देशातील बँकिंग क्षेत्रात काय सुरू आहे, याची माहिती नव्हती, अशी टीका केली जात आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेने आपले 95 टक्के बाजार भांडवल गमावल्यानंतर नियंत्रकाला कारवाई करावी लागली. यात गुंतवणूकदारांचे 110 अब्ज डॉलर्स पाण्यात गेले आहेत. इतकी मोठी हानी होईपर्यंत अमेरिकी यंत्रणांना कोणताही सुगावा लागला नव्हता. (Silicon Valley Bank) बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विपणन अधिकार्‍यांनी मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत 45 लाख डॉलर्सचे शेअर्स विकले आणि त्याची माहिती अमेरिकेसार‘या अतिप्रगत देशात कुणालाही मिळू शकली नाही, हेच मुळात मोठे आश्चर्य आहे.
 
 
अदानी समूहावर उच्चरवात टीका करणारा गुंतवणूकदार बिल अ‍ॅकमन आता (Silicon Valley Bank) सिलिकॉन व्हॅली बँकेला बेलआऊट पॅकेज देण्याची मागणी करीत आहे. उपक्रम समर्थित कंपन्यांना भांडवली पैसा खेळता ठेवण्यासाठी बँकांवर अवलंबून राहावे लागते आणि सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनामुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकाळासाठी वेग देणारी शक्ती नष्ट होऊ शकते. त्यामुळे या बँकेला बेलआऊट पॅकेज द्यावे, अशी मागणी अ‍ॅकमनने केली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक स्वतःस पतनासाठी जबाबदार आहे. 1.8 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करून या बँकेने रोखे विकण्याचा निर्णय घेतला. यातील काही रोखे केवळ 1.79 टक्क्यांचा परतावा देत होते. व्याजदरात वाढ होत असताना इतर बँकांच्या तुलनेत ‘सिलिकॉन’ची कामगिरी ढासळल्याचे दिसून आले होते. मूडीजने या बँकेचे रेटिंग कमी करण्याचा निर्णयही घेतला होता. बँकेने सावरण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य झाले नाही. या (Silicon Valley Bank) बँकेच्या पतनामुळे अमेरिकेच्या तांत्रिक क्षेत्रातील अस्वस्थता वाढली आहे तसेच याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात पडेल.
 
- 9028055141