चिंता वाढवणारे, आजारपणाचे कारण म्हणजे बदलते 'हवामान'

आज जागतिक हवामान दिन

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
जागतिक हवामान दिन
 
World Meteorological day : अनेक म्हणी मानवी जीवनात रूढ आहेत. त्यातीलच व्यापार्‍यांची एक प्रसिद्ध म्हण म्हणजे, ग्राहक आणि मृत्यू यांचा काहीच भरवसा नाही! मात्र, बेभरवशाच्या या दोन गोष्टींमध्ये गेल्या काही वर्षांत आणखी एकाची भर पडली आहे आणि ते म्हणजे ‘हवामान’. केवळ देशातच नव्हे तर, जगभरात हवामान कधी, कसे राहील, याचा भरवसा राहिलेला नाही. हवामानातील बदल हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे निसर्गाशी असणारे मानवाचे नाते पुन्हा एकदा मंथनाच्या स्तरावर आले असून, निसर्गाची आपण किती अवहेलना केली, याचा विचार मानवाने करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
 
World Meteorological day
 
जगभरात 23 मार्च हा दिवस (World Meteorological day) जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरच त्यात होणार्‍या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक संकल्पना ठेवली जाते. तिच्या आधारे वर्षभर काम केले जाते. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मु‘यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यासार‘या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्याचे काम करते, जेणेकरून होणार्‍या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल.
 
 
जागतिक हवामान दिन (World Meteorological day) हा आपल्या पृथ्वीला भेडसावणार्‍या हवामान बदल, जंगलतोड, अतिप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर 191 हून अधिक देशांमध्ये जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो.
 
World Meteorological day
 
21 मार्च रोजी वन दिन, 22 मार्च रोजी जागतिक जल दिन आणि 23 मार्च रोजी हवामान दिन (World Meteorological day) साजरा केला जातो. खरे तर, हे तिन्ही घटक एकमेकांशी संबंधित असेच आहेत. त्यांचा आपसातील संबंध वेगळ्याने सांगायला नको. मात्र, या तिन्हींच्या बाबतीत प्रभावित करणारा सर्वांत मोठा घटकही समानच आहे आणि तो म्हणजे मानव. मानवामुळे वन, जलस्रोत आणि हवामान तिन्हींवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणामही अर्थातच मानवालाच भोगावा लागतो आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात झालेला बदल याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. ऊन, पाऊस आणि थंडी तिन्हींच्या बाबतीत हवामानाचे तंत्र बरेच बिघडले आहे. याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सवांंत वाईट परिणाम मानवी प्रकृतीवर होतो. हवामानामुळे प्रकृतीच्या कुरबुरी वाढल्या आहेत. डॉक्टरही चिंतीत असून, (World Meteorological day) पर्यावरणतज्ज्ञांनी तर याचा इशारा बराच आधी दिला होता. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मानवी चुका जितक्या जास्त राहतील तितका सर्वाधिक प्रभावित मानवच होईल, हे उघडच आहे. त्यामुळे मानवाने आतातरी सावध होणे गरजेचे आहे. निसर्गाचा मान ठेवण्याची गरज आता निर्माण झाली असून, त्यातूनच मानवी जीवन सुरळीत राहणार आहे.