जाऊ आनंदाच्या गावी...

19 Mar 2023 05:55:00
-मधुरा कुलकर्णी
 
सामान्यांची अस्तित्व रक्षणाची लढाई हातघाईवर येत असताना आयुष्यातल्या happiness आनंदाचा स्तर खालावणे ओघानेच आले. त्यात दुष्काळात तेरावा महिना, म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाचे वादळ आले आणि जोरदार वार्‍याने झाडोरा विस्कटून जावा त्याप्रमाणे जवळपास प्रत्येकाचे आयुष्य विस्कटून गेले. पुढचे काही दिवस तरी अडचणींचा आणि या निमित्ताने उभ्या राहिलेल्या प्रश्नांचा गुंता सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. पण म्हणून का आपण आनंदाला विन्मुख व्हावे? ‘हरिदूता का विन्मुख व्हावे?’ या काव्यपंक्तींच्या धर्तीवरचा हा प्रश्न स्वत:लाच एकदा विचारून पहा बरं! उत्तर नक्कीच ‘नाही’ असेच असणार. म्हणूनच एकीकडे 20 मार्चच्या जागतिक आनंद दिवस साजरीकरणाविषयीचे वृत्त वाचत असताना आपणही आनंदाभिमुख राहण्याचा संकल्प सोडायला हरकत नाही. सुखाचा एक तर दु:खाचे शंभर या प्रमाणात विणलेल्या आयुष्याच्या वस्त्रात दु:ख पैशाला पासरीभर मिळणारच! हा तानाबाना विणीतले सगळे रंग आलटून पालटून आपल्यापुढे आणणार. काही रंग उन्हात प्रकर्षाने चकाकणार तर काही सावलीत खुलून दिसणारे. त्या प्रत्येकाचा विचार करीत बसले तर संपूर्ण आयुष्य बेरंगी होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच हाती आलेल्या प्रत्येक क्षणावर आनंद पांघरूण आयुष्य आपलेसे करणे आणि मनापासून जगणे हेच जीवनाला निखळतेने सामोरे जाण्यामागचे खरे मर्म आहे.
 
 
happy
 
काहींची वृत्ती मुळातच आनंदी असते. ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू शकतात. एखादा रत्नपारखी पैलू पाडून साध्याशा रत्नाला झळाळी देतो तद्वतच त्यांची happiness आनंदी वृत्ती सामान्य आयुष्यावरही सोनेरी वर्ख चढवून जाते. लौकिकार्थाने मागे राहिलेले हे लोक आनंदाच्या परिमाणात मात्र खूप पुढे निघून गेलेले असतात. कारण मुळात आनंद कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे तो वृत्तीत असावा लागतो. ही वृत्ती असणारा माणूस एखाद्या रसाळ भजनात, एखाद्या चुटक्यात, एखाद्या चारोळीत, गाण्याच्या एखाद्या कडव्यात, रंगाच्या एखाद्या फटकार्‍यात, गायकाच्या एखाद्या तानेत, वाद्याच्या एखाद्या झंकारात, निसर्गाच्या एखाद्या आविष्कारातही इतका पराकोटीचा आनंद शोधतो की त्याची पारायणे करण्यासाठी परत परत तो अनुभव घेत राहतो आणि पुन्हा तितकाच आनंद मिळवत राहतो. अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाच्या नियमाने त्याच्या आनंदावर आनंदाचे व्याज चढत जाते आणि आनंदाच्या तळ्यात आनंदाचेच तरंग उमटवत त्याचे आयुष्य हळुवार लाटा पसरवत जाते.
 
 
आजचे व्यवहारी जग happiness आनंदी दिवस साजरा करताना उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या निकषांच्या आधारे एखाद्या देशातले नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात, याची पाहणी करून एका तक्त्यात देशांची नोंदणी करतेय. त्याप्रमाणे पहिले पाच देश सर्वात आनंदी तर शेवटचे पाच सर्वात दु:खी असे लेबल लावून एक अहवाल पूर्ण होतो. आश्चर्य म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत समजला जाणारा अमेरिकेसारखा देश या यादीत पहिल्या पाचात दिसत नाही. म्हणजेच आपल्या अध्यात्मात मांडलेला आनंद आणि पैसा यांचा संबंध नसतो, हा विचार इथे सबळतेने स्पष्ट होताना दिसतो. या विचारधारेमुळेच भूतानसारख्या नागरिकांच्या आनंदीपणाचा स्तर महत्त्वाचा मानणार्‍या आणि त्याच निर्देशांकाच्या आधारे देशाच्या विकासाची व्याख्या आधारभूत मानणार्‍या देशाबद्दल आपल्याला कुतूहल वाटते. तेव्हा तेच परिमाण प्रमाण मानून आपणही त्यांचा आदर्श पुढे ठेवायला काहीच हरकत नाही.
 
 
अनेक विनोदवीरांनी आपल्याला हसायला शिकवले, happiness आनंद लुटायला शिकवले आणि दैनंदिन जीवनातल्या व्यथा-विवंचना बाजूला ठेवून भरभरून कसे जगायचे याचे अनौपचारिक धडे दिले. त्यामुळेच कधी काळी ‘गंभीर’ अशी असणारी मराठी माणसाची ओळख बदलली. आपण सकस आणि कसदार विनोदावर मनसोक्त हसलो. द्वयर्थी शब्दातली गंमत कळल्यावर एकच कल्लोळ केला. अनेक हास्यमहर्षींनी आपल्या स्थितप्रज्ञ आणि चिंताक्रांत चेहर्‍यावरील जाळ्यात हास्याचे रंग भरले. आपण वक्तृत्वातल्या विनोदावर हसलो, लेखनातल्या कोट्यांवर हसलो, कोपर्‍यातले व्यंगचित्र पाहून हसलो. शारीरिक आणि वाचिक अभिनय पाहून हसलो. विदुषकाच्या फसव्या आविष्कारावर हसलो तसेच विनोदसम्राटाच्या चेहर्‍यावरच्या एखाद्या मिश्कील भावावरही हसलो. एकूण काय, तर जगताना समोर येणार्‍या अडचणींवर मात करताना हास्यामुळे मिळणारे तणावमुक्तीचे क्षण हेच संचित आहे, हे आता आपल्याला पुरते उमगले आहे. म्हणूनच दु:ख झाकून ठेवण्याच्या प्रयत्नात हसण्याचा गडगडाट दिवसेंदिवस वाढतोय.
 
 
आपण happiness आनंदी असलो की ओठांवर आपोआप हळुवार हास्य येते. म्हणजेच हसणे हा प्रयोग नाही तर निष्कर्ष आहे. हसणे ही मनस्वास्थ्य मिळाल्याची पोचपावती आहे. मिटलेले ओठ विलग होतात तेव्हा मनाचा कुठलासा कोपरा सुखावलेला असतो. कधी त्यामागे कारण असते तर कधी कारण नसले तरी या कमळाच्या पाकळ्या आपोआप उमलतात. अर्थातच त्यासाठी मन आनंदी असायला हवे आणि त्यासाठीच दु:खाचे मळभ दूर करण्याचे कसबही जमायला हवे. सुख-दु:ख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा कुठली बाजू सतत समोर ठेवायची हे ठरवणेही गरजेचे आहे. सुखाची अनेक ठाणी आहेत, अनेक झरे आहेत. मनात आणले तर आपणही त्याखाली भिजू शकतो आणि अवघे आयुष्य सुहास्य वदनाने राहू शकतो. आनंद आणि निरागस, निखळ आणि निर्मळ हसू कुठल्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान आहे. कारण कितीही पैसे मोजले तरी ते काही मिळत नाही. आयुष्य पुढे सरकते तसा अभ्यासाचा ताण वाढतो. मी-तू पणाची जाणीव होते. सुखाबरोबर दुःख या स्वनिर्मित कल्पनेची ओळख होते. नंतरच्या काळात नियती नावाच्या अदृश्य शक्तीची विविध रूपे वेगवेगळ्या प्रकारे समोर येत जातात आणि परिस्थितीला सामोरे जाताना चेहर्‍यावरचे हसू आणि मनातला आनंद दुर्मिळ होतो.
 
 
कपाळावर आट्यांचे आणि मनावर जबाबदारीचं ओझे वाढले की हसणे, happiness आनंद संकोचतो. देखल्या देवाला दंडवत या उक्तीप्रमाणे हसू येईलही; पण ते कसनुसं वाटते, उपरं वाटते. त्यात प्राण नसतो. ती केवळ एक शारीरिक क्रिया होऊन राहते. मुळात कोणत्याही साध्यासुध्या परिस्थितीत दुःख शोधण्याची आणि त्यामुळे व्यथित होण्याची मानसिकता या निखळ आनंदाचा गळा घोटते आणि माणूस अधिकाधिक गंभीर होत जातो. म्हणूनच निखळ आनंद महाग व्हायला जेवढी परिस्थिती कारणीभूत आहे तेवढाच माणूस स्वत:ही. भौतिक सुखांच्या शोधापायी आणि हव्यासापोटी धावपळ वाढली तेव्हापासून माणसाच्या मनातला आनंद लोप पावायला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. ही सुखे मिळाली की आनंद होतो, नाही असे नाही, पण तो बराच फसवा असतो, अल्पजीवी असतो. कारण सुखाची भूक शमत नाही. लगेचच दुसर्‍या सुखाची भूक लागते आणि आनंदावर आरूढ होऊन असमाधान त्याला दाबून टाकते. हे दुष्टचक्र कधीही न संपणारे! पण अशा परिस्थितीतही आनंद जपू शकणारे भाग्यवान म्हणावे लागतील. परिस्थितीचा दाह त्यांची प्रसन्नता जाळू शकत नाही. द्रव्याची चणचण अथवा कमतरता त्याचे हसू झाकोळून टाकू शकत नाही. आपणही अशा भाग्यवानांच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न करायला हवा. चला तर, मग आनंदी राहू या...
- 8830322086
Powered By Sangraha 9.0