तभा वृत्तसेवा
अमरावती,
Shree Anna : आधुनिकीकरणाच्या आजच्या युगात खानपाणाच्या पद्धतीत बदल होत गेल्याने भरडधान्याचा आहारातील उपयोग कमी झाला. त्यामुळेच मानवी जीवनात आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊन रोगाचे प्रमाणही वाढले. आज जग याचाच विचार करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करीत आहे. मानवाला आवश्यक असलेले जीवनसत्व आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात भरडधान्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हणून सन्मानित केले आहे. आता शेतकर्यांनी भरडधान्य अर्थात श्री अन्नाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिह यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे आयोजित भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय भरडधान्य (श्री अन्न) (Shree Anna) परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी होण्यासाठी शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ प्रताप जायले, कार्यालय अधीक्षक संतोष देशमुख, डॉ. हर्षद ठाकूर, आकाश धरमकर, आरती येवतीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सिंह म्हणाले, आता जगभरात भरड धान्याला श्री अन्न म्हणून गौरविले जात आहे. या बाबी भविष्यात भरडधान्य उत्पादन आणि वापराला महत्त्व प्राप्त करून देणार्या असल्याने भरड धान्य (श्री अन्न) हे पर्यावरणास पूरक असून, निसर्गाच्या संतुलनासाठी ते अधिक उपयुक्त आहे. आपल्याकडील साधारण जमीन धारणकरीत असलेल्या अल्पभूधारक शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कमी पाण्यात आणि कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न देणारे हे पीक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या येथील आंतरराष्ट्रीय भरडधान्य (श्री अन्न) (Shree Anna) परिषदेचे आभासी पद्धतीने प्रसारण यावेळी झाले. डॉ. हर्षद ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील तरुण, तरुणी, शेतकरी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल महल्ले, डॉ. सचिन मुंढे, कैलाश शेखावत, संजय घरडे, डॉ. विशाखा पोहरे, सुरेश वैद्य, ज्ञानेश्वर जिराफे, विनायक जिराफे, अविनाश राऊत, उमेश रंगे, वैभव मंडपे, प्रणाली देशमुख, वैभव सहारे, सुनील तिडके, ऋषिकेश शिंदे, शुभम रेवस्कर, सिद्धार्थ गडलिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.