तभा वृत्तसेवा
वर्धा,
Forest area officer : 3 हजारांची लाच स्विकारताना वनपरिक्षेत्र अधिकार्याला रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आज बुधवार 12 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. राजेंद्र गायनेर (56) असे अटक करण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकार्याचे नाव आहे.

फिर्यादीवर जेसीबी मशिनने वनजमिनीचे नुकसान केले म्हणून वन कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करून 2 हजारांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणाचा निपटा करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर याने फिर्यादीला 10 हजाराची लाच मागितली. मात्र, सध्या एवढे पैसे नसल्याने दंडाचे 2 हजार आणि अतिरिक्त 1 हजार असे 3 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, पैसे देण्याची मानसिकता नसल्याने फिर्यादीने तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रार प्राप्त होताच कारंजा (घा.) वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि लाच स्विकारताना अटक केली. दरम्यान, वनपरिक्षेत्र कार्यालय कारंजा येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता 91 हजारांची रोख आढळून आली. याप्रकरणी कारंजा (घा.) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, नागपूर परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव, पोलिस निरीक्षक संदीप थडवे, सहाय्यक फौजदार रवींद्र बावनेर, संतोष बावणकुळे, कैलास वालदे, निलेश महाजन, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.