नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेसह व्याघ्र दर्शनाची पर्वणी

12 ते 17 वाघ असल्याची नोंद

    दिनांक :20-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे वनवैभव असलेले (Navegaon Nagzira Tiger Reserve) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प जैवविवधतेने संपन्न असून कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. सन 2022 च्या वन्यप्राणी गनणेनुसार या व्याघ्र प्रकल्पात 12 ते 17 वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. वन्यजीव प्रेमी व वन पर्यटकांसाठी हा प्रकल्प एक पर्वणीच ठरला आहे.
 
Navegaon Nagzira Tiger Reserve
 
नवेगाव नागझिरा व्याघ्र (Navegaon Nagzira Tiger Reserve) प्रकल्पाला 12 डिसेंबर 2013 रोजी प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, भारताचे 46 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले. भारतातील जवळपास एक सष्ठांष व्याघ्र संख्या याच प्रकल्पात अस्तित्वात आहे. हे प्रकल्प मध्यप्रदेशातील कान्हा, महाराष्ट्रातील पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगढ़ मधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प सोबतच अप्रत्यक्षपणे तेथील अचानकमार व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणातील कावल-नागार्जुनासागर व्याघ्र प्रकल्प यांच्याशी विविध मार्गांद्वारे जोडले गेले आहे. या प्रकल्पामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्यांचा समावेश आहे. या वनक्षेत्राचा एकूण क्षेत्रफळ 133.88 चौरस किमी आहे.
 
 
उर्वरित क्षेत्र अतिसंरक्षित व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित आहे. निसर्ग संरक्षणाच्या दृष्टिकोनातून याला खूप महत्व लाभले आहे. नयनरम्य डोंगरदर्या ते घनदाट जंगल व वन्यजीवांने (Navegaon Nagzira Tiger Reserve) नवेगाव नागझिरा प्रकल्प समृद्ध आहे. जंगलातील सफारी आणि निसर्ग भ्रमण पर्यटकांना निसर्गाशी एकरूप होण्याकरिता संधी उपलब्ध करून देते. परिसराला लाभलेल्या हिरवेगार घनदाट जंगल आणि अमृतमय पावसामुळे ते शेजारच्या शहरांसाठी ग्रीन लंग्ज (हिरवळ) म्हणून काम करते आणि पर्यावरणाचा समतोल राखते. येथील हिरवीगार झालर, अस्तित्वात असलेल्या विविधप्रकारचे झाडे झुडपे, औषधी वनस्पती, व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यवर्ती भागात आर्द्र भूमी उपलब्ध असल्याने तेथे बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्रात मोठ्या संख्येने वन्यजीव आहे.
 
 
नवेगाव परिसराला (Navegaon Nagzira Tiger Reserve) पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जात असले तरी वाघ, बिबट, अस्वल, सांबर, चितळ, रानकुत्रे यांसारखे मोठे सस्तन प्राणी येथे आहेत. वनक्षेत्रात एकूण 209 प्रकारचे पक्षी, 9 प्रकारचे सरीसृप, 26 प्रकारचे सस्तन प्राणी ज्यात दुर्मिळ लांडगे, चांदी अस्वल, तडस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त क्षेत्रात असलेल्या जलाशयात अनेक मासे प्रजाती व सभोवताली फुलपाखरे आणि कीटकांची नोंद देखील झाली आहे. गतवर्षी झालेल्या वन्य प्राणी गणनेचा अहवाल राज्याच्या वन विभागाने प्रसिद्ध केला आहे. नवेगाव नागझिरा प्रकल्पात 12 व जास्तीत जास्त 17 वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जवळील भंडारा जिल्ह्यातील उमरेड कराडला प्रकल्पात 6 वाघ, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 आणि ब्रह्मपुरी क्षेत्रात 55 ते 66 वाघ असल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये वाघांच्या संख्येत भर पडल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले असून प्रकल्पांना दिवसेंदिवस भेट देणार्‍या वन्यप्रेमी, पर्यटकांच्या संख्येतही कमालीने वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.