कालभैरव मंदिरात मुख्यमंत्री योगी पूजा करताना वीज खंडित

    दिनांक :18-Mar-2023
Total Views |
वाराणसी, 
उत्तरप्रदेशचे CM Yogi मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाराणसी दौर्‍यावर असून, या दौर्‍यात ते येथील कालभैरव मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचले. मात्र, मंदिरात प्रवेश करून गर्भगृहात पूजा करीत असतानाच वीजपुरवठा खंडित झाला. उत्तर प्रदेशमध्ये वीज कर्मचार्‍यांचा संप सुरूच आहे. वाराणसीमध्ये पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या कामगारांनी कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. या संपाचा परिणाम मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या दौर्‍यावरही दिसून आला. ते वाराणसीच्या कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले व पूजा करीत असतानाच मंदिरातील वीजपुरवठा खंडित झाला.
 
 
KAL-BHAIRAV-MANDIR-YOGI
 
CM Yogi  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सकाळी 9.15 वाजता दर्शनासाठी मंदिरात पोहोचले होते. त्यादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. मुख्यमंत्र्यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर काही वेळातच वीज आली, असे मंदिराचे प्रशासक व पुजारी सदनलाल दुबे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील तांत्रिक वीज कामगारांचा 72 तासांचा संप गुरुवारी रात्री 10 वाजतापासून सुरू झाला. या संपाला पाठिंबा देत देशभरातील 27 लाख वीज कामगार रस्त्यावर उतरले. शांततापूर्ण आंदोलनादरम्यान वीज कर्मचार्‍यांना अटक केल्यास बेमुदत संपासह जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याचदरम्यान योगी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कामात अडथळा, कर्मचार्‍यांशी गैरवर्तन, सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्यास एनएसए व रासुकाच्या तरतुदींनुसारही कारवाई केली जाईल, असा इशारा ऊर्जामंत्री ए. के. शर्मा यांनी दिला आहे.