तभा वृत्तसेवा
दिग्रस,
तालुक्यातील सावंगा (बु.) येथील महादेव सप्रे या (Digras mushroom) शेतकर्याने कोणत्याही योजनेतून आर्थिक सहाय्य न घेता मशरुम उत्पादन कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण घेत घरातच लागवड केली. त्यांच्या या प्रयोगाला यश आले असून ते ओला ‘मशरुम’ 300 रुपये किलो, वाळला ‘मशरुम’ 1 हजार 200 रुपये किलो तर पावडर 2 हजार रुपये किलो प्रमाणे विक्री करीत आहेत. महादेव सप्रे यांनी केवळ 5 हजार रुपये गुंतवून शेतीला पूरक असा जोडधंदा सुरु केला. त्यात त्यांना यश मिळाल्याने त्यांनी मशरुम लागवडीचा विस्तार सुरु केला आहे.
विशेष म्हणजे (Digras mushroom) दिग्रस तालुक्यात पहिल्यांदाच ‘मशरुम’चे उत्पादन घेतले जात आहे. दारव्हा तालुक्यातील नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, संचालित कृषि विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे येथील विशेषज्ञ यांनी महादेव सप्रे यांना मशरुम उत्पादनाचे योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन प्लान्ट उभा करण्यासाठी मार्गदर्शन केले.
मशरुम उत्पादन हे 1 थर निर्जंतुक बुरशी आलेले (Digras mushroom) मशरूम पावडरचे बियाणे व त्यावर 3 इंच सोयाबीनचे कुटार असे पाच थर करुन बंद खोलीत दोरीच्या साह्याने लटकवून घेतले जात असल्याची माहिती माहिती दारव्हा तालुक्यातील नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील गृहविज्ञान विशेषज्ञ नम्रता राजन यांनी दिली. मशरुम हृदयविकार, मधुमेह, वजन कमी करणे, भरपूर प्रोटिन्स व प्रथिने युक्त असल्याने अनेक नागरिक रोजच्या आहारात याचा समावेश करतात. दिग्रस तालुक्यात केवळ सावंगा (बु.) येथेच मशरुम मिळत असल्याने याची विक्री वाढली असून शेतकरी महादेव सप्रे हे आपल्या जोडधंद्यामुळे समाधानी असल्याचे सांगतात.