तभा वृत्तसेवा
अमरावती,
Invitation : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. या निमित्तानेच येत्या 10 एप्रिल रोजी भाऊसाहेबांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती येथे होणार्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी निमंत्रण दिले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारून 10 एप्रिल रोजी अमरावतीला येण्याचे मान्य केल्याचे संस्थेने सांगितले आहे.
शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुखांचे शैक्षणिक, सामाजिक, कृषी, स्वातंत्र्य लढा तसेच घटना समितीचे सदस्य या नात्याने केलेले कार्य अजरामर आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करुन समाजाच्या तळागाळातील तसेच शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण देण्याचा संकल्प करुन भारताच्या उन्नतीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त अनेक नवे उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. या उपक्रमांची घोषणा भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था करणार आहे.
या महत्वपूर्ण वर्षाच्या कार्यक्रमाची सुरूवात ही पुण्यतिथी कार्यक्रमातून केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, सुभाष बनसोड तसेच प्राचार्य डॉ. महेंद्र ढोरे यांच्या शिष्टमंडळाने नागपूर येथील शासकीय निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पुण्यतिथी कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण संस्थेच्या वतीने देण्यात आले असून त्यांनी आनंदाने या निमंत्रणाचा स्वीकार करीत 10 एप्रिल रोजी अमरावती येथे येण्याचे मान्य केले आहे, असे संस्थेने कळविले आहे. या भेटीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अनेक शासकीय कामासंदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली.