चीन, पाकिस्तानने चिथावणी दिल्यास भारताची लष्करी कारवाई शक्य

अमेरिकन गुप्तचर अहवाल

    दिनांक :19-Mar-2023
Total Views |
राष्ट्ररक्षा
चीन, पाकिस्तानने चिथावणी दिल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात India military भारत लष्करी कारवाई करू शकतो, असा अंदाज अमेरिकन गुप्तचर अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकन इंटेलिजन्स कम्युनिटीचा अ‍ॅन्युअल थ्रेट असेसमेंट रिपोर्ट दोन प्रकारे पाहिला पाहिजे. त्यात म्हटले आहे की, चीन किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही वास्तविक किंवा संशयित हालचालीला भारताकडून लष्करी कारवाईने प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आजचा भारत सामरिक सामर्थ्यात चांगला आहे, हे खरे आहे. ही संघटना गेली अनेक वर्षे असे अहवाल देत आहे. यावर्षी अहवालात चीनवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या संदर्भात भारताचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच पाकिस्तान व त्याच्या भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांवर चर्चा करण्यात आली आहे.
 
 
indian-soldier
कारगिल युद्धात, गलवान खोर्‍यात, बालाकोटमध्ये आपला विजय
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रांनी सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसी दिनानिमित्त केलेल्या भाषणात पाकिस्तानला सात दिवसांत हरवता येईल, असे म्हटले होते. युद्धाचा निकाल सात दिवसांत लावता येईल का? होय; हे शक्य आहे. भारताने 1971 चे युद्ध 13 दिवसांत जिंकले होते. 3 डिसेंबर 1971 रोजी युद्ध सुरू झाले आणि 16 डिसेंबर 1971 रोजी ढाक्यात शरणागती पत्करून पाकिस्तानने आत्मसमर्पण केले. अलीकडेच गलवान खोर्‍यात चिनी लष्कराशी झालेल्या चकमक आणि पाकिस्तानच्या बालाकोटवरील हवाई हल्ल्यानंतर भारताने हे पाहिले आहे. गलवान खोर्‍यात चीन आणि India military भारताच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. प्रसारमाध्यमांनी दुसर्‍या बाजूचे अधिक नुकसान झाल्याचा दावा केला. बालाकोटमधील हवाई हल्ल्याला भारत आपला विजय मानतो. कारगिल युद्धात भारत सरकारची धोरणात्मक समज अधिक चांगली होती. या युद्धात पाकिस्तानने नियंत्रण रेषा ओलांडली. नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी सैन्याला मागे हटवताच भारत सरकारने विजयाची घोषणा केली. कारगिल युद्धातील भारताचा विजय हा केवळ सामरिक नव्हे तर धोरणात्मक विजय मानला जातो. भारताकडे अधिक लष्करी सामर्थ्य आहे. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत केवळ संख्येत पाकिस्तानपेक्षा पुढे नाही तर तो अधिक आधुनिकही आहे. भारताकडे आण्विक पाणबुडीसह अनेक आधुनिक शस्त्रे आहेत. आयएनएस अरिहंतमुळे भारत अण्वस्त्र पाणबुडीची ताकद असलेल्या निवडक देशांमध्ये सामील झाला आहे. भारताने 2016 मध्ये आयएनएस अरिहंत पाणबुडी कमिशन केली. 2018 पासून ही पाणबुडीदेखील कार्यान्वित करण्यात आली. ही पाणबुडी आण्विक क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. याशिवाय युद्ध झाल्यास इलेक्ट्रॉनिक युद्धासह अनेक आघाड्यांवर भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक आधुनिक तंत्रज्ञान आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, पाकिस्तानच्या आण्विक साठ्यामध्ये 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत, तर भारताकडे 110-120 अण्वस्त्रे आहेत. भारत प्रथम हल्ला न करण्याचे धोरण अवलंबतो. पण पाकिस्तानने प्रथम अण्वस्त्र हल्ला केला, तरी भारताने अरिहंत पाणबुडीद्वारे दुसर्‍या हल्ल्याची क्षमता कायम ठेवली आहे. म्हणजेच अण्वस्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे. पण पाकिस्तानकडे अजूनही क्षमता नाही.
 
पाकिस्तानी सैन्याची युद्ध करण्याची क्षमता नाही, तरी दहशतवाद सुरूच
आर्थिक आघाडीवर पाकिस्तान सर्वात कमकुवत आहे. पाकिस्तानचे परकीय कर्ज आता 11 हजार कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे. सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीत भारताचा प्रभाव अधिक आहे. राफेल बनवणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट असो वा अमेरिकन कंपनी बोईंग हे सर्व भारताकडून मोठ्या ऑर्डरवर अवलंबून आहेत. जर भारताने हा प्रभाव पाकिस्तानच्या विरोधात वापरला तर तो त्या बाजारपेठेतील परिस्थिती बदलू शकतो; जिथे एक तर पाकिस्तान आपली उत्पादने विकतो किंवा उत्पादने खरेदी करतो. याशिवाय 50 टक्क्यांहून जास्त पाकिस्तानी सैन्य हे दहशतवादीविरोधी अभियानामध्ये पाकिस्तानच्या आत कारवाई करीत आहे. 20 ते 25 टक्के सैन्य अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेचे रक्षण करण्यामध्ये गुंतले आहे. कारण तेथून मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले तेहरे-के-तालिबान पाकिस्तान हा दहशतवादी गट पाकिस्तानवर करीत आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्याची युद्ध करण्याची क्षमता अजिबात नाही. परंतु, असे असले तरी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, दहशतवादी कृत्य सुरूच आहेत.
पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद सुरू
India military : थोड्या प्रमाणामध्ये पाकिस्तान काश्मीर खोर्‍यामध्ये काश्मिरी पंडित किंवा भारतातील इतर नागरिकांना लक्ष्य करीत असतो. परंतु पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात पंजाबमध्ये दहशतवाद सुरू केला आहे. यामध्ये ड्रोन्सच्या मदतीने ते अफू, गांजा, चरस, शस्त्रे आणि स्फोटक पदार्थ पंजाबमध्ये पाठवत आहेत. सरकारी आकड्याप्रमाणे 2022 मध्ये 252 ड्रोन्स पंजाबच्या वेगवेगळ्या भागात खास तर तरणतारण, अमृतसर, फिरोजपूर, फाझिलका, बटाला गुरुदासपूर आणि पठाणकोट या भागात आले होते. 2023 मध्ये यांचा आकडा आतापर्यंत 25 पर्यंत पोहोचलेला आहे. ही ड्रोन्स थांबवणे बॉर्डर सेक्युरिटी फोर्सला शक्य झालेले नाही. यामुळे पंजाबमध्ये हिंसाचार, उग्रवाद, अफू, गांजा, चरसचा दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाकिस्तानच्या या दुष्कृत्याला नेमके कसे उत्तर द्यायचे? हे 2023 मधले आपले सर्वात महत्त्वाचे आव्हान असेल. संशयास्पद ड्रोन्सना लगाम घालण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्कायवॉल 100 यांसारखे तंत्रज्ञान जगात आहे. ही सगळी महागडी शस्त्रे आहेत. भारतालाच काय; पण इतर विकसित देशांनासुद्धा परवडण्यासारखी नाहीत, असे महागडे पर्याय काही महत्त्वाच्या ठिकाणीच वापरले जाऊ शकतात. म्हणूनच येणार्‍या काळात ड्रोनविरोधात आपल्याला स्वस्त शस्त्रे आणि तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, तोपर्यंत आपल्याकडे असलेली संरक्षण व्यवस्थाच वापरावी लागेल.
पाकिस्तानमध्ये ड्रोन ऑपरेशन्स
आपणसुद्धा पाकिस्तानमध्ये ड्रोन ऑपरेशन्स करू शकतो. आपल्याला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल की, ड्रोन भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही ड्रोन पाठवून तुमचे नुकसान करू. स्वसंरक्षण करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे. ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. भारताकडून होणार्‍या ड्रोन हल्ल्यापासून पाकिस्तानला संरक्षण करण्यास भाग पाडावे, तरच त्यांना याची किंमत कळू शकते. आक्रमक कारवाया, कमी खर्चिक उपाययोजना, अतिशय कल्पकतेने ड्रोन दहशतवादाविरोधात भारताला वापरावे लागतील. आपण पाकिस्तानमध्ये असलेले राजकीय पक्ष किंवा पाकिस्तानातील, सिंध, बलुचिस्तान किंवा वजिरिस्तानमधील वेगवेगळ्या मानवाधिकार संस्थांशी मिलाफ करून, त्यांना मदत करू शकतो. उग्रवाद, अफू, गांजा, चरसचा दहशतवाद संपवण्याकरिता नेमके काय करायला पाहिजे याची पंजाब पोलिस आणि सरकारला कल्पना आहे. मात्र, गरज आहे ते करण्यासाठी तीव्र राजकीय इच्छाशक्तीची. आता पंजाब पोलिसांनीसुद्धा सीमेवरील भागामध्ये गस्त सुरू केली आहे. 50 टक्के पंजाबी युवक हे नशेच्या आहारी गेलेले आहेत, म्हणून पंजाबचा ड्रगिस्थान होण्याच्या आधी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि पंजाब पोलिसला ड्रोन दहशतवादाचे आव्हान पेलता आले नाही, तर सीमावरती भागात भारतीय सैन्य तैनात करण्याची गरज आहे का? यावर केंद्र सरकारने जरूर विचार करावा.
पाकिस्तानला स्वसंरक्षण करण्यास भाग पाडा
India military : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पूर्वीच्या तुलनेत पाकिस्तानच्या चिथावणीला लष्करी बळाने उत्तर देऊ शकतो, असा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या वार्षिक धोक्याच्या संदर्भातील एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संकट अत्यंत गंभीर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर समुदायाकडून दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध होतो. राष्ट्रीय गुप्तचर संचालनालय कार्यालयाकडून हा अहवाल अमेरिका काँग्रेसला सादर केला जातो. ताज्या अहवालामध्ये भारताला असलेल्या धोक्यांचेही मूल्यमापन करण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानने भारताला कोणत्याही प्रकारे चिथावणी दिली, तर त्याचे उत्तर भारत आगामी काळात देऊ शकतो.
 
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)