यवतमाळ,
येथील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षक आमदार, भाजपाचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष Diwakar Pandey दिवाकर बळवंत पांडे यांचे 1 मार्चच्या रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दिवाकरराव पांडे राहत असलेल्या बालाजी सोसायटीचे व बालाजी देवस्थानचेही अध्यक्ष राहिले आहेत. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयातील इंग्रजी व इतिहासाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. सुरुवातीची माध्यमिक शिक्षक परिषद, पुढे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले शिक्षक आमदार म्हणूनही त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
यवतमाळ डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या Diwakar Pandey दिवाकराव पांडे यांचा शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत लौकिक होता. आमदारकीची टर्म संपल्यानंतर ते यवतमाळ जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निवडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, संघ व अन्य क्षेत्रातील विविध जबाबदार्या पार पाडणारे कर्मठ कार्यकर्ते, सामाजिक कामातही हिरीरीने पुढे राहणारे, विविध विचारांच्या व्यक्ती, संस्था व संघटनांशी निकटचा परिचय असलेल्या दिवाकरराव पांडे त्यांच्यामागे पत्नी उज्ज्वला, धनंजय व संजय ही दोन मुले, मंजुषा ही विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवाकरांचे नेत्रदान करण्यात आले. डॉ. आलोक गुप्ता यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
गुरुवार, 2 मार्च रोजी पांढरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रकांत रानडे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, वसंत घुईखेडकर, प्रवीण देशमुख, जाफरभाई बॉम्बेवाला, किशोर दर्डा, उद्धव येरमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धासुमन अर्पण केले. Diwakar Pandey दिवाकररावांच्या निधनाबद्दल यवतमाळच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.