भारताचे सनातनत्व

    दिनांक :19-Mar-2023
Total Views |
- डॉ. मनमोहन वैद्य
-  सह सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 
सनातन (eternal) हे भारताचे विशेषण आहे; कारण भारत शाश्वत, अर्थात अनादि आहे आणि अनंतही आहे. याची दोन कारणे आहेत. एक, भारताची विचारसरणी सनातन आहे आणि हा विचार प्रत्यक्ष जगणारा, आचरणाने प्रतिष्ठित करणारा भारतीय समाजही सनातन आहे. भारताचे हे विशिष्ट चिंतन, विचार चिरंतन आहेत. कारण त्याचा आधार आध्यात्मिक आहे, म्हणूनच तो एकात्म आणि सर्वांगीण देखील आहे. त्यामुळे संपूर्ण विश्व, ही सारी सृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे, असे भारत मानतो. एकच चैतन्य विविध स्वरूपात प्रकट झाले आहे. म्हणूनच सृष्टीत संघर्ष नाही, तर समन्वय आहे आणि तो परस्परविरोधी नाही तर परस्पर पूरक आहे, असा भारताचा विश्वास आहे. यासाठी भारताच्या म्हणजेच भारतीय समाजाच्या चार श्रद्धा आहेत.
 
 
kamal
 
पहिली गोष्ट म्हणजे सत्य किंवा ईश्वर एक आहे, त्याला अनेक नावांनी आणि विविध मार्गांनी जाणले जाऊ शकते. दुसरा पैलू म्हणजे विविधतेत एकता पाहणे, ती ओळखणे, त्या विविधतेची अभिव्यक्ती करणे ही भारताची दृष्टी आहे. तिसरा पैलू म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये (स्त्री आणि पुरुष) ईश्वराचा अंश आहे आणि त्याचे प्रकटीकरण करून मोक्ष प्राप्त करणे, हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. चौथा पैलू असा आहे की, हे दिव्यत्व प्रकट करण्याचा मार्ग (ज्याला उपासना किंवा religion म्हटले जाऊ शकते) एखाद्याच्या रुचीनुसार, प्रकृती धर्मानुसार भिन्न असू शकते आणि सर्व उपासना पंथ समान, स्वीकार्य आणि सन्माननीय आहेत. या मार्गांना विविध नावांनी ओळखले जात असेल आणि काळाच्या ओघात नवनवीन उपासना मार्गाची त्यात भरही पडू शकते, सर्वांचे येथे स्वागत आहे. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिकागोच्या व्याख्यानात भारताचे वर्णन (mother of all religions) असे केले आहे. कारण या चिंतनाचा आधार आध्यात्मिक (spirituality) आहे, हे चिंतन सनातन (eternal) चिरंतन आहे.
 
 
आता ते केवळ चिंतनाच्या पातळीवर राहूनही चालणार नाही. या विचारांच्या आधारे जीवन जगत येथील समाजाने प्रदीर्घ परंपरा निर्माण केली आहे. अनेक आक्रमणे, आघात सहन करूनही हा समाज, ज्याला राष्ट्र संबोधले जाते, अखंड जगत आहे. या समाजाचे सातत्यही भारताला शाश्वत, सनातन बनवते. या राष्ट्राच्या सनातनत्वाची, निरंतरतेची दोन मुख्य कारणे आहेत. एक, त्याचा जीवनाकडे पाहण्याचा आधार, दृष्टिकोन आध्यात्मिक आहे आणि दुसरे, हे राष्ट्र राज्यावर आधारित नाही. स्वदेशी समाजावरील आपल्या निबंधात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात की,welfare state ही भारताची परंपरा नाही. न्याय, सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध हे विषय केवळ राजाच्या अधीन होते. बाकी सर्व शिक्षण, आरोग्य, व्यापार, उद्योग, मंदिर, मेळा, कला, संगीत, नाट्य, यात्रा इत्यादी सर्व विषयांसाठी समाजाची स्वतःची अशी स्वतंत्र व्यवस्था असायची. त्यासाठी राज्याच्या अर्थात सरकारी तिजोरीतून निधी येत नव्हता. समाजाची स्वतःची व्यवस्था होती, ज्याचा आधार धर्म होता. हा धर्म म्हणजे उपासना (religion) नाही. समाजाला आपले मानून परतफेड करणे यालाच धर्म म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी म्हटले आहे, ज्या समाजात माणसे आपल्या कष्टांचा मोबदला केवळ स्वत:कडेच न ठेवता समाजाला देतात आणि अशा जमा झालेल्या सामूहिक भांडवलाच्या आधारे समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती संपन्न आणि समृद्ध बनते. हा धर्म भेदभाव (discriminate) करीत नाही. त्या पुढे म्हणतात, ज्या समाजात लोक त्यांच्या परिश्रमांचा मोबदला समाजाला न देता स्वतःकडेच ठेवतात, त्या समाजात काही लोक तर श्रीमंत आणि संपन्न होतात, पण समाज मात्र दरिद्रीच राहतो.
 
 
जर तंबू केवळ एका खांबावरच उभा राहिला आणि खांब तुटला तर संपूर्ण तंबूच जमिनीवर पडतो. पण जर तंबू तीन-चार खांबांवर उभा असेल आणि त्यातील जर एक खांब तुटला तरी तो तंबू जमिनीवर कोसळणार नाही. तो खांब आतून पुन्हा उभारता येऊ शकतो. भारताची रचना, निर्मिती परंपरेने अशीच आहे. म्हणूनच परकीय आक्रमणात राजाचा पराभव होऊन परकीय राजवट स्थापित होऊनही हे राष्ट्र म्हणजेच समाज नेहमीच अपराजित राहिला आणि समाजाला जागृत करून पुन्हा स्वराज्याची स्थापना होत राहिली. ही रचना देखील भारत सनातन, शाश्वत असण्याचे रहस्य आहे.
 
 
या राष्ट्राच्या विशिष्ट अध्यात्म आधारित जीवनदृष्टीला, जीवनमूल्यांना जगामध्ये ‘हिंदू’ या नावाने ओळखले जाते आणि म्हणूनच या राष्ट्राचे नाव हिंदू आणि सनातन हे याचे विशेषण आहे. आम्ही हे नाव दिलेले नाही. कारण आम्ही स्वतःला इतर मानवी समूहांपेक्षा वेगळे समजतच नाही. ‘वसुधैव कुटुंबकम’ हेच आमचे तत्त्वज्ञान आहे. पण बाहेरून आलेल्या लोकांनी आमच्या या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे आमची ओळख बनवली आणि त्याला ‘हिंदू’ (सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे) हे नाव दिले. जसे, पूर्वी 1935-1940 च्या सुमारास नागपुरातील तुपाच्या दुकानांवर आजूबाजूची गावे जसे बोरगाव, दहेगाव किंवा आमगावच्या तुपाची दुकाने असे फलक (board) लावलेले असायचे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ‘डालडा’ नावाची एक वस्तू बाजारात आली, जी तुपासारखी नक्कीच दिसत होती, पण ती तूप नव्हती. त्यानंतर या सर्व दुकानांच्या फलकांवर स्वत:च्या गावांच्या उल्लेखासह ‘शुद्ध तुपाचे’ दुकान असे लिहिलेले दिसू लागले. आता शुद्ध हा शब्द नंतर लिहिला, याचा अर्थ पूर्वीचे तूप अशुद्ध होते असे नाही. पूर्वी फक्त तूप असायचे. पण तुपासारख्या दिसणार्‍या वस्तूपेक्षा भिन्नत्व दर्शविण्यासाठी ‘शुद्ध’ हा शब्द नंतर जोडावा लागला. हीच गोष्ट हिंदूंनाही लागू होते. प्रथमपासूनच सर्वांना ‘आत्मवत सर्वभूतेषु’ मानल्यामुळे आम्ही स्वतःला वेगळे असे नाव दिले नाही. त्याची कधी गरजच भासली नाही.
 
 
काळानुरूप समाजात अनेक परिवर्तनं घडणे स्वाभाविकच आहे. शाश्वत, मूलगामी तत्त्वांचा पाया भक्कम ठेवत, या चिरंतन तत्त्वांच्या प्रकाशात काही जुन्या, कालबाह्य गोष्टींचा त्याग करीत आणि युगानुकूल नवीन गोष्टींचा स्वीकार भारत करीत आला आहे. त्याचप्रमाणे कालांतराने बाहेरून आलेली काही मूल्ये किंवा व्यवस्थाही देशानुकूल बनवून त्याचाही भारताने स्वीकार केला आहे. हे भारताचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्यामुळे भारतीय जीवन चिरप्राचीन, सनातन असण्यासोबतच नित्यनूतनदेखील आहे. शाश्वत सिद्धांतांच्या प्रकाशात नवनवीन गोष्टी स्वीकारणे, समाजाचे आचरण व व्यवहारासाठी मार्गदर्शक अशा विविध स्मृतींची (संहिता) येथे सातत्याने निर्मिती झाली आहे. हीच स्मृती अंतिम आहे आणि यापुढे स्मृतीची कोणतीही नवीन रचना होऊ शकत नाही, असे भारताने कधीच म्हटले नाही. आजच्या आधुनिक काळातील भारतासाठी, अद्ययावत स्मृती म्हणजे आमचे संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेत आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची तरतूदही घटनेतच आहे. जुन्या पायाच्या आधारावर काळानुरूप नवे निर्माण केल्यामुळे भारताचे जनजीवन नित्यनूतन आणि चिरप्राचीन राहिले आहे आणि म्हणूनच ते सनातन आहे.
भारताची आणखी एक बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती म्हणजे भारताने भौतिक समृद्धी (अभ्युदय) आणि आध्यात्मिक प्रगती किंवा मोक्ष (नि:श्रेयस) यांना समान महत्त्व दिले आहे. या दोघांमध्ये संतुलन राखणे यालाच धर्म (रिलिजन) म्हणतात. ‘यतोभ्युदय नि:श्रेयस सिद्धि: स धर्म’ अशीदेखील धर्माची व्याख्या करण्यात आली आहे. म्हणूनच इसवी सनाच्या पहिल्या 17 शतकांपर्यंत जागतिक व्यापारात भारताचा सहभाग 30 टक्क्यांपेक्षाही जास्त होता. व्यापाराच्या हेतूने अनेक देशांत गेल्यावरही भारतीयांनी तिथे स्वतःची वसाहत बनवण्याचा प्रयत्न केला नाही, तिथल्या संसाधनांची लूट केली नाही, तेथील स्थानिक लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला नाही; एवढेच नव्हे, तर लोकांना गुलाम बनवून त्यांचा व्यापारही केला नाही. याचे कारणदेखील भारताची ‘वसुधैव कुटुंबकम’ची सनातन, शाश्वत संकल्पना आहे.
 
 
आजच्या काळात जेव्हा जग जवळ आले आहे, दळणवळणाची आणि दूरसंचाराची साधने गतिमान झाली आहेत, अशा वेळी जगातील तमाम मानवतेला भाषा, वंश, उपासना (धर्म) यांचे वैविध्य जपत पृथ्वीवरील मर्यादित साधनांसह दीर्घकाळापर्यंत सामंजस्य राखत जर आपल्याला एकत्र समृद्ध जीवन जगायचे असेल, तर केवळ भारताजवळच असे जीवनविषयक तत्त्वज्ञान, दृष्टिकोन व अनुभव आहे आणि भारताचा असा इतिहास देखील आहे.
 
 
सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. फ्रिट्जोफ्फ काप्रा यांची पुढील उद्धरणे याचे महत्त्व स्पष्ट करतात-
"The paradigm that is now receding has dominated our culture for several hundred years. During which it has shaped our modern western society and has significantly influenced the rest of the world. This paradigm consists of a number of entrenched ideas and values, among them the view of the universe as a mechanical system composed of elementary building-blocks, view of human body as a machine, the view of life in society as a competitive struggle for existence, belief in unlimited material, economic and technological growth and last not the least, the belief that a society in which the female is everywhere subsumed under the male is one that follows a basic law of nature. These entire assumptions have been fatefully challenged by recent events. And indeed a radical revision of them is occurring.''
"The new paradigm may be called a holistic world view, seeing the world as an integrated whole rather than a dissociated collection of parts. It may also be called an ecological view, if the term ecological is used in a much broader and deeper sense than usual. Deep ecological awareness recognizes the fundamental interdependence of all phenomena and the fact that as individuals and societies we are all embedded in (and ultimately depend on) the cyclic process of nature.
Ultimately, deep ecological awareness is spiritual or religious awareness. When the concept of the human spirit is understood as the mode of consciousness in which the individual feels a sense of belonging, of connectedness, to the cosmos as a whole, it becomes clear that ecological awareness is spiritual in its deepest essence. It is therefore, not surprising that the emerging new vision of reality based on deep ecological awareness is consistent with the so-called perennial philosophy of spiritual traditions.''
 
 
त्यामुळे भारताने आपल्या अद्वितीय अस्मितेसह समृद्ध, संपन्न आणि सुरक्षित राहणे ही जगाची आवश्यकता आहे आणि भारत सनातन, शाश्वत राहण्यासाठी या eternal सनातन अध्यात्मावर आधारित हिंदू जीवनदृष्टी, हिंदू जीवनमूल्ये टिकून राहणे आवश्यक आहे. हा जीवनविषयक दृष्टिकोन प्रत्यक्ष आपल्या जीवनात आचरणात आणणारा एक संघटित, शक्तिसंपन्न, विजिगीषु, क्रियाशील समाज असणेही तितकेच आवश्यक आहे. हिंदू शब्दाचा अभिमानपूर्वक आग्रह धरून या हिंदू समाजाला संघटित करून दोषमुक्त, राष्ट्रीय गुणसंपन्न, समाज निर्माण करूनच हा सनातन भारत बनेल त्याचे सनातनत्व कायम राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व शक्तिनिशी याच कार्यात गुंतला आहे. कारण हेच त्याचे जीवनध्येय आहे, अवतार कार्य आहे.