भोपाळ वायुगळतीचा दुर्गंध...!

    दिनांक :20-Mar-2023
Total Views |
वेध
 
अनिरुद्ध पांडे 
 
आज 40 व्या वर्षीही, मध्यप्रदेशातील (Bhopal gas tragedy) भोपाळ या राजधानीच्या शहरी झालेल्या ‘गॅसकांडा’ची आठवण अंगावर शहारे आणते. 3 डिसेंबर 1984 ला झालेल्या या वायुगळतीची आज आठवण येण्याची दोन कारणे. एक म्हणजे, या जगातील सर्वात विनाशकारी मानल्या जाणार्‍या औद्योगिक अपघात (या घटनाक्रमाला काही माध्यमकर्मींनी ‘अपघातपात’ असा शब्द वापरला आहे.) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये गॅसपीडितांविरुद्ध भूमिका घेणारे भारताचे सरन्यायाधीश अजीज मुशब्बर अहमदी यांचे 2 मार्च 2023 रोजी झालेले निधन. दुसरे म्हणजे, 14 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील फेटाळलेली याचिका. भोपाळच्या युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रसायन कारखान्यात 2 डिसेंबर 1984 च्या मध्यरात्रीनंतर विषारी वायुगळती सुरू झाली. नेमके काय होत आहे हे कळण्यापूर्वीच, सकाळपर्यंत 20 हजारांवर लोकांनी आपले जीव गमावले होते तर 5 लाखांहून अधिक सर्व वयोगटांतील नागरिकांना कायमचे अपंगत्व आले होते. या कारखान्यातील टाक्यांमधील ‘मिथेल आयसोसायनेट’ या (Bhopal gas tragedy) विषारी वायूची अचानक गळती सुरू झाली. अवघ्या दीड तासांत 50 टनांहून अधिक वायुगळती होऊन तो हवेपेक्षा जड असल्यामुळे जमिनीलगतच पसरला. या कारखान्यासमोरच असलेल्या जयप्रकाश नगरात तो प्रथम घुसला. झोपलेल्या लोकांना एकदम श्वास घेण्यास त्रास होऊन खोकला येऊ लागला, डोळे चुरचुरू लागले आणि गुदमरायला लागले.
 
Bhopal gas tragedy
 
जरा काही कळेपर्यंत (Bhopal gas tragedy) भोपाळच्या घर, रस्ते आणि रुग्णालयांमध्ये माणसे आणि प्राण्यांचे मृतदेहच पाहायला मिळाले. 3 डिसेंबर 1984 च्या सकाळी 20 हजारांवर लोकांनी जीव गमावले आणि लाखो कायमचे अपंग झाले. अनेकांचे डोळे गेले. फुफ्फसे निकामी झाली. हृदयाचे विकार जडले. कित्येकांची कार्यक्षमता कमी होऊन ते कोणतेही शारीरिक श्रम करण्यास कायमचे अपात्र झाले. या भागातील अनेक मुलींना श्वसनाचे आजार जडल्यामुळे त्यांच्यावर सक्तीनेे अविवाहित राहण्याचा प्रसंग ओढवला. अनेक मुले मेंदूवर परिणाम होऊन मतिमंद झाली. एवढेच नाही तर पुढे जन्माला आलेल्यांमध्येही शारीरिक व्यंग आढळून आले. विशेष महत्त्वाचे आणि संतापजनक असे की, युनियन कार्बाईड या कंपनीने या दुर्घटनेची जबाबदारी कधीच स्वीकारली नाही. या कंपनीने दिलेला ‘रिलिफ’ हा या वायुपीडितांसाठी अत्यंत ‘फालतू’ अशा प्रकारचा होता. घटनेनंतर लगेचच कंपनीविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. कंपनीचा अमेरिकी मालक वॉरन अँडरसन याच्यावर अमेरिकी आणि भारतीय न्यायालयात खटले चालले. पाच वर्षांनी 1989 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, कोर्टाबाहेर तडजोड करण्यात आली. यात केवळ 47 कोटी डॉलर्स हा आकडा भरपाई म्हणून मान्य केला गेला; जो नुकसानाच्या तुलनेत अतिशय किरकोळ होता. ही भरपाई देण्याची प्रकि‘या आणखी 14 वर्षे, म्हणजेच घटनेनंतर 20 वर्षे सुरू होती. 2003 मध्ये 15,310 मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी केवळ 1 लाख 10 हजार रुपयांची भरपाई(!) दिली गेली. 5 लाख 54 हजार 895 जणांना त्यांच्या दुखापतीनुसार मदत दिली गेली; जी खरोखरच अत्यल्प होती.
 
 
भरपाईचे वाटप करताना अपहार झाल्याचे आरोप तर होतेच; पण त्या प्रकि‘येतील दोन सरन्यायाधीशही वादग्रस्त ठरले. त्यापैकी एक होते, 1989 मध्ये असलेले न्या. रघुनंदन स्वरूप पाठक आणि दुसरे 1994 ते 97 असलेले न्या. अहमदी. या दोघांनीही युनियन कार्बाईड आणि अमेरिकी व्यवस्थेला झुकते माप दिले, असा आरोप झाला होता. ‘असे’ केल्याचा ‘पुरस्कार’ म्हणून या दोन्ही सरन्यायाधीशांना काय काय मिळाले, याच्या ‘स्टोरीज’ न्या. अहमदी यांच्या निधनाच्या निमित्ताने 2023 मध्येही माध्यमांनी लोकांसमोर ठेवल्या आहेत. या (Bhopal gas tragedy) भोपाळ ‘वायुगळती अपघातपात’ प्रकरणी 7,844 कोटी रुपये पीडितांना अधिक मिळावेत यासाठी भारत सरकारने दाखल केलेली ‘क्युरेटिव्ह’ याचिका 14 मार्च 2023 ला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पाच न्यायमूर्तींच्या न्यायासनाने ही याचिका फेटाळताना देशाच्या आतापर्यंतच्या सर्वच संबंधित सरकारांवर शरसंधान केले आहे. हा मुद्दा आज नव्हे, तर 30 वर्षांपूर्वीच निर्माण व्हायला हवा होता, अशी टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या सरकारबद्दल आम्ही अजिबात समाधानी नाही, असेही म्हटले आहे. 20 व्या शतकातील जगातील एक भीषण दुर्घटना ठरलेल्या या भोपाळ वायुगळती प्रकरणी 2010 मध्ये म्हणजे 26 वर्षांनी युनियन कार्बाईडचे माजी अध्यक्ष केशुभाई महेंद्र यांच्यासह सात जणांना फक्त दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण तेव्हाचा अध्यक्ष वॉरन अँडरसन मात्र नामानिराळाच राहिला. त्याची अटक, सुटका, त्याचे संशयास्पदरीत्या अमेरिकेला पळून जाणे, पुढे भरपाईची अत्यल्प रक्कम, सारेच काही वादग्रस्त ठरत गेले, अगदी आजपर्यंत. तत्कालीन राज्य आणि केंद्र या दोन्ही काँग्रेसी सरकारांच्या भूमिकेचा संशयास्पद आणि दुर्गंधी दर्प प्रदूषित करतोच आहे आज, या 40 व्या वर्षीही..!
 
 
- 98817 17829