तभा वृत्तसेवा
अमरावती,
Strike Continue : बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार शनिवारच्या मुंबई येथील बैठकीत कर्मचारी संघटनांच्या सुकाणू समितीने घेतला असल्याची माहिती स्थानिक शिक्षक समितीकडून देण्यात आली आहे. दरम्यान संपाच्या पाचव्या दिवशीही कर्मचार्यांनी अमरावती जि. प. मुख्यालयासमोर निदर्शने केली.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जुन्या पेन्शन योजनेऐवजी केंद्राप्रमाणे ‘एनपीएस’ मध्ये असणार्या मृत कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान लागू करण्याची घोषणा विधिमंडळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. मुळात सदर घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या वेळीच शासनाने केली होती. त्यापूर्वी 2018 मध्ये मागे घेतलेल्या संपाच्या वेळी राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे म्हटले होते. आता सुरू असलेला बेमुदत संप हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी असल्याने आणि राज्यशासन याबाबत निर्णायक अशी भूमिका घेत नसल्यामुळे राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या सुकाणू समितीने शनिवारी ठाकरसी भवन, मुंबई येथे विश्वास काटकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बेमुदत संप कायम ठेवण्याचा (Strike Continue) निर्णय घेतला आहे.
शनिवार, 18 मार्च रोजी संपाच्या पाचव्या दिवशी राज्यातील सर्व संवर्गीय कर्मचारी, शिक्षक यांनी संपाला दिलेला सहभाग पाहता संपकरी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दिसत आहे. संपकरी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संपामध्ये कायम राहण्याच्या भूमिकेबाबत सुकाणू समितीने आभार मानले आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना स्वीकृत होत नाही, तोपर्यंत संप सुरूच (Strike Continue) राहील अशी घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक तथा सुकाणू समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी केली आहे.